१४ हॉटेलांवर कारवाई

ठाणे महापालिका अग्निशमन दलाचा ना हरकत दाखला सादर करण्यास टाळाटाळ करणाऱ्या शहरातील हॉटेल, लाऊंज बार आणि हुक्का पार्लरवर महापालिका प्रशासनाची कारवाई मंगळवारीदेखील सुरू राहिली. या कारवाईत हॉटेल, लाऊंज बार आणि हुक्का पार्लर अशा एकूण १४ बांधकामांवर कारवाई करण्यात आली असून त्यापैकी काही आस्थापनांची बेकायदा वाढीव बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. यामध्ये खोपट भागातील प्रसिद्ध अशा फिशलॅण्ड या हॉटेलला सील ठोकण्यात आले असून घोडबंदर भागातील गारवा आणि स्वागत या हॉटेलांची बांधकामे पाडण्यात आली आहेत.

ठाणे महापालिका क्षेत्रातील पाचशेहून अधिक हॉटेल, लाऊंज बार आणि हुक्का पार्लरला प्रशासनाने नोटीसा बजावून अग्निशमन दलाचा ना हरकत दाखला सादर करण्याच्या सुचना केल्या होत्या. शहरातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महापालिका प्रशासनाने हा निर्णय घेतला होता. या  मुदतीनंतरही आस्थापनांच्या मालकांनी केलेल्या विनंतीवरून प्रशासनाने आणखी पंधरा दिवसांची मुदत देऊन या काळात अग्निशमन विभागाचा ना हरकत दाखला सादर करण्यास सांगितले होते.

मात्र, या मुदतीनंतरही अनेक आस्थापनांच्या मालकांनी अग्निशमन दलाता ना हरकत दाखला सादर केलेला नाही. त्यामुळे सोमवारपासून अशा आस्थपनांना सील ठोकण्याची कारवाई महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सुरु केली आहे. सोमवारी झालेल्या कारवाईमध्ये शहरातील शहरातील १६ अस्थापनांवर कारवाई करण्यात आली होती. त्यामध्ये हॉटेल, लाऊंज बार आणि हुक्का पार्लर अशा आस्थपनांचा समावेश होता. दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी दिवसभर ही कारवाई सुरूच होती. या कारवाईमध्ये ठाणे शहर, वागळे इस्टेट आणि घोडबंदर भागातील एकूण १४ आस्थापनांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये ११ आस्थपनांना सील ठोकण्यात आले तर उर्वरित तीन आस्थापनांची वाढीव बेकायदा बांधकामे तोडण्यात आली.

कारवाईची यादी

गारवा, आयकॉन, स्वागत, फिशलँड, अमृता, राधाकृष्ण, स्वरा, हिलब्रीज, अनुग्रह, विश्वसागर या हॉटेलसह अ‍ॅन्टीक पॅलेस, श्रीमाता, शीतल या बारवर पालिकेने कारवाई केली. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या कारवाईमुळे हॉटेल व बार मालक धास्तावले आहेत. पथकाने बुधवारी अशा प्रकारची कारवाई केली नाही. मात्र, अग्निशमन दलाचा ना हरकत दाखला नसलेल्या व वाढीव बांधकाम करणारे हॉटेल, लाऊंज बार व हुक्का पार्लरवर कारवाई सुरूच राहणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.