बेकायदा पार्किंगपासून प्रवाशांना दिलासा

ठाणे रेल्वे स्थानक परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून होणाऱ्या बेकायदा दुचाकी पार्किंगवर अखेर ठाणे वाहतूक पोलिसांनी शनिवारी कारवाई केली. गेल्या दोन महिन्यांपासून येथे बेकायदा पार्किंगचा सुळसुळाट सुरू होता. त्यामुळे स्थानक परिसरातून ये-जा करणाऱ्या प्रवाशांना तो अडथळा ठरत होता. या बेकायदा पार्किंगवर कारवाई झाल्याने अखेर प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकात झालेल्या दुर्घटनेनंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांना पिटाळून लावले. मात्र, त्यानंतर या मोकळ्या जागेत बेकायदा पार्किंगचा सुळसुळाट सुरू झाला होता. त्यामुळे ठाणे रेल्वे स्थानकातून प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना त्याचा त्रास सहन करावा लागत होता. ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एक आणि दोनच्या बाजूला गेल्या दोन महिन्यांपासून बेकायदेशीररीत्या दुचाकी उभ्या करण्यात येत होत्या. त्यातील अनेक दुचाकी या पोलिसांचे स्टीकर असलेल्या होत्या.

‘लोकसत्ता ठाणे’ सहदैनिकामधून त्याविषयीचे सचित्र वृत्त प्रसिद्ध झाले होते. अखेर शनिवारी या बेकायदेशीरपणे उभ्या करण्यात येणाऱ्या दुचाकींवर ठाणे वाहतूक शाखेने ठाणे रेल्वे स्थानकाचे संचालक आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या मदतीने कारवाई केली.