भाईंदरमध्ये ‘पोलीस रिसोर्स केंद्र’ कार्यान्वित

बाल लैंगिक अत्याचार, वेश्याव्यवसाय, बालकामगार तसेच ऑनलाइन अशा गंभीर गुन्ह्य़ांची उकल करण्यासाठी पोलीस आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेणार आहेत. सहायक पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून ‘इंरनॅशनल जस्टीस मिशन’ या संस्थेच्या सहकार्याने यासाठी भाईंदर येथे विशेष पोलीस रिसोर्स सेंटर सुरू  करण्यात आले आहे. गुन्हे तपासकार्यात पोलिसांना तांत्रिक मदत उपलब्ध करून देणे हे या केंद्राचे महत्त्वाचे कार्य असणार आहे.

कोकण विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक नवल बजाज आणि ठाणे पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांच्या उपस्थितीत हे केंद्र कार्यान्वित करण्यात आले. लहान मुलांवर होणारे लैंगिक अत्याचार, वेश्याव्यवसाय आणि ऑनलाइन गुन्हे तपास करण्यासाठी ठाणे ग्रामीण पोलिसांचा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभाग कार्यरत आहे. नव्याने स्थापित झालेले पोलीस रिसोर्स केंद्र या विभागाला विशेष मदत करणार आहे.

दिवसेंदिवस बदलत जाणाऱ्या गुन्ह्य़ाच्या पद्धतीमुळे तपासकार्यात पोलिसांसमोर कायम आव्हान निर्माण होत असते. गुन्हेगारही गुन्ह्य़ांसाठी अत्याधुनिक तंत्राचा वापर करताना दिसत आहे, अशावेळी हे केंद्र पोलिसांसाठी फारच उपयुक्त ठरणार आहे, अशी माहिती नवल बजाज यांनी यावेळी दिली.

पोलिसांना याकामी सहकार्य करणारी इंटरनॅशनल जस्टीस मिशन ही संस्था मानवी तस्करी क्षेत्रात काम करत असून संस्थेकडून पोलिसांना सर्व प्रकारची तांत्रिक मदत उपलब्ध करणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेऊन पोलिसांना तपास कामात मदत करण्यासाठी विविध प्रकारचे तांत्रिक स्रोत तैनात ठेवणे हेच काम या केंद्राचे असणार आहे.

पोलिसांच्या कामात पारदर्शकता यावी, पोलीस अधिक सक्षम व्हावेत याबरोबरच नागरिकांनाही पोलिसांची त्वरित मदत उपलब्ध व्हावी यासाठी ठाणे ग्रामीण पोलिसांनी याआधीदेखील मीरा-भाईंदरमध्ये अनेक उपक्रम राबवले आहेत, परंतु हे उपक्रम थोडय़ा कालावधीनंतर एकतर बंद पडतात किंवा त्यात ढिसाळपणा येतो हा आजवरचा अनुभव आहे.  हा नवा उपक्रमदेखील सक्षमपणे सुरू राहणार का, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

संगणकीय प्रणालीची मदत

या केंद्रात वाचनालय स्थापन करण्यात आले असून बाल लैंगिक अत्याचार तसेच वेश्याव्यवसाय आदी गुन्ह्य़ांशी संबंधित याआधी झालेल्या गुन्ह्य़ांची माहिती, गुन्ह्य़ांची झालेली उकल, आरोपींची माहिती, गुन्हे करण्याच्या विविध प्रकारच्या पद्धती आदी माहिती या वाचनालयात साठवली जाणार आहे. पोलीस अधिकाऱ्यांना एखाद्या गुन्हे तपासाच्या कामात हवे असणारे संदर्भ या वाचनालयात उपलब्ध असणार आहेत. याशिवाय या केंद्रात तांत्रिक विशेषज्ञदेखील उपलब्ध असणार असून विविध गुन्ह्य़ांत आवश्यक असणारी संगणकीय प्रणालीची मदत, ऑनलाइन गुन्ह्य़ांची उकल आदी कामांत या तज्ज्ञांची पोलिसांना मदत होणार आहे.