News Flash

नामवंतांचे बुकशेल्फ : वाचनातून व्यक्तिमत्त्व विकास

अभिनय क्षेत्रात वाचनाचे हे बाळकडू खूप उपयोगी पडले

रागिणी सामंत अभिनेत्री

पुणे जिल्ह्य़ातील सासवड येथील शाळेत माझे शिक्षण झाले. आठव्या इयत्तेत होते, तेव्हाचा एक प्रसंग आठवतो. शाळेचे हेडमास्तर आम्हाला मराठी विषय शिकवीत.  त्यांनी शिकविता शिकविता एकदा अनुप्रास अलंकार विचारला आणि मी त्यावर त्याची व्याख्या सांगून ‘एकच प्याला’ नाटकातील एक संवादाचे उदाहरण दिले. त्यांना ते खूप आवडले. ‘पतीव्रतांची पुण्याई प्रवाहपतीत पुरुषालाही परमेश्वराच्या पदवीला पोहचवते.’  त्यांनी मला विचारले की, ‘हे उदाहरण तुझ्या लक्षात कसे राहिले?’  त्यावेळी मी त्यांना ‘मला वाचनाची फार आवड आहे,’ असे सांगितले. त्याचक्षणी हेडमास्तर मला शाळेच्या ग्रंथालयात घेऊन गेले आणि त्यांनी ग्रंथपालांना सांगितले की, ‘या मुलीला वाचण्यासाठी हवी तेवढी पुस्तके द्या.’ तेव्हापासून माझे खऱ्या अर्थाने वाचन सुरू झाले. आजोबांची नाटक कंपनी होती. त्यामुळे घरातील वातावरण हे वाचनाला अनुकूल होते. घरात अनेक नाटकांची पुस्तके होती. ती मी वाचायची. पुढे अभिनय क्षेत्रात वाचनाचे हे बाळकडू खूप उपयोगी पडले. तसे माझे वाचन चौफेर असले तरी प्रामुख्याने मला ऐतिहासिक वाङ्मय अधिक आवडते. त्याचे कारण म्हणजे या ऐतिहासिक गोष्टी या आजच्या काळाच्या पलीकडे जात एक नवा संदर्भ देत असतात. भूतकाळात होऊन गेलेल्या काही नाटय़पूर्ण घटनांचे कथारूप म्हणजे सत्य आणि कल्पनेचा सुरेख मिलाप असतो. ना.स. इनामदार यांची ‘राऊ ’, रणजीत देसाई यांची ‘स्वामी’, शिवाजी सावंत यांची ‘मृत्युंजय’ या कादंबऱ्या वाचल्या. तसेच रणजित देसाई यांची ‘श्रीमानयोगी’ ही कादंबरीही मी वाचलेली आहे. त्याच्याही आधी सातवीत असताना वि. स. खांडेकर यांची ‘अमृतवेल’ ही कादंबरी वाचली. त्याचप्रमाणे स्थानिक भाषेत ग्रामीण जीवनातील वास्तव परिस्थिती मांडणारे बाबा कदमही माझे आवडते लेखक आहेत. ‘प्रलय’, ‘निष्पाप बळी’, ‘जोतिबाचा नवस’ , ‘पाच नाजूक बोटे’, ‘भालू’ यासारख्या त्यांच्या कथा व कादंबऱ्या मी वाचल्या आहेत. माझ्या घरात शेकडो पुस्तके होती. मात्र नव्या घरात जाताना त्यातील काही पुस्तके मी मुलुंड येथील महाराष्ट्र सेवा संघाच्या ग्रंथालयास दिली. पुस्तके हा माझा श्वास आहे. मी पुस्तक फक्त वाचत नाही तर त्यातील मजकुराचा अनुभव घेते. सध्या सुरू असलेल्या ‘नांदा सौख्य भरे’ या मालिकेचे ज्यावेळी शूटिंग असते, त्यावेळी सेटवर शूटिंगच्या दरम्यान असणारा फावला वेळ मी वाचनासाठी देते. इतकेच नव्हे तर मालिकेमधील माझे सहकलाकार आम्ही सेटवर एकत्र वाचन करतो. मी अमिष त्रिपाठी यांच्या ‘मेलूहा’ याचे तीनही खंड वाचलेले आहेत. पूर्वी मॅजेस्टिकचे शब्दकोडे यायचे. ते पूर्ण केले की तुम्हाला अनेक पुस्तके भेट म्हणून मिळायची. अशी मला शब्दकोडे पूर्ण करून २५ ते ३० पुस्तके मिळाली होती. त्यात अनेक ऐतिहासिक व पौराणिक पुस्तके होती. ‘मी शेहेनशाह’, विश्वास पाटील यांची ‘पानिपत’ यासारख्या कादंबऱ्या वाचल्या आहेत. तसेच आचार्य अत्रे यांचे ‘कऱ्हेचे पाणी’, ‘मी कसा घडलो’ ही पुस्तके ही वाचली. ऐतिहासिक लेखनातील माझे आवडते लेखक म्हणजे गो.नी.दांडेकर. ऐतिहासिक घटना गोष्टीरूप सांगण्याची गो.नी दांडेकर यांची हातोटी विलक्षण आहे. त्यांनी लिहिलेली ‘शितू’, ‘माचीवरला बुधा’, ‘झुंजार माची’, ‘कुणा एकाची भ्रमणगाथा’, ‘रानभूल’, ‘जैत रे जैत’,  ‘रुमाली रहस्य’, ‘हर हार महादेव’, ‘वाघारू’, ‘तांबडीफुटी’ यासारख्या अनेक कादंबऱ्या मी वाचलेल्या आहेत. माझ्याकडून अद्याप एकही पुस्तक हरवलेले नाही. अनेकदा इतरांकडूनही मी पुस्तके वाचायला आणते. मात्र वेळेवर ज्याचे त्याला आठवणीने परतही करते. मला आध्यात्मिक  पुस्तके वाचायलाही आवडतात. ‘भगवद्गीता’, ‘गुरूचरित्र’, ‘दासबोध’, विविध संतांची चरित्रे मी वाचली आहेत. तसेच चंद्रकात खोत यांची स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर आधारित ‘बिंब-प्रतिबिंब’ ही कादंबरीही मी वाचलेली आहे.  आज अनेक लोक टँबलेट वा किंडलवर वाचन करतात, परंतु त्याने अनेकदा आपल्या डोळ्यांना त्रास होण्याची शक्यता असते. पुस्तके हातात घेऊन वाचण्यात जे सुख आहे, ते इतर कोणत्याही माध्यमात नाही. दर्जेदार साहित्याच्या वाचनामुळे व्यक्तिमत्त्वाची जडणघडण होते, यावर माझा विश्वास आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 28, 2016 2:18 am

Web Title: actress ragini samant bookshelf
Next Stories
1 कॉलेजच्या कट्टय़ावर : चित्रपट करमणुकीबरोबरच अभ्यासाचे माध्यम
2  खेळ मैदान : बास्केटबॉल स्पर्धेत विद्यानिकेतन शाळा अव्वल
3 ऑन दी स्पॉट