शिक्षण मंत्रालयाचा सावळागोंधळ; समायोजन करण्यास संस्थाचालकांचा नकार; शासनाच्या धोरणाचाही निषेध

ठाणे जिल्ह्य़ातील अतिरिक्त ठरलेल्या ३५४ शिक्षकांची अवस्था सध्या ‘ना घर का न घाट का’ अशी झाली आहे. माध्यमिक विभागातील २००, तर प्राथमिक विभागातील १५४ शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. त्यातील अनुक्रमे १५८ आणि २६ शिक्षकांचे रिक्त जागांवर समायोजन झाले खरे, मात्र त्यापैकी बहुतेकांना संबंधित शाळांनी हजर करून घेण्यास विरोध दर्शविला आहे. कारण गेली कित्येक वर्षे शिक्षक भरती बंद असल्याने विद्यार्थ्यांच्या हितासाठी अनेक संस्थांनी स्वखर्चाने रिक्त पदांवर शिक्षकांची नेमणूक केली आहे. कधीकाळी आपल्या पदांना शासनाची मान्यता मिळेल, या आशेवर हेशिक्षक तुटपुंज्या वेतनावर नोकरी करीत आहेत. मात्र या रिक्त जागांवर अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन केल्याने त्यांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. त्यामुळे तात्पुरत्या नेमणुका केलेल्या शिक्षकांनी आणि संस्थाचालकांनी अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना सामावून घेण्यास असमर्थता व्यक्त करून शासनाच्या या धोरणाचा निषेध केला आहे.

शिक्षक भरती होत नसल्याने गेली अनेक वर्षे शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त आहेत. यासंदर्भात शासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही निर्णय होत नव्हता. अपुऱ्या शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊन संस्थाचालकांना व मुख्याध्यापकांना पालकांचा रोष पत्करावा लागत होता. त्यामुळे या समस्येवर उपाय म्हणून अनेक संस्थांनी स्वखर्चाने तुटपुंज्या वेतनावर शिक्षकांची पदे भरली. मात्र अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन झाल्याने तुटपुंज्या वेतनावर अनेक वर्षे काम करणारे हे शिक्षक आता चिंताग्रस्त आहेत.

अतिरिक्त शिक्षकांच्या सेवेविषयी अनिश्चितता

अतिरिक्त शिक्षकांची अवस्थाही दयनीय आहे. कारण अतिरिक्त ठरल्याने मूळच्या शाळेने या शिक्षकांना कार्यमुक्त केले आहे. तसेच दुसऱ्या शाळेत समायोजन झाल्याचे या शिक्षकांना कागदोपत्री आदेशही मिळाले आहेत. कार्यमुक्ती व समायोजन असे दोन्ही आदेश ऑनलाइन झाले आहेत. यामुळे या आदेशांमध्ये कोणताही बदल करता येणार नाहीत, अशा शिक्षण विभागाच्या आयुक्तांच्या सूचना आहेत. त्यामुळे सध्या या शिक्षकांची नावे मूळच्या शाळेतही नाहीत व समायोजन झालेल्या शाळेतही नाहीत. त्यामुळे या शिक्षकांच्या सेवेविषयी अनिश्चितता निर्माण झाली आहे.

या सर्व सावळ्या गोंधळाला उच्चपदस्थ अधिकारी व शिक्षण मंत्रालय जबाबदार असून ही संपूर्ण प्रक्रिया तात्काळ रद्द करून शिक्षक, मुख्याध्यापक व संस्थाचालक या सर्वाना दिलासा द्यावा.

 -दिलीप डुंबरे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना ठाणे शहर.