मागील दोन दिवसापासून डोंबिवलीत भंगार रिक्षांवर कारवाईची मोहीम उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी राबविण्यास सुरुवात केली आहे. या मोहिमेत २५ रिक्षाचालक तपासणी पथकाच्या जाळ्यात सापडले आहेत. रिक्षेचे आयुर्मान संपले तरी रिक्षा चालविण्यात येत असल्याने सक्षमता (फिटनेस) कायद्याचे उल्लंघन केल्याने परिवहन अधिकाऱ्यांनी अशा रिक्षाचालकांना लाखो रुपयांचा दंड ठोठावला आहे.

दंडाची रक्कम रिक्षेच्या किमतीएवढी असल्याने परिवहन अधिकाऱ्यांच्या जाळ्यात अडकायला नको, म्हणून अनके रिक्षाचालकांनी शहराच्या भोवतालच्या बेकायदा चाळी, गल्ली बोळात रिक्षा लपवून ठेवल्याचे चित्र दिसत आहे.

या सर्व रिक्षांचे वाहन क्रमांक आरटीओ अधिकाऱ्यांकडे आहेत. त्यामुळे अशा भंगार रिक्षा चालविणाऱ्या चालकांवर नियमित पाळत ठेवण्याचा निर्णय आरटीओ अधिकाऱ्यांनी घेतला आहे.

जोपर्यंत सव्वाशे भंगार रिक्षा आरटीओ कार्यालयात नष्ट केल्या जात नाहीत तोपर्यंत या रिक्षा शोधण्याची मोहीम सुरूच राहणार आहे, असे आरटीओ अधिकाऱ्यांनी सांगितले. दोन दिवसापासून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर नाईक, मोटार वाहन निरीक्षक सूर्यकांत गंभीर, प्रशांत शिंदे हे अधिकारी डोंबिवलीत सकाळच्या वेळेत येऊन अचानक रिक्षांची तपासणी करीत होते.

या जाळ्यात भंगार रिक्षाचालक, कागदपत्रांमध्ये त्रुटी असलेले चालक अलगद सापडत होते. ‘आरटीओ’ अधिकारी थेट दंडात्मक कारवाई करीत असल्याने बिथरलेल्या बेकायदा रिक्षाचालकांनी नस्ती आफत नको म्हणून रिक्षा दडवून ठेवणे पसंत केले आहे. रिक्षा संघटनेच्या कोणत्याही नेत्याने या कारवाईत हस्तक्षेप करून रिक्षाचालकांना वाचविण्याचा प्रयत्न केला नाही, असे सांगण्यात आले.

कल्याणमध्ये कारवाई

बुधवारी सकाळपासून कल्याण रेल्वे स्थानकाबाहेरील आगारासमोरील रिक्षाचालकांची तपासणी आरटीओ अधिकाऱ्यांनी सुरू केली आहे. तीन आसनी रिक्षांमध्ये चार प्रवासी घेऊन वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. एखादा रिक्षाचालक सतत चार प्रवासी वाहतूक करीत असल्याचे निदर्शनास आल्यास त्या रिक्षाचालकाचा परवाना काही काळासाठी निलंबित करण्याचा विचार करण्यात येत आहे. याबाबत वरिष्ठांचे मार्गदर्शन घेण्यात येणार आहे, असे मोटार वाहन निरीक्षक सूर्यकांत गंभीर यांनी सांगितले.