निवासी वसाहतींच्या पदाधिकाऱ्यांना दक्षता घेण्याच्या पोलिसांच्या सूचना

ठाणे : होळीच्या पाश्र्वभूमीवर गच्चीवरून फुगे फेकून पादचाऱ्यांना भांडावून सोडणाऱ्यांवर कायदेशीर करावाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. या प्रकारांना आळा बसावा म्हणून निवासी संकुलांच्या पदाधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी, अशा सूचनाही करण्यात आल्या आहेत. गस्ती पथके नेमण्यात आली आहेत.

इमारतींच्या गच्चीवरून पाणी भरलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या पादचाऱ्यांच्या दिशेने भिरकावल्यास इजा होण्याची भीती असते. अशा घटना यापूर्वी घडल्या आहेत. गेल्या काही वर्षांपासून या प्रकारांना पायबंद घालण्यासाठी पोलीस खबरदारी घेऊ लागले आहेत.

यंदा ठाणे पोलिसांनी प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन ते चार कर्मचाऱ्यांची पथके नेमली आहेत. ही पथके गृहसंकुलात जाऊन तेथील पदाधिकाऱ्यांना सूचना देत आहेत. पाणी भरलेल्या पिशव्या फेकल्याचे आढळल्यास केल्या जाणाऱ्या कारवाईची माहितीही पोलीस पथके रहिवाशांना देत आहेत.

गस्तीत वाढ

पोलीस पथकांनी रस्त्यांवर गस्त घालण्यास सुरुवात केली आहे. तीन ते चार पोलीस कर्मचारी पायी तर काही पोलीस दुचाकीवरून गस्त घालत आहेत. ही पथके महिलांची छेड काढून उत्सवाचा बेरंग करणाऱ्यांना लगाम घालणार आहेत. वागळे इस्टेट, लोकमान्यनगर, सावरकरनगर तसेच वर्तकनगर परिसरातील ठरावीक भागांमध्ये गस्त वाढविण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

फुगाफेकीस आळा बसावा यासाठी ठाणे पोलीस प्रत्येक वसाहतीच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेत आहेत. या प्रकारांना पायबंद घालण्यासाठी रहिवाशांनीच पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले आहे. फुगे फेकल्यास कठोर कारवाई केली जाईल.

– दीपक देवराज, उपायुक्त, गुन्हा अन्वेषण शाखा