News Flash

वृत्तपत्रे विक्रेत्यांना रोखणाऱ्या गृहसंकुलांवर कारवाई सुरू

ठाणे जिल्हा उपनिबंधकांकडून नोटिसा

ठाणे जिल्हा उपनिबंधकांकडून नोटिसा

ठाणे : गृहसंकुलांमध्ये येणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांना रोखू नका, या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या आठ गृहसंकुलांच्या पदाधिकाऱ्यांना जिल्हा उपनिबंधक विभागाने शुक्रवारी नोटिसा पाठवून स्पष्टीकरण मागवले. या नोटिसींनंतरही वृत्तपत्र विक्रेत्यांना मज्जाव केल्यास संबंधित पदाधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांची समिती बरखास्त करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

करोना टाळेबंदी जूनमध्ये शिथिल करण्यात आली. त्यानुसार ७ जूनपासून वृत्तपत्र वितरणास परवानगी देण्यात आली होती. वृत्तपत्रांमुळे करोना संसर्ग होत नसल्याचे केंद्र शासनाने स्पष्ट केले आहे. तरीही गृहसंकुलाचे पदाधिकारी वृत्तपत्रामुळे करोना संसर्ग होण्याची भीती दाखवून वृत्तपत्र वितरणास विरोध करीत होते. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील यांनी गृहनिर्माण संस्थांनी वृत्तपत्र विक्रेत्यांना गृहसुंकलात येण्यास मज्जाव करू नये, असे स्पष्ट केले होते. तसेच केंद्र आणि राज्य शासनाच्या आदेशांची माहिती गृहनिर्माण संस्थांना देण्याच्या सूचना त्यांनी जिल्हा उपनिबंधकांना केल्या होत्या. त्यानुसार जिल्हा उपनिबंधक शहाजी पाटील यांनी लेखी आदेश काढून त्यात गृहसंकुलांमध्ये वृत्तपत्रे वितरणास येणाऱ्या विक्रेत्यांना रोखू नका, असे आदेश दिले होते. मात्र, काही पदाधिकारी या आदेशाचे पालन करण्यास टाळाटाळ करत होते.

याबाबत गृहसंकुलातील सभासद तसेच ‘ठाणे शहर वृत्तपत्र विक्रेता असोसिएशन’चे अध्यक्ष दत्ता घाडगे यांनी उपनिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्याची दखल घेऊन ठाणे शहराचे उपनिबंधक विशाल जाधवर यांनी संबंधित पदाधिकाऱ्यांना नोटिसा पाठवून स्पष्टीकरण मागविले आहे. तसेच काही पदाधिकाऱ्यांशी मोबाइलवर संपर्क साधून त्यांना समजही दिली आहे. टपाल सुरू असले तरी नोटीस पाठवण्यात अडचणी आहेत. त्यामुळे शुक्रवारी आठ गृहसंस्थांच्या पदाधिकाऱ्यांना व्हॉट्सअ‍ॅपवर नोटिसा पाठविण्यात आल्याची माहिती उपनिबंधक विभागातून देण्यात आली.

तक्रारी शहरी भागांतून

ठाण्यातील वृंदावन, वर्तकनगर, ढोकाळी, कोलशेत, माजिवाडा, टिकूजीनी वाडी आणि घोडबंदर परिसरातील इतर भागांतील गृहसंकुलांमध्ये वृत्तपत्र विक्रेत्यांना येण्यास मज्जाव केला जात असून याबाबत उपनिबंधक विभागाकडे तक्रारी येऊ लागल्या आहेत. असे असले तरी ठाणे शहर वगळता जिल्ह्य़ाच्या अन्य भागांतून अद्याप अशा तक्रारी आलेल्या नाहीत, असे जिल्हा उपनिबंधक कार्यालयातून सांगण्यात आले.

प्रशासकांकडून आदेशाचे उल्लंघन

ठाणे येथील पोखरण रोड भागातील उन्नती गार्डनमधील एका सोसायटीमध्ये नेमलेल्या प्रशासकाने वृत्तपत्र वितरणास मज्जाव केल्याची तक्रार संकुलातील सदस्य महेश राऊत यांनी जिल्हा उपनिबंधक विभागाकडे केली आहे. जिल्हा उपनिबंधकांच्या आदेशाचे उल्लंघन होऊनही अद्याप काहीच कारवाई झालेली नसल्याचे राऊत यांनी सांगितले.

ठाणे शहरात काही गृहनिर्माण संस्था वृत्तपत्र विक्रेत्यांना मज्जाव असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. याबाबत संबंधित पदाधिकाऱ्यांना शुक्रवारी नोटिसा पाठवून स्पष्टीकरण मागविण्यात आले आहे. काही संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना मोबाइल संदेशाद्वारे वृत्तपत्रे वितरणास आडकाठी करू नये, असे निर्देश दिले आहेत. आता त्या संकुलांत विक्रेत्यांची अडवणूक होत नाही. मात्र, यानंतरही असे प्रकार घडल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.

– विशाल जाधवर, उपनिबंधक, ठाणे शहर.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 4, 2020 4:49 am

Web Title: action taken on housing complexes for stopping newspaper vendors zws 70
Next Stories
1 VIDEO: दीपेश म्हात्रेंचा आगरी समाजातील तरुणांना संदेश
2 नोकरदारांना दिलासा
3 ठाण्यात २३४ वाहने जप्त
Just Now!
X