लोकसत्ता खास प्रतिनिधी

ठाणे : शहरात करोना विषाणूचा संसर्ग आटोक्यात आला असला तरी शहरात डेंग्यू आणि मलेरिया यांसारख्या साथीच्या आजारांनीही डोके वर काढू नये यासाठी पालिका प्रशासनाने खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून संशयित रुग्णांची योग्य तपासणी तसेच नियमित औषध फवारणी करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिले असून त्याची अंमलबजावणी महापालिकेच्या पथकांनी सुरू केली आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्याबरोबर इतर साथीच्या आजारांनी डोके वर काढू नये यासाठी प्रशासनाकडून गेल्या काही महिन्यांपासून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचे सकारात्मक परिणाम आता दिसू लागले आहेत. त्यामुळे शहरात सद्य:स्थितीत करोनाचा संसर्ग आटोक्यात असल्याचे चित्र आहे. त्याचबरोबर करोनाकाळात डेंग्यू आणि मलेरिया हे साथीचे आजार आटोक्यात असल्याचे चित्र आहे. मात्र, येत्या काळात करोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून प्रशासनाने उपाययोजना करण्याचे काम सुरूच ठेवले आहे. त्याचबरोबर डेंग्यू आणि मलेरिया या साथीच्या आजारांनीही डोके वर काढू नये यासाठी प्रशासनाने खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे.सप्टेंबर महिन्यात डेंग्यूची लागण झालेला एक रुग्ण तर, मलेरियाचे ४० रुग्ण आढळून आले होते.  तसेच ऑक्टोबर महिन्यामध्ये डेंग्यूचा एकही संशयित रुग्ण सापडलेला नसून लागण झालेले २ रुग्ण तर मलेरियाचे ३४ रुग्ण आढळून आले होते. असे असले तरी करोनाकाळात डेंग्यू आणि मलेरिया आजारांचे रुग्ण वाढू नयेत यासाठी संशयित रुग्णांची योग्य तपासणी तसेच नियमित औषध फवारणी करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी आरोग्य विभागाला दिले होते.

घरांतील पाणी दूषित

शहरातील एकूण ३२ हजार ६५० घरांतील पाण्याची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी १२१० घरांमधील पाणी दूषित आढळून आले. तसेच घरात पाणी साठवून ठेवलेल्या एकूण ४९ हजार ७२६ भांडय़ाची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी १ हजार १९७ भांडय़ात पाणी दूषित आढळून आले. या सर्वच ठिकाणी पालिकेने अळीनाशक औषध फवारणी केली आहे.