डोंबिवलीतील ४० चाळींमधील रहिवाशांना नोटिसा

डोंबिवली पश्चिमेतील भूमाफियांनी कांदळवनाची बेसुमार कत्तल करून उभारलेल्या १५ चाळी महसूल विभागाने आक्रमक कारवाई करून जमीनदोस्त केल्या. याच भागातील कांदळवनावर उभारलेल्या ३० ते ४० चाळींमध्ये कुटुंबे राहत असल्याने त्यांना येत्या पंधरा दिवसात खोल्या खाली करण्याचे आदेश तहसीलदार अमित सानप यांनी दिले आहेत.

कांदळवन संरक्षण व संवर्धन करण्यासाठी कल्याणचे प्रांताधिकारी प्रसाद उकार्डे, तहसीलदार अमित सानप यांनी एक समिती स्थापन केली आहे. दर महिन्याला ही समिती खाडीकिनारी पाहणी करून कांदळवन संवर्धनासंदर्भात निर्णय घेत आहे. महसूल विभागाचे अधिकारी नियमित खाडीकिनारी येत असल्याने त्यांना कांदळवन नष्ट करून उभारलेल्या बेकायदा चाळींचे दर्शन घडत आहे. दोन महिन्यांपूर्वी देवीचापाडा येथील कांदळवन नष्ट करून तेथे चाळी उभारणाऱ्या १० भूमाफियांवर मंडळ अधिकारी राजेंद्रकुमार पिसे यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. गुरुवारी दुपारपासून देवीचापाडा येथील  १० ते १२ चाळी नायब तहसीलदार पी. के. पाटोळे, मंडळ अधिकारी पिसे, तलाठी प्रशांत शिंदे, मोहन बोंबे, अश्विनी थोरात, तुकाराम साबळे यांच्या पथकाने जमीनदोस्त केल्या.

देवीचापाडा भागात खाडीकिनारचे कांदळवन नष्ट करून उभारलेल्या ३० ते ४० चाळींमध्ये रहिवासी राहत आहेत. या रहिवाशांना येत्या १५ दिवसात खोल्या खाली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कांदळवन संवर्धन नष्ट करून उभारलेल्या सर्व प्रकारच्या बेकायदा बांधकामांवर अशीच कारवाई सुरू राहील. भूमाफियांविरुद्ध गुन्हे दाखल केले जातील, अशी माहिती प्रांत प्रसाद उकार्डे यांनी दिली.