ठाण्यात पाणीटंचाई तीव्र : विविध उपाययोजना सुरू
ठाणे जिल्ह्य़ात निर्माण झालेल्या पाणीटंचाईमुळे खडबडून जागे झालेल्या ठाणे महापालिकेने शहरातील आपल्या तरणतलावांचा पाणीपुरवठा तातडीने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय मोठय़ा वसाहतींमधील खासगी तरणतलावांचे सर्वेक्षण करून येत्या पंधरवडय़ात त्यांचाही पाणीपुरवठा बंद केला जाईल, अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांनी दिली. ठाणे जिल्ह्य़ात पाणीटंचाईने गंभीर रूप घेतले असून, पाणी वाचविण्याच्या विविध उपाय योजले जात आहेत. नागरिकांमध्येही याबाबत जागृती केली जात आहे.
ठाणे शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मारुतराव शिंदे तरणतलावाचा पाणीपुरवठा शुक्रवारपासून खंडित करण्यात आला. कळवा आणि कोपरी येथील तरणतलावांचा पाणीपुरवठा येत्या आठवडय़ात बंद केला जाणार आहे. यापैकी प्रत्येक तलावाला एका आठवडय़ात सुमारे तीन लाख लिटर पाणी लागते. इतके पाणी पुरविणे आता शक्य नाही, अशी भूमिका पालिकेने घेतली आहे.
ठाणे शहराला होणाऱ्या ४६० दशलक्ष लिटर पाणीपुरवठय़ात तब्बल ३० ते ४५ टक्क्यांची कपात झाली आहे. त्यामुळे ठाणे शहर, कळवा, मुंब्रा तसेच दिवा या परिसराला सद्य:स्थितीत जेमतेम ३२० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा होतो. ठाणे जिल्ह्य़ातील वेगवेगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांकडून बारवी धरणातून बेसुमार प्रमाणात पाण्याचा उपसा होत असल्याने ठाणे, नवी मुंबईसारख्या शहरांना यापुढे आणखी कमी पाणी पुरविण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने यापूर्वीच घेतला आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून बारवी धरणातून ७५० दशलक्ष लिटर इतक्या पाण्याचा उपसा होत असल्याचे लक्षात येताच जलसंपदा विभागाने मध्यंतरी महामंडळाच्या पाणीपुरवठय़ात आणखी २५ टक्क्यांची कपात केली आहे. त्याचा फटका ठाणे, कल्याण, डोंबिवलीसह जिल्ह्य़ातील विविध शहरांना बसला आहे. जलसंपदा विभागाच्या कपातीमुळे हा पाणीपुरवठा ९० दशलक्ष लिटरवर आला आहे.

तरणतलावांत टँकरद्वारेही पाणी नाही
* ठाणे महापालिकेच्या तरणतलावांत उन्हाळ्यात भरविण्यात येणाऱ्या शिबिरांमध्ये हजारोंच्या संख्येने लहान मुले आणि तरुण सहभागी होतात. तसेच या तलावांमध्ये विविध स्तरावरील स्पर्धाही भरविण्यात येतात.
* तरणतलावांपाठोपाठ काही दिवसांत शहरातील खासगी वसाहतींमधील तरणतलावांचे पाणीही बंद केले जाणार आहे. तसेच त्यांना खासगी टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा केला जाऊ नये, असे सक्त आदेश दिले जातील, असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले.

पाणी बचतीसाठी जागृती
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने पाणी वाचवण्यासाठी जनजागृती सप्ताह पाळण्यात येणार आहे. १६ ते २२ मार्चदरम्यान हा सप्ताह आहे. त्यामध्ये महापालिका क्षेत्रात शॉवर बंद करा, जिल्ह्यंच्या ग्रामीण भागात नळ बंद अशी जनजागृती केली जाणार आहे. शेतीसाठी पाण्याचा वापर कमी करण्यासाठी कमी पाण्यातील पीक घेण्याबाबतही जागृती केली जाणार आहे. तसेच अत्याधुनिक यंत्रणा वापरून पाण्याच्या अपव्ययावर मात करण्याचे प्रयत्न केले जाणार आहे.

अपुऱ्या पाण्याने मुंबईकर त्रस्त
तहान भागविण्यासाठी आणि दैनंदिन कामकाजासाठी मुंबईकरांना ‘समान पाणीवाटप’ करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत. परंतु, आजही मुंबईत अनेक भागांत अपुऱ्या पाणीपुरवठय़ामुळे रहिवासी त्रस्त असून डोंगराळ भागांतील रहिवाशांना वणवण करावी लागत आहे.
पालिका आयुक्तांच्या आदेशानंतरही ‘समान पाणीवाटपा’च्या अंमलबजावणीसाठी पालिका अधिकाऱ्यांना मुहूर्तच सापडलेला नाही. पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये पुरेसे पाणी असतानाही मुंबईतील अनेक भागांतील रहिवासी तहानलेलेच आहेत. पाण्याचा उपलब्ध साठा लक्षात घेऊन पालिकेने मुंबईमध्ये १५ टक्के पाणी कपात लागू केली आहे. मात्र कमी दाबामुळे अनेक भागातील रहिवाशांना अत्यंत कमी प्रमाणात पाणीपुरवठा होत आहे. परिणामी, रहिवाशांना कधी कधी पाण्यासाठी टँकरचा आधार घ्यावा लागत आहे.