कुळगाव-नगरपालिका हद्दीत ज्या विभागात अनधिकृत बांधकाम होईल, त्याबद्दल त्या विभागातील संबंधित अभियंत्यांना  जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश पालिकेचे नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी प्रशासनास बुधवारी झालेल्या विशेष सभेदरम्यान दिले. असे केल्याने पालिका प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी ताळ्यावर येतील, अशी चर्चा सभेनंतर लोकप्रतिनिधींमध्ये रंगली होती.
केंद्र शासन पुरस्कृत स्मार्ट सिटी प्रकल्पाची आणि अमृत योजनेची अंमलबजावणी करण्यासंदर्भात पालिकेच्या सभागृहात बुधवारी दुपारनंतर विशेष सभा आयोजित केली होती. मात्र, सध्या शहरात अनधिकृत बांधकामांकडे झालेल्या दुर्लक्षांमुळे नगराध्यक्षांनी याबाबत प्रशासनाच्या कार्यपद्धतीविषयी सभेदरम्यान तीव्र नाराजी व्यक्त केली. बदलापूर पश्चिमेकडील सोनिवली येथे मोठय़ा प्रमाणात अनधिकृत घरे बांधण्यात आली असून त्यामुळे या भागात एक मोठी झोपडपट्टी तयार होत आहे, तसेच खरवई येथे तर चार-चार मजल्यांच्या इमारती अनधिकृतपणे उभ्या राहिल्या असल्याचे सांगून हे अनधिकृत बांधकाम कुणामुळे वाढत आहे असा सवाल करत नगराध्यक्षांनी प्रशासनाला धारेवर धरले.
अनधिकृत बांधकामांवर कारवाई करत नसतील तर अशा कर्मचाऱ्यांना घरी बसवा, अशी तंबी देत यापुढे शहरात अनधिकृत बांधकाम झाल्यास त्याबद्दल त्या विभागातील संबंधित अभियंत्याला जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, असे निर्देश त्यांनी प्रशासनास दिले.

‘काँक्रिटीकरण करण्यापूर्वी गटारे बांधा’
सिमेंट काँक्रिट रस्त्यांचे काम करताना पहिल्यांदा गटारे बांधून नंतर रस्ते व पदपथाचे काम करण्यात यावे. परंतु तसे होत नसून अशा रस्त्यांची कामे करताना प्रथम गटारांची आखणी करूनच काम करावे, असे नगराध्यक्षांनी प्रशासनाला निर्देश दिले. काँक्रिटकरण झालेल्या रस्त्यावर पाणी साचून राहते. त्यामुळे रस्त्यावर खड्डे पडत असून ही कामे सुरू असताना पालिकेचे अधिकारी  त्यठिकाणी उपस्थित असले पाहिजे, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.