15 July 2020

News Flash

ऑनलाइन मद्यविक्रीत दलालांमार्फत लूट

बाटलीमागे १०० ते ३०० रुपयांची अतिरिक्त आकारणी

संग्रहित छायाचित्र

बाटलीमागे १०० ते ३०० रुपयांची अतिरिक्त आकारणी

ठाणे/कल्याण/उल्हासनगर : ठाणे जिल्ह्य़ात घरपोच मद्यविक्री करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे तरीही शहरी भागातील अनेक मद्य विक्रेत्यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या डोळ्यादेखत ग्राहकांची लूट सुरू केली आहे. ऑनलाइन मद्य खरेदी करता यावी यासाठी ग्राहकांकडून केल्या जाणाऱ्या प्रयत्नांना ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई या भागांतील बहुतांश विक्रेत्यांनी दाद दिलेली नाही. याउलट मनुष्यबळाचे कारण पुढे करीत ग्राहकांनाच दुकानाच्या परिसरात बोलावले जात असून त्यांच्याकडून १०० ते ३०० रुपये जास्त आकारले जात असल्याच्या तक्रारी आहेत.

टाळेबंदीत मद्यापासून दुरावलेले ग्राहकही विनातक्रार वाढीव दरातील मद्य खरेदी करत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे विक्रेत्यांचेही फावले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे ही लूट रोखण्यासाठी कोणतीही उपाययोजना केली नसल्याचे चित्र आहे. दिवसाकाठी ऑनलाइन मद्य विक्रीचे उपलब्ध आकडे दाखवून वरिष्ठ अधिकारी काखा वर करीत असल्याचे चित्र आहे.

ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर भागांतील दुकानांबाहेर मद्य विक्रेत्यांचे दलाल सक्रिय झाले आहेत. एका बाटलीमागे ग्राहकांकडून १०० ते ३०० रुपये अधिक आकारले जात आहेत.

ठाणे जिल्ह्य़ातील प्रतिबंधित क्षेत्र वगळून १९१ वाइन शॉपपैकी १५० तर, ५२८ बीअरशॉपींपैकी २६८ बीअर शॉप खुले आहेत. या मद्यविक्रेत्यांना ग्राहक लघुसंदेश, दूरध्वनी आणि व्हॉट्सअ‍ॅप संदेशाद्वारे विक्रीची परवानगी देण्यात येत आहे. अनेक ठिकाणी मद्यविक्रेते ग्राहकांचे फोन उचलत नाहीत.

व्हॉट्सअ‍ॅप वा लघुसंदेशाला प्रतिसाद देत नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे वैतागलेले ग्राहक मद्य खरेदीच्या शोधात दुकानांबाहेर जमू लागल्याचे दिसत आहे. तेथे मद्य विक्रेत्यांचे कर्मचारी दुकानाबाहेर उभे राहून त्यांना मद्य पुरवीत आहेत. तसेच या मद्याच्या बदल्यात त्यांच्याकडून प्रत्येक बाटली मागे १०० ते ३०० रुपये अधिकच उकळले जात आहेत. ठाण्यातील गोखले रोड, एलबीएस मार्ग, घोडबंदर, नवी मुंबईतील घणसोली, वाशी, कोपरखैरणे तसेच डोंबिवली परिसरात हे प्रकार सर्रास सुरू आहेत.

प्रश्न ‘ब्रॅण्ड’चा आहे

मद्य दुकाने सुरू असल्याने २४ तास आमच्या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर मद्यासाठी ग्राहकांचे लघुसंदेश सुरू असतात. प्रत्येकाचा मद्याचा ‘ब्रॅण्ड’ वेगवेगळा असतो. दुकानात तो उपलब्ध असतोच असे नाही. तोवर संबंधित ग्राहकाला प्रतीक्षा यादीत ठेवावे लागते. परंतु या कालावधीत व्हॉट्सअ‍ॅप, मोबाइलवर संपर्क करून मद्य कधी मिळेल म्हणून शेकडो ग्राहक तगादा लावत आहेत.

नवी मुंबईत ‘क्वार्टर’चा तुटवडा

काही मद्यशौकिनांचा १८० मिलिलिटर अर्थात क्वार्टरवर भर असतो. मात्र टाळेबंदीच्या चौथ्या टप्प्यातील ऑनलाइन मद्यविक्रीत ‘क्वार्टर’चा पर्यायच उपलब्ध नसल्याचे चित्र नवी मुंबईत पाहायला मिळत आहे. काही मद्यविक्रेत्यांनी ग्राहकांना ‘क्वार्टर सोडून बोला’ असे  सूचित केल्याने काहींना नाइलाजास्तव ज्यादाचे मद्य विकत घ्यावे लागत आहे.

ठाणे जिल्ह्य़ात मद्य विक्रेत्यांवर आमच्या पथकाकडून कारवाई करण्यात येत असते. यापूर्वीही सहा ते सात दुकानदारांविरोधात छुप्या पद्धतीने दुकानात थेट मद्यविक्री केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आलेली आहे.

-नितीन घुले,

अधीक्षक, उत्पादन शुल्क ठाणे विभाग

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 26, 2020 5:43 am

Web Title: additional charge of rs 100 to 300 per bottle in online liquor sold zws 70
Next Stories
1 पालिकेच्या शून्य कचरा मोहिमेचा  ‘कचरा’
2 उल्हासनगरात व्यापाऱ्यांवर पुन्हा कारवाई
3 संक्रमित नसताना ६० दिवसांचा बंदिवास
Just Now!
X