कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये दर्जेदार आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी महापालिका प्रशासनाने रुग्णालयाच्या नूतनीकरणाची कामे हाती घेतली असून या कामांचा पाहणी दौरा बुधवारी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांनी केला. तसेच कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांनी बुधवारी रुग्णालयामध्ये जाऊन नूतनीकरणाच्या कामाचा आढावा घेतला. या वेळी त्यांनी मुलांचे व मुलींचे वसतिगृह, व्याख्यान हॉल, पुरुष वॉर्ड, गॅलरी लेक्चर हॉल, नेत्रचिकित्सा वॉर्ड, मध्यवर्ती र्निजतुकीकरण विभाग, मेडिकल स्टोअर आदी विभागांना भेटी दिल्या. या भेटीदरम्यान कामांमध्ये आवश्यक त्या सुधारणा करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. त्याचप्रमाणे वसतिगृहामध्ये सुधारणा, छत दुरुस्तीच्या कामासाठी चांगल्या प्रतीची नर्मदेची वाळू वापरणे, प्रसाधनगृहात व बाहेर कचराकुंडी ठेवणे, सर्व ठिकाणी मच्छरप्रतिबंधक जाळ्या बसविणे, असे आदेशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.