News Flash

नामवंतांचे बुकशेल्फ : पुस्तकांनी जगणे शिकविले

आजही ऐतिहासिक आणि पौराणिक वाचन करायला मला अधिक आवडते.

 

सुनील गोडसे, अभिनेते

माझी आई शिक्षिका असल्याने घरात शिक्षणाचे वातावरण तर होतेच, परंतु त्याचसोबत वाचनाचेही संस्कार होते. त्यामुळे शिक्षण आणि वाचनामुळे मला पुस्तकांची गोडी लावली. ठाण्याच्याच न्यू इंग्लिश शाळेत असताना वक्तृत्व, अभिनय अशा स्पर्धामध्ये नेहमीच भाग घ्यायचो.  सुरुवातीच्या काळात आपली शब्दसंपत्ती प्रभावी करण्यासाठी मला पुस्तकांची मदत घ्यावी लागली. माझी शरीरयष्टीही चांगलीच बेताची असल्याने लहानपणापासूनच मला ऐतिहासिक नाटकांमध्ये किंवा ऐतिहासिक काळातील एखादे पात्र रंगवायला अधिक आवडायचे. त्यामुळे आपोआपच ऐतिहासिक वाचनावर माझा अधिक कला होता. तेव्हापासून माझ्या ऐतिहासिक वाचनाला सुरुवात झाली. आजही ऐतिहासिक आणि पौराणिक वाचन करायला मला अधिक आवडते. सध्या माझ्या घरात अनेक पुस्तकांचा संग्रह आहे. त्यात बऱ्याच आत्मचरित्रात्मक पुस्तकांचा संग्रहही आहे. सध्याच्या व्यस्त कामांमुळे वाचण्यास वेळ मिळत नाही असे अनेक लोक सांगतात. मात्र मी माझ्या फावल्या वेळेत पूर्णपणे माझी वाचन कला  जोपासतो. शूटिंग दरम्यान एक प्रसंगानंतर दुसऱ्या प्रसंगाच्या दरम्यानचा अधिक वेळ हा मी माझ्या वाचनासाठी वापरतो. अनेकदा मालिकेच्या सेटवरील अनेक सहकलाकारांना मी निरनिराळी पुस्तके वाचायला देतो. परंतु असे अनेकदा झालेले आहे की, एकदा दिलेले पुस्तक वाचून झाल्यावर पुन्हा ते परत माझ्याकडे येत नाही, तेच पुस्तक त्याच व्यक्तीकडे वर्षांनुवर्षे घर करून बसलेले असते.

प्रेक्षकांना प्रचंड आवडलेली ‘राजा शिवछत्रपती’ ही मालिका करीत असताना शिव चरित्रावर आधारित अनेक पुस्तकांचा आधार घ्यावा लागला. त्याचसोबत ‘वीर शिवाजी’ या हिंदी मालिकेत मी शाहिस्तेखानाचे पात्र रंगवले. या सर्व भूमिकांसाठी मला बाबासाहेब पुरंदरे रचित ‘शिवचरित्र’ या पुस्तकाचा अतिशय उपयोग झाला. माझ्या वाचनात आलेले, मला आवडणारे सर्वोत्तम आत्मचरित्र म्हणजे माजी राष्ट्रपती ए.पी.जे अब्दुल कलाम यांचे  ‘अग्निपंख.’ पी. व्ही. वर्तक यांचे वास्तववादी तत्त्वावर अंगीभूत असणारे ‘वास्तव रामायण’ हेदेखील मी वाचलेले आहे. मानवाच्या आयुष्यातील नीती तत्त्वांचा मार्ग दाखवणारे चाणक्याच्या अनेक तत्त्वांवर आधारित असणारी अनेक पुस्तके मी वाचली आणि ती इतरांनाही वाचण्यास दिली. वि.वा. शिरवाडकरांचे नटसम्राटही वाचले. त्यातील एक वाक्य मला खूप सार्थकी आणि प्रचंड अर्थबोध असणारे वाटले-ते म्हणजे ‘भुकेलेल्याला समोरचे ताट द्या, परंतु बसायचा पाट मात्र नको.’ जीवनाची सर्कस म्हणजे काय, सर्कशीतील अनुभव हे मला दामू धोत्रे यांच्या  ‘वाघ -सिंह माझे सखेसोबती’ या आत्मचरित्राच्या  वाचनातून कळाले. शिवाजी सावंत यांची ‘मृत्युंजय’, ‘छावा’ ही नाटकेही वाचली. रणजित देसाई यांचे महाभारतावर आधारित ‘राधेय’, तसेच ना. सी. इनामदार यांचे ‘राऊ’ ही पेशवाईवर आधारित कादंबरी माझ्या वाचनात आलेली आहे. सावरकरांचे माझी जन्मठेप, गोपाळ गोडसे यांची ‘गांधी हत्या आणि मी’, ‘५५ कोटींचे बळी’ ही पुस्तकेही मी वाचलेली आहेत. तसेच थरारक गोष्टींवर आधारित  सिडनी शेल्डॉन यांची ‘रेज ऑफ एन्जल्स’, ‘अदर साईड्स ऑफ मिडनाइट’  ही इंग्रजी पुस्तकेही मी वाचली. तसेच एम. एस. गोलवळकरांचे  ‘ओम राष्ट्राय स्वाहा’  हेदेखील वाचले. मराठी साहित्याचे मानबिंदू समजले जाणारे  पु. ल. देशपांडे यांची अपूर्वाई, व्यक्ती आणि वल्ली, बटाटय़ाची चाळ ही पुस्तके वाचली. अच्युत गोडबोले यांचे झपूर्झा हेही वाचले. तसेच त्या त्या देशातील क्रांतीवर आधारित संकलित पुस्तक, नाझी भस्मासुराचा उदयास्त, १८५७ चे स्वातंत्र्य समर यासारखी पुस्तके माझ्या वाचनात आलेली आहेत. व. पु. काळे यांची अनेक पुस्तके मी वाचलेली आहेत. महाभारताचे चार खंडही मी वाचलेले आहेत . इलेक्ट्रॉनिक यंत्रांवर पुस्तके वाचण्यापेक्षा मला प्रत्यक्षात पुस्तक हातात घेऊन वाचायला अधिक आवडते, कारण त्यातील भावना या थेट असतात, आजची पिढी ही द्रुक्श्राव्य माध्यमाच्या अधिक जवळची आहे. परंतु पुस्तकाचे माध्यम हे आयुष्य जगायला शिकवते. त्यामुळे जास्तीत जास्त वाचन संस्कृती ही तरुणांमध्ये घडावी हीच अपेक्षा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2016 2:06 am

Web Title: actor sunil godse bookshelf
Next Stories
1 कॉलेजच्या कट्टय़ावर : युथ फेस्टिवलच्या तयारीची लगबग
2 खेळ मैदान : घोडबंदर मॅरेथॉनमध्ये यश, संयुरी विजेते
3 ऑन दी स्पॉट
Just Now!
X