21 October 2018

News Flash

स्वच्छ अंबरनाथची अपेक्षा

आवडते हिंदी चित्रपट - ‘आनंद’, ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’, ‘लम्हें’

आपल्या मनाजोगत्या चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन करण्याचे निश्चित ठरविणारे कलावंत अशी वेगळी ओळख लेखक-दिग्दर्शक-अभिनेता महेंद्र पाटील यांनी निर्माण केली आहे.

लेखक-दिग्दर्शक-अभिनेता
महेंद्र पाटील

आपल्या मनाजोगत्या चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन करण्याचे निश्चित ठरविणारे कलावंत अशी वेगळी ओळख लेखक-दिग्दर्शक-अभिनेता महेंद्र पाटील यांनी निर्माण केली आहे. त्यांच्या संवादलेखनाचा पहिला चित्रपट ‘आम्ही चमकते तारे’. रंगतसंगत या स्वत: स्थापन केलेल्या नाटय़संस्थेतर्फे त्यांनी केलेल्या एकांकिका ‘अंधारवाट’, ‘गुरुदक्षिणा’, ‘हे तर होणारच होतं’, ‘आम्ही बि घडलो तुम्ही बी घडा ना’ गाजल्या. अंबरनाथमध्ये सध्या सुरू असलेल्या अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सवाचे कार्यक्रम संचालक म्हणून महेंद्र पाटील काम करीत आहेत. आपल्या स्वामी पुष्प क्रिएशन या प्रॉडक्शन हाऊसतर्फे जाहिरातींची निर्मिती करतानाच त्यांनी चार चित्रपटांचे संवादलेखन केले आहे. ‘एक होती राणी’, ‘कलाकेंद्र’, ‘श्यामची शाळा’ आणि ‘चाहतो मी तुला’ असे त्यांचे चार मराठी चित्रपट आगामी सहा महिन्यांत प्रदर्शित होणार आहेत. दिवंगत संगीतकार आनंद मोडक यांच्या मार्गदर्शनाबरोबरच अमृता हिंदुराव, नेहा जोशी, प्रवीण चौधरी, प्रकाश भामरे या आपल्या मित्रमैत्रिणींनी आपल्याला कला कारकीर्दीत नेहमीच पाठिंबा दिला असे महेंद्र पाटील आवर्जून नमूद करतात.

’ आवडते मराठी चित्रपट – ‘गजर’, ‘क्षण’, ‘दे दणादण’
’ आवडते हिंदी चित्रपट – ‘आनंद’, ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’, ‘लम्हें’
’ आवडती नाटकं – ‘तक्षकयाग’, ‘प्रेमाच्या गावा जावे’, ‘चार दिवस प्रेमाचे’
’ आवडते अभिनेते – नाना पाटेकर, अमिताभ बच्चन, लक्ष्मीकांत बेर्डे
’ आवडत्या अभिनेत्री – माधुरी दीक्षित, स्मिता पाटील, काजोल, सोनाली कुलकर्णी सिनीयर
’ आवडते दिग्दर्शक – यश चोप्रा, गजेंद्र अहिरे, मंदार देवस्थळी, मंगेश कदम
’ आवडते नाटककार – रत्नाकर मतकरी, प्र. ल. मयेकर, अभिराम भडकमकर
’ आवडलेल्या भूमिका – लम्हें मधील श्रीदेवी, अनिल कपूर यांच्या भूमिका, अमिताभ बच्चनची ‘विजय दीनानाथ चौहान’ ही व्यक्तिरेखा, राजेश खन्नाची ‘आनंद’ ही भूमिका
’ आवडलेली पुस्तकं – ‘मृत्युंजय’, कवी ग्रेस यांचे सर्व कवितासंग्रह
’ आवडते सहकलावंत – प्रसाद ओक, भरत जाधव , अनिकेत विश्वासराव, प्रिया बेर्डे
’ आवडते खाद्यपदार्थ – मिसळ पाव,
’ आवडता फूडजॉइण्ट – अंबरनाथ पूर्व येथील ‘बुवाचा वडा’
’ आवडतं हॉटेल – अंबरनाथमधील ‘साईसागर’
’ अंबरनाथविषयी थोडेसे : माझा जन्म, बालपण, शालेय शिक्षण सगळेच अंबरनाथचे आहे. त्यामुळे मी अस्सल अंबरनाथकर आहे. ज्या जुन्या वंदना चित्रपटगृहात ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ हा माझा सर्वात आवडता चित्रपट पाहिला आणि दिग्दर्शन करण्याची मला प्रेरणा मिळाली त्याच ठिकाणी आज बिग सिनेमा मल्टिप्लेक्स चित्रगृह उभे असून तिथेच भरलेल्या अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सवाचा मी कार्यक्रम संचालक झालो यातच अंबरनाथचे महत्त्व माझ्या आयुष्यात किती आहे हे अधोरेखित होते. अंबरनाथ परिसरात खूप बदल झाले त्याचा मी साक्षीदार आहे. माझी जडणघडणच अंबरनाथमध्ये झाली आहे. त्यामुळे स्वाभाविकच अंबरनाथ शहराशी माझे ऋणानुबंध जुळलेले आहेत आणि ते कायम राहणार आहेत. अंबरनाथ सोडून अन्यत्र कुठे राहायला जाण्याचा विचारही मला करवत नाही. कलावंतांना पोषक वातावरण तयार करण्याच्या दृष्टीने साहित्य पार्क, संगीत पार्कची उभारणी झाली आहे. आता नजीकच्या काळात नाटय़गृहही सुरू केले जाणार आहे हा चांगला बदल अंबरनाथमधील कलावंतांच्या दृष्टीने झाला आहे. गेल्या काही वर्षांत रस्तेही थोडय़ाफार प्रमाणात सुधारले असले तरी नगरपालिकेकडून आणखी चांगले रस्ते तयार करण्याची तसेच सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे अंबरनाथ परिसर स्वच्छ ठेवण्याची अपेक्षा मी नक्कीच करू इच्छितो.

शब्दांकन : सुनील नांदगावकर

 

First Published on October 31, 2015 1:18 am

Web Title: actor director mahendra patil expecting clean ambernath
टॅग Mahendra Patil