कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील नाल्यांमध्ये कचरा टाकणारे बांधकाम ठेकेदार तसेच रहिवाशांविरोधात गुन्हे दाखल करण्याचा इशारा महापालिका आयुक्त मधुकर अर्दड यांनी दिला आहे. शहरातील नालेसफाईची ६० टक्क्यांहून अधिक कामे मार्गी लागली असली तरी ४० टक्के नाले अजूनही गाळात असल्याने यंदाही पावसाळय़ात नाले तुंबून पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची भीती आहे.
महापालिकेचे आयुक्तमधुकर अर्दड यांनी मंगळवारी नालेसफाईच्या कामांची पाहणी केली. त्या वेळी मिलिंदनगर, शहाड येथील अंबिकानगर नाल्यांमध्ये काही मार्बल व्यावसायिकांनी मोठय़ा प्रमाणावर बांधकाम साहित्याची घाण टाकल्याचे निदर्शनास आले. काही ठिकाणी सफाई सुरू असली तरी डेब्रिजने भरलेल्या नाल्यांची सफाई करणे अवघड बनल्याचे दिसून आले. त्यामुळे नाल्यांत बांधकाम कचरा टाकणाऱ्या ठेकेदारांविरोधात तातडीने गुन्हे दाखल करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. नालेसफाई झाल्यानंतरही काही नागरिकांकडून नाल्यांमध्ये कचरा, घाण टाकली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे कचरा टाकणाऱ्या रहिवाशांवरही कारवाई करण्याचा इशारा आयुक्तांनी दिला आहे.