News Flash

ऑर्केस्ट्रा बार छापा प्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई

नियम धाब्यावर बसवून राजरोसपणे बार सुरू असतानाही नौपाडा पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केले.

सुरवसे यांची नियंत्रण कक्षात बदली, तर उपनिरीक्षकाचे निलंबन
ठाणे येथील तीन पेट्रोल पंप भागातील जय श्रीकृष्णा (अँटिक पॅलेस) या ऑर्केस्ट्रा बारवर ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या विशेष पथकाने केलेल्या कारवाईमुळे बारमधील गैरकृत्य उजेडात आले होते. मात्र याच कारवाईमुळे अडचणीत आलेले नौपाडय़ाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम. डी. सुरवसे यांची नियंत्रण कक्षात तातडीने बदली करण्यात आली आहे, तर एका पोलीस उपनिरीक्षकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. ठाणे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या या कारवाईमुळे आयुक्तालय क्षेत्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
ठाणे येथील तीन पेट्रोल पंप भागात जय श्रीकृष्णा (अँटिक पॅलेस) ऑर्केस्ट्रा बार आहे. तेथे नियमापेक्षा अधिक महिलांना कामाला ठेवले जात असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक युनिटला मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक शकील शेख आणि त्यांच्या पथकाने २५ जानेवारी रोजी रात्री बारवर धाड टाकली होती. त्यामध्ये १४ महिला बारमध्ये सापडल्या होत्या. यापैकी सात मुलींना बारमधील छुप्या खोल्यांमध्ये लपवून ठेवण्यात आले होते. या खोल्यांसाठी रिमोटचा लोखंडी दरवाजा बसविण्यात आला होता आणि या खोल्या कुणाला कळू नयेत म्हणून दरवाजावर आरसा बसविण्यात आला होता. तसेच बारमध्ये गैरकृत्येही सुरू असल्याची बाबही कारवाईदरम्यान पथकाच्या निदर्शनास आली होती. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस ठाण्याच्या हद्दीत नियम धाब्यावर बसवून राजरोसपणे बार सुरू असतानाही नौपाडा पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केले. तसेच या बारवर कोणतीही कारवाई केली नाही. यामुळे ठाणे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी याप्रकरणी त्या दिवशी रात्रपाळीला कर्तव्यावर असलेले पोलीस उपनिरीक्षक गंगावणे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम.डी. सुरवसे यांची नियंत्रण कक्षात बदली केली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

खुर्चीच्या वादावर पडदा..
नौपाडय़ाचे वरिष्ठ पोलीस निरक्षक एम.डी. सुरवसे यांची बार प्रकरणामुळे तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली. यामुळे नौपाडा वरिष्ठ पोलीस निरीक्षकपद रिक्त झाल्याने त्या जागी पोलीस निरीक्षक मच्छिंद्र थोरवे यांची तात्पुरती नियुक्ती करण्यात आली. मात्र याच पोलीस ठाण्यात असलेले पोलीस निरीक्षक मनजीतसिंग बग्गा हे थोरवे यांना वरिष्ठ आहेत. यामुळे बग्गा यांनी त्यांच्या नियुक्तीवर आक्षेप घेतल्यामुळे वरिष्ठ निरीक्षकपदाच्या खुर्चीवरून त्यांच्यात वाद रंगला होता. ठाणे पोलीस आयुक्तालयात या वादाची चर्चा मोठय़ा चवीने चर्चिली जात आहे. दरम्यान, ही बाब लक्षात येताच ठाणे पोलिसांच्या प्रशासन विभागाने वरिष्ठ निरीक्षकपदावर बग्गा यांची तात्पुरती नियुक्त करून या वादावर अखेर पडदा टाकला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 3, 2016 12:02 am

Web Title: action on police officers for raided orchestra bar
टॅग : Police Officers
Next Stories
1 मुंब्रा-ठाणेदरम्यान रेल्वे अपघातात तीन बळी; दोन जखमी
2 ‘सीसीटीव्ही’च्या आधारे दोन चोर गजाआड
3 उत्तनमधील कचऱ्याचा धूर कायम
Just Now!
X