ठाणे खाडीतील रेती उपशामुळे पर्यावरणाचा होणारा ऱ्हास आणि महसुलाची चोरी थांबवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी ठाणे रेतीगट शाखेच्या पथकाच्या मदतीने रेती माफियांवर धाडी टाकण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारी या पथकाने ठाणे आणि भिवंडी परिसरातील बेकायदेशीर रेती उपसा करणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली. या कारवाई दरम्यान मोठय़ा प्रमाणात वाळू आणि साहित्य जप्त करण्यात आले.

ठाणे-भिवंडीदरम्यानच्या कशेळी, काल्हेर आणि केवणी या तीन बंदरांवर बेकायदेशीरपणे रेती उपशाचे काम सुरू होते. याविषयीची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे आल्यानंतर रेतीगट शाखेच्या पथकाला याविषयी कारवाईचे आदेश देण्यात आले होते. या तीनही बंदराच्या ठिकाणी जवळपास २४ लाख रुपये किमतीची एकवीसशे ब्रास रेती जप्त रण्यात आली, अशी माहिती तहसीलदार रेतीगट विनोद गोसावी यांनी दिली. त्यानंतर दुसरी कारवाई ठाणे तालुक्यात येणाऱ्या डावले गावी खाडीपात्रात झाली. या ठिकाणी २ सक्शन पंप आणि एक बार्ज रेती जप्त करून नष्ट करण्यात आली. या कारवाईमुळे या भागातील रेती माफियांमध्ये खळबळ उडाली आहे. कारवाईत ठाणे अपर तहसीलदार अमोल भोगले, निवासी नायब तहसीलदार भोईर, मंडळ अधिकारी मधाळे आणि पाटील त्याचप्रमाणे तलाठी, कर्मचारी यांनी ही कारवाई पूर्ण केली.