शहर स्वच्छतेचा ध्यास घेतलेल्या कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाने आता प्लॅस्टिक मुक्त कल्याण डोंबिवलीसाठी प्रयत्न सुरु केले आहेत. पन्नास मायक्रॉनपेक्षा कमी जाडी असलेल्या पिशव्या वापरणाऱ्या दुकानदारांवर महापालिकेच्या डोंबिवली विभागातील आरोग्य विभागाने कारवाई सुरु केली आहे.
दुकानात प्रवेश केल्यानंतर दर्शनी भागात प्लॅस्टिक पिशव्या ग्राहकाला देण्यासाठी टांगून ठेवल्या जातात. या पिशव्यांची मायक्रॉनमध्ये मोजणी करुन त्या जप्त करण्याची कारवाई पथकाकडून करण्यात येते. सकाळ, संध्याकाळ ही नियमित कारवाई डोंबिवलीतील बाजारपेठ विभागात करण्यात येत आहे. दुकानात प्लॅस्टिकची पिशवी मिळतेच, अशी पक्की खात्री ग्राहकाला असल्याने तो घरातून येताना कापडी पिशवी घेऊन येत नाही. शहर बकाल होण्याला, नाले तुंबण्याला प्लॅस्टिक पिशव्या हे एक मोठे कारण आहे. त्यामुळे प्लॅस्टिक पिशव्यांविरुध्द मोहिम सुरु करण्यात आली आहे, असे नरेंद्र धोत्रे यांनी सांगितले. वारंवार समज देऊनही जे व्यापारी प्लॅस्टिक पिशव्या ठेवत आहेत. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे, असे धोत्रे यांनी सांगितले.