02 March 2021

News Flash

पोखरण रस्त्याचा निश्वास!

आयुक्त टी चंद्रशेखर यांच्या कार्यकाळात शहरातील रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात आले.

कॅडबरी जंक्शन ते शास्त्रीनगपर्यंतच्या रस्त्याच्या कामात अडथळे ठरणारी बेकायदा बांधकामे पाडण्याची कारवाई ठाणे महापालिकेने मंगळवारी सकाळपासून हाती घेतली. त्यामुळे पोखरण रस्त्याच्या रुंदीकरणाचा मार्ग मोकळा झाला असून यामुळे या मार्गावरील प्रवास वेगवान होणार आहे. (छायाचित्र : गणेश जाधव)

कॅडबरी जंक्शन ते शास्त्रीनगर रस्त्यावरील बेकायदा बांधकामांवर कारवाई
गेल्या काही वर्षांपासून वाहतूक कोंडीच्या जंजाळात सापडलेल्या कॅडबरी जंक्शन ते शास्त्रीनगर पर्यंतच्या रस्ता रुंदीकरणाच्या कामात अडथळे ठरणारी बेकायदा बांधकामे पाडण्याची कारवाई ठाणे महापालिकेने मंगळवारी सकाळपासून हाती घेतली. पोलिसांच्या मोठय़ा फौजफाटय़ासह महापालिकेच्या पथकाने येथील बांधकामांवर हातोडा चालविण्यास सुरुवात करताच काही दुकानदारांनी स्वत:हून पुढाकार घेत बांधकाम पाडण्यास सुरुवात केल्याचे चित्र पाहाव्यास मिळाले. एकाच वेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूची बांधकामे हटविण्याची कारवाई सुरू झाल्यामुळे पोखरण रस्त्याच्या रुंदीकरणाचा मार्ग मोकळा झाला असून यामुळे कॅडबरी जंक्शनपासून शिवाईनगपर्यंतचा प्रवास वेगवान होणार आहे.
ठाणे महापालिकेचे तत्कालीन आयुक्त टी चंद्रशेखर यांच्या कार्यकाळात शहरातील रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात आले. या कामांसाठी अनेक बांधकामे पाडण्यात आली होती. या रुंदीकरणाच्या कामांमुळे शहरातील रस्ते मोठे झाले होते. ही कामे होऊन आता सुमारे सुमारे २० वर्षांचा कालावधी लोटला आहे. गेल्या काही वर्षांत शहराचे मोठय़ा प्रमाणावर नागरीकरण झाले असून शहरातील लोकसंख्येच्या तुलनेत रस्ते अपुरे पडू लागले आहेत. या काळात रस्त्याच्या कडेला मोठय़ा प्रमाणावर बांधकामे उभी राहिली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांच्या रुंदीकरणास फारसा वावही राहिलेला नाही. अशीच काहीशी अवस्था कॅडबरी
जंक्शन ते शिवाईनगपर्यंत असलेल्या पोखरण रस्त्याची झाली आहे. सद्य:स्थितीत २४ मीटर लांबीचा हा रस्ता आहे. वर्तकनगर, लोकमान्यनगर, समतानगर, वसंतविहार तसेच घोडबंदर भागात जाण्यासाठी अनेक जण या मार्गाचा वापर करतात. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून या मार्गावर मोठी कोंडी होऊ लागली आहे. शिवाईनगर, वर्तकनगर आणि कॅडबरी चौकात अक्षरश: वाहनांच्या रांगा लागतात. त्यामुळे स्थानिक नागरिकांसह या मार्गावरील प्रवासी हैराण झाले आहेत. या पाश्र्वभूमीवर ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी पोखरण मार्गावरील कोंडी फोडण्यासाठी रुंदीकरणाचा निर्णय घेतला होता. त्यानुसार रस्ता दोन्ही बाजूंनी २३ ते ३० फुटांनी वाढविण्यात येणार आहे. या रूंदीकरणात अडथळा ठरणारी बांधकामे हटविण्याचा निर्णय घेत आयुक्त जयस्वाल यांनी दुकानदारांना साहित्य दुसऱ्या ठिकाणी हलविण्यासाठी पंधरा दिवसांची मुदत दिली होती. ती संपताच उर्वरित बांधकामे पाडण्याची कारवाई सुरू करण्यात आली.

विरोध नाही, मात्र गर्दीमुळे कोंडी
वर्तकनगर नाक्यावर जेसीबीच्या साहाय्याने बांधकामे तोडण्यात येत होती. रस्त्याच्या दुर्तफा असलेली गाळे आणि इमारतीचे बांधकाम तोडण्यात येत होते. या कारवाईसाठी परिसरात मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. समतानगर, वर्तकनगर, शिवाईनगर या भागात पथकाकडून एकाच वेळी दोन्ही बाजूची बांधकामे तोडण्याची कारवाई सुरू होती. या कारवाईमुळे परिसरात तणावाचे वातारण होते मात्र, नागरिकांकडून कारवाईला फारसा विरोध होताना दिसून आला नाही. ही कारवाई पाहण्यासाठी दुकानदार आणि परिसरातील नागरिकांनी गर्दी केल्यामुळे या मार्गावर वाहनांची कोंडी झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले. तसेच महापालिकेच्या पथकाकडून सुरू असलेल्या कारवाईचे स्वरूप पाहून उर्वरित दुकानदारांनी बांधकामे तोडण्यास सुरुवात केल्याचे दिसून आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 13, 2016 2:23 am

Web Title: action taken on illegal constructions from cadbury junction to shastri road
टॅग : Illegal Constructions
Next Stories
1 हलव्याच्या दागिन्यांवर यंदा ‘संक्रांत’ नाही!
2 गुन्हेगारीच्या मुळाशी बेकायदा बांधकामे
3 तळे बुजविलेल्या जमिनीवर मीरा-भाईंदरचे नवे मुख्यालय?
Just Now!
X