News Flash

नामवंतांचे बुकशेल्फ : पुस्तकांनी समृद्ध झाले..

महाविद्यालयात असताना अनेक पुस्तके माझ्या वाचनात आली.

 

तेजश्री प्रधान, अभिनेत्री

वाचन ही अशी एक कार्यशाळा आहे, ज्याची शिकवण आपल्याबरोबर आयुष्यभर राहते. वाचन ही सर्वात बेस्ट कंपनी आहे. पुस्तकांसारखा दुसरा मित्र नाही. त्याची तुलना कशाचीच करता येणार नाही. माझ्याबाबतीत म्हणाल तर वाचनाइतका व्यक्तिमत्त्व विकासासाठी अन्य दुसरा कोणताही उत्तम पर्याय असू शकत नाही. लहानपणी परिकथा अथवा दंतकथा वाचनात आल्या. तेव्हापासून तो छंद जिवाला जडला तो कायमचाच. वयानुरूप वाचनाचे विषय बदलत गेले. जाणिवा विस्तारल्या. जगाकडे पाहण्याची नवी दृष्टी मिळाली.

वाचनाची गोडी ही खरंतर मला माझ्या आईमुळेच लागली. लहानपणी मी एक खेळकर आणि धांदरट मुलगी होते. माझ्या स्वप्नाळू स्वभावामुळे मला सिंड्रेलासारख्या परीकथा आवडत. अलिबाबा आणि चाळीस चोर, ठकठक, चांदोबा, इसापनीतीच्या कथा, फास्टर फेणे यांसारखी बालमासिके आणि विविध कथांची पुस्तकेही मी वाचली आहेत. शालेय जीवनात सातवीमध्ये ‘मृत्युंजय’ ही कादंबरी माझ्या वाचनात आली. महाभारतातील कर्ण या व्यक्तिरेखेला केंद्रस्थानी मानून ही कादंबरी रचण्यात आली आहे. मात्र या कथानकाचे वैशिष्टय़ म्हणजे त्यातील अनेक व्यक्तिरेखा आपल्या अवतीभोवती असणाऱ्या माणसांच्या स्वभावाशी मिळत्याजुळत्या आहेत. मला हे पुस्तक खूप आवडते. दर पाच वर्षांनी मी हे पुस्तक पुन्हा वाचते. विशेष म्हणजे दरवेळी मला त्यात काहीतरी नवे गवसते. वयानुरूप वाढत जाणारी आपली समज आणि बौद्धिक कुवत आजमाविण्यासाठी ही कांदबरी उपयुक्त ठरते, असे मला वाटते. महाविद्यालयात असताना अनेक पुस्तके माझ्या वाचनात आली.

वि.स.खांडेकर यांचे ययाती,साधना आमटे यांचे समीधा, आशा परुळेकर लिखित सुजाचे जग आणि पुनर्जन्म अशी पुस्तक मी महाविद्यालयात असताना वाचली आहेत. त्या वयातील इतर तरुण-तरुणींप्रमाणे मीसुद्धा व.पुंची फॅन होते. त्यांचे लेखन खूप आवडायचे. त्यांची वपुर्झा, रंगपंचमी, फँटसी-एक प्रेयसी, पार्टनर अशी अनेक पुस्तके मी वाचली आहेत. नाटक आणि सिनेक्षेत्रात आल्यानंतर मी विविध धाटणीची पुस्तके वाचायला लागले. रवींद्र भट यांचे ‘भेदिले सूर्यमंडळा’, वीणा गवाणकर यांचे ‘एक होता काव्‍‌र्हर’, इ.आर.ब्रेथवेट यांचे ‘टु सर विथ लव्ह’, तेत्सुको कुरोयानागी यांचे ‘तोत्तो चान’ बेट्टी महमुदी आणि विल्यम हॉफर लिखित ‘नॉट विदाउट माय डॉटर’, अमिश त्रिपाठी लिखित मेलूहा आणि वायुपुत्रास ही पुस्तके मी वाचली आहेत. शिव खेरा यांचे ‘यू कॅन वीन’, अशोक समेळ यांचे अश्वत्थामा, शिवाजी सावंत यांचे युगंधर , वि.वा.शिरवाडकर यांचे कौंतेय आदी अनेक पुस्तके मी वाचली आहेत. चित्त थाऱ्यावर नसेल किंवा मन शांत करायचे असेल तर मी बालकथा वाचते. साने गुरुजींच्या गोड गोष्टींचा संग्रह माझ्याकडे आहे. नरेंद्र जाधव यांचे ‘आमचा बाप अन् आम्ही’, अरुण शेवते यांचे ‘नापास मुलांची गोष्ट’, पु.ल.देशपांडे यांनी अनुवादित केलेले अर्नेस्ट हेमिंग्वे यांचे ‘एका कोळियाने’, रवींद्र गुजर यांनी अनुवादित केलेले पॅपिलॉन, अनंत यादव यांचे ‘झोंबी’, विजया मेहता यांचे झिम्मा ही पुस्तकेही मी वाचली आहेत. एक मजेशीर छंद म्हणून मी काही राशीची पुस्तकेही वाचली आहेत. या राशींमुळे मला माझ्या भूमिका अधिक चांगल्या प्रकारे निभावता येतात. कारण प्रत्येक भूमिका साकारताना त्या भूमिकेचा एक पिंड असतो आणि त्यानुसारच तो त्याची भावभावना व्यक्त करत असतो. मग ते त्याचं हसणं असेल, रडणं असेल किंवा चिडणं असेल. प्रत्येकजण आपापल्या स्वभावधर्मानुसार अभिव्यक्त होत असतो.

गेल्या दोन तीन वर्षांत मी गुलजार यांचे रावीपार, विजय तेंडुलकर यांच्या निवडक कथा, त्यांच्याच ललित लेखांचा कोवळी उन्हं हा संग्रह, शन्ना नवरे लिखित वारा आणि कस्तुरी, डायना चेम्बरलीन यांचे ब्रेकिंग द सायलेन्स अशी अनेक पुस्तके वाचली. हिंदी सुधारण्यासाठी उर्दू-मराठी-हिंदी शब्दकोशही मी संग्रही ठेवला आहे. आठवणीतल्या कवितांचे तीनही भाग मी वाचले आहेत. पुस्तक ठेवण्यासाठी माझ्या घरात एक बुकशेल्फ असून त्यात ३००-४०० पुस्तके आहेत. मला आत्मचरित्रे वाचायला खूप आवडतात.   सध्या मी किरण बेदी यांचे आत्मचरित्र वाचत आहे. पैशाने माणसं श्रीमंत होतात. मात्र पुस्तकांच्या वाचनाने ती खऱ्या अर्थाने समृद्ध होतात, असे मला वाटते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 21, 2016 3:09 am

Web Title: actor tejashree pradhan book shelf
Next Stories
1 फुलपाखरांच्या जगात : कॉमन सेलर..
2 ‘एमएमआरडीए’द्वारे भाजपचा सेनेला शह!
3 लोकलमधील राडेबाज प्रवाशांना तडाखा!
Just Now!
X