अश्विनी कासार, अभिनेत्री

मानवाला जगण्यासाठी जशी आणि जितकी प्राणवायूची आवश्यकता असते तितकीच माझ्या आयुष्यात पुस्तके महत्त्वाची आहेत. पुस्तके माझा श्वास आहेत. पुस्तकांमुळे मला कायम बौद्धिक खाद्य मिळते. त्यामुळे माझे विचार प्रगल्भ होतात. मला लहानपणापासूनच पुस्तकांची प्रचंड आवड आहे. बदलापूर येथील ‘आदर्श विद्यामंदिर’ या मराठी शाळेत शिकत असताना मला खऱ्या अर्थाने वाचनाची गोडी लागली. कारण शाळेतील सर्व शिक्षक आम्हा विद्यार्थ्यांकडून अवांतर वाचन करून घेत होते. शाळेत असताना मराठी विषयाच्या शिक्षिका गर्गे मॅडम यांनी मला ‘वाचनातला’ ‘अ’ शिकवला. त्या आम्हाला लहानपणी अभ्यासातील एखादा धडा शिकवल्यानंतर त्या लेखकाची अन्य पुस्तके वाचायचा सल्ला देत असत. एखादा उतारा वाचून झाल्यावर त्याचा सखोलपणे मागोवा कसा घ्यायचा हे मला गर्गे मॅडमनीच शिकवले. प्रत्येक पुस्तकागणिक माझ्या ज्ञानात नवी भर पडते. जग किती विशाल आणि अमर्याद आहे, याची मला जाणीव होते. मी माझे वाचन कोणत्याही एका विषयापुरते मर्यादित ठेवलेले नाही. जे जे चांगले आहे, ते मी वाचते. मात्र सर्वात आवडता वाङ्मय प्रकार विचाराल तर मी कादंबरीची निवड करेन. कारण कादंबरीचा कॅनव्हॉस खूप मोठा असतो. त्यामुळे विचारांच्या कक्षा रुंदावतात. किशोर अथवा तरुणवयात बहुतेक सर्वानाच शिवाजी सावंत यांची महाभारतातील कर्ण या व्यक्तिरेखेचे चरित्र मांडणारी ‘मृत्युंजय’ कादंबरी आवडते. मीसुद्धा त्या कादंबरीने प्रभावित झाले. मी ‘मृत्युंजय’ सात वेळा वाचून काढली आहे. गौरी देशपांडे यांचे ‘तेरुओ आणि काही दूपर्यंत’ हे पुस्तक वाचलेलं आहे. मला गुलजारांचा ‘त्रिवेणी’ हा कवितासंग्रहही खूप आवडतो. कारण त्यात रोजच्या आयुष्यातील घटना अतिशय रंजक पद्धतीने मांडण्यात आल्या आहेत.

‘कमला’ या मालिकेत मी मुख्य भूमिका साकारली. ती साकारण्यापूर्वी मी विजय तेंडुलकर यांनी लिहिलेली ‘कमला’ कादंबरी पूर्ण वाचली. कारण तेंडुलकरांना अभिप्रेत असलेली कमला मला जशीच्या तशी साकारायची होती. अतिशय नेमकी, सोपी आणि थेट अनुभवाला भिडणारी तेंडुलकरांची लेखनशैली मला अतिशय आवडते. कादंबरी वाचल्यामुळे मला ‘कमला’ साकारणे सोपे गेले. वाचनासाठी मला वेगळा असा वेळ काढावा लागत नाही. माझ्यासोबत नेहमीच एखादे पुस्तक असते आणि जेव्हा कधी वेळ मिळतो, तेव्हा मी ते वाचते. अभिनय क्षेत्रात असल्यामुळे सेटवर तसेच सहकलाकारांसोबत माझी वाचनाविषयी चर्चा होते. मला पुस्तके शेअर करायलाही आवडतात. मी अनेकांना त्यांच्या वाढदिवशी त्यांना आवडणारी पुस्तके भेट देते. कुठे पुस्तकांविषयी चर्चा सुरू असेल, तर मी त्यात भाग घेते. शांता शेळके यांचे ‘चौघीजणी’ या पुस्तकाविषयी एक हृद्य आठवण आहे. माझ्या संग्रही असलेले हे पुस्तक बहिणीने तिच्या मैत्रिणीला दिले. मात्र नंतर ती ते विसरली. पुस्तक नेमके कुणाला दिलेय, हेही तिच्या लक्षात येईना. मला थोडे वाईट वाटले. कारण बहिणींची गोष्ट असणारे एक पुस्तक एका बहिणीनेच हरविले होते. मात्र काही दिवसांनंतर जेव्हा ते पुस्तक सापडले, तेव्हा मला दुरावलेला जिवाभावाचा एखादा मित्र बऱ्याच काळानंतर भेटावा, असे वाटले.

हल्ली मी पुस्तके कुणाला दिली, हे नेहमी लिहून ठेवते. सध्या माझ्या बुकशेल्फमध्ये एक हजारांहून अधिक पुस्तके आहेत. त्यात सर्व वाङ्मय प्रकारांचा समावेश आहे. त्यात बालवाडीपासून दहावीपर्यंतच्या पुस्तकांचाही समावेश आहे. संदर्भासाठी ही पुस्तके मला अतिशय उपयोगी ठरतात. अनेकदा पुस्तकातील महत्त्वाचे उतारे मी नोंदवून ठेवते.

अतिशय आवडलेली, मनात घर करून राहिलेली तशी अनेक पुस्तके आहेत. त्यांची यादी खूप मोठी होईल. मात्र त्यापैकी मोजक्यांचा उल्लेख करणे तसे कठीण आहे. मात्र तरीही गौरी देशपांडे यांचे ‘मुक्काम’, चंद्रिके गं सारिके गं, रणजीत देसाई यांच्या स्वामी ,राधेय या कादंबऱ्या, वि.स.खांडेकरांची ‘ययाती’, महेश एलकुंचवार यांची ‘युगांत’, वाडा चिरेबंदी , मग्न तळ्याकाठी, रमेश इंगळे यांची ‘निशाणा डावा अंगठा’, आयर्न रँन्ड यांची फाऊंटन हेड, विजया मेहता यांची झिम्मा, व्यंकटेश माडगूळकरांचे पांढऱ्यावर काळे, रामचंद्र पटवर्धनांची ‘पाडस’, आनंद यादवांची ‘झोंबी’, लक्ष्मण माने यांची उपरा, कविता महाजन यांची ‘ब्र’, भिन्न, व.पु.काळे  यांची वपूर्झा, पार्टनर, जयंत नारळीकर यांचे ‘अंतराळातील भस्मासुर’ यांसारखी अनेक पुस्तके वाचलेली आहेत. मला इलेक्ट्रॉनिक गॅझेटस्पेक्षा प्रत्यक्ष पुस्तक हातात धरून वाचायला अधिक आवडते.