News Flash

एकाकी ज्येष्ठांना सामाजिक संस्थेचा आधार

समुपदेशनासह औषधोपचारासाठीही मदत

समुपदेशनासह औषधोपचारासाठीही मदत

पूर्वा साडविलकर, लोकसत्ता

ठाणे : गगनचुंबी इमारतींमधील फ्लॅटबंद संस्कृतीतील घरे, मुले परदेशात स्थायिक असल्याने पदरी आलेले एकाकी जीवन आणि सध्याचा करोना काळ यांमुळे ज्येष्ठ नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. हीच गोष्ट हेरून ठाण्यातील ‘वी आर फॉर यू’ या संस्थेचे कार्यकर्ते ज्येष्ठांच्या मदतीला धावून आले आहेत. या संस्थेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांचे समुपदेशन, तसेच कोणी करोनाबाधित आढळल्यास त्यांना रुग्णशय्या उपलब्ध करून देणे, त्यांच्या जेवणाची सुविधा तसेच करोनामुळे मृत्यू झालेल्या नागरिकांचे त्यांच्या अस्थी विसर्जन करण्याचे काम करण्यात येत आहे.

करोनाच्या दुसऱ्या लाटेत संसर्गाचे आणि मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. वाढत्या संसर्गामुळे एक प्रकारचे नकारात्मक वातावरण सगळीकडे निर्माण झाले आहे. याचा सर्वाधिक परिणाम हा ज्येष्ठ नागरिकांच्या मनावर होताना दिसत आहे. शहरातील नौपाडा, घोडबंदर, लोकमान्य- सावरकर नगर अशा विविध भागात एकटे राहाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची संख्या बरीच मोठी आहे. मुले परदेशात स्थायिक झाल्याने अनेक वृद्ध दाम्पत्यांना एकटेच रहावे लागते. अशा नागरिकांना विरंगुळय़ासाठी शहरातील सांस्कृतिक कट्टे, वाचनालये, उद्याने या ठिकाणांचा आधार वाटत असे. मात्र, करोनामुळे त्यांच्या सामाजिक, सांस्कृतिक भेटीगाठींवर मर्यादा आल्या. याचा विपरीत परिणाम ज्येष्ठांच्या मानसिक अवस्थेवर होऊ लागला आहे. याशिवाय टाळेबंदीमुळे घरातील विविध कामांसाठीच्या मदतीचाही प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. सध्या घरात एकटे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना अशा प्रकारच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. याची दखल घेऊन ठाण्यातील ‘वी आर फॉर यू’ या संस्थेचे किरण नाकती आणि त्यांचे सहकारी गेल्या एक वर्षांपासून ज्येष्ठ नागरिकांना मदत करून त्यांना मानसिक आधार देत आहेत. शहरातील विविध प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांचे घरोघरी जाऊन या संस्थेतर्फे समुपदेशन करण्यात येत आहे. एखादे ज्येष्ठ नागरिक करोनाबाधित झाल्यास त्यांना चांगली उदाहरणे देऊन खंबीर करण्यात येते. तसेच काहींना व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून समजावण्यात येते, असे किरण नाकती यांनी सांगितले.

 अस्थींचेही विसर्जन

ठाण्यात राहणाऱ्या एका ८० वर्षीय व्यक्तीचे त्यांच्या ७२ वर्षीय बहिणी सोबत राहतात. हे दोघे अविवाहित आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांना करोनाची लागण झाली होती. यामध्ये ८० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला, तर त्यांच्या बहिणीवर एका रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यामुळे ८० वर्षीय व्यक्तीचा अंत्यविधीचा प्रश्न निर्माण झाला होता. या दोघांच्या लांबच्या नातेवाईकांकडूनही कोणतीही मदत मिळाली नव्हती. अखेर या व्यक्तीच्या बहिणीने या संस्थेला संपर्क साधून अस्थींचे विसर्जन करण्याची विनंती केली. त्यानुसार संस्थेने ८० वर्षीय व्यक्तीच्या अस्थींचे विसर्जन केले.

मदतीचे हात

* तीन ते चार दिवसापूर्वी घोडबंदर भागात राहणाऱ्या एक ज्येष्ठ नागरिक करोनाबाधित झाले होते. त्यांचा अहवाल जेव्हा करोना सकारात्मक आला तेव्हा ते घरात एकटे होते. त्यावेळी त्यांची प्राणवायूची पातळी कमी झाली आणि ते बेशुद्ध झाले. त्यामुळे ते घरात अडकून राहिले होते. ही माहिती आजूबाजूच्या रहिवाशांनी बोरिवलीला राहणाऱ्या त्यांच्या मुलीला तसेच ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाला दिली. आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी येऊन त्या ज्येष्ठ नागरिकांना घरातून सुखरूप बाहेर काढले आणि त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

* ठाण्यातील खारटन भागात ८२ वर्षांच्या आजी आपल्या १२ वर्षांच्या नातवासोबत राहत आहेत. त्या आजींची काही दिवसापूर्वी अचानक तब्येत बिघडली. त्यांना त्वरित रुग्णालयात नेण्याची गरज होती. मात्र, नातू एकटाच घरात असल्याने त्यांना रुग्णालयात कसे न्यायचे, असा प्रश्न निर्माण झाला. तेव्हा त्यांनी ‘वी आर फॉर यू’ या संस्थेला संपर्क साधला. संस्थेतील सदस्यांनी त्या ठिकाणी येऊन त्या आजींना रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी त्या करोनाबाधित असल्याचे आढळून आले. त्वरित त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 21, 2021 2:55 am

Web Title: activists of we are for you organisation rushed to the aid of old in covid crisis zws 70
Next Stories
1 ‘त्या’ प्रवेशद्वाराच्या कमानीचे काम थांबवले
2 हाजीमलंगच्या पायथ्याशी पुन्हा रसायनांचे पिंप
3 ठाण्यात आज पालिकेच्या एकाच केंद्रावर लसीकरण
Just Now!
X