आयुक्तांच्या ‘अजब’ सल्ल्याबद्दल तीव्र संताप; त्रस्त नागरिकांची संघर्ष समिती स्थापन

वारंवार लागणाऱ्या आगी आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या धुरामुळे कल्याणच्या आधारवाडी परिसरातील रहिवासी त्रस्त झाले असतानाच महापालिका आयुक्त पी. वेलरासू यांनी ‘थोडे दिवस नातेवाईकांकडे राहायला जा’ असा अजब सल्ला रहिवाशांना देत या आगीत तेल ओतले. त्यामुळे कचराभूमीच्या मुद्दय़ावर आता निर्णायक लढा उभारण्याचा निर्धार स्थानिकांनी केला आहे. या आंदोलनाला योग्य दिशा मिळावी यासाठी संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली आहे.

कल्याण पश्चिमेतील आधारवाडी कचराभूमीची कचरा साठवणुकीची क्षमता दहा वर्षांपूर्वी संपली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने कल्याण डोंबिवली पालिकेला ही कचराभूमी बंद करावी म्हणून नोटीसही पाठविली आहे. उच्च न्यायालयात या प्रकरणी एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या कशालाही महापालिका प्रशासन जुमानत नसल्याचे चित्र असल्याने कल्याणकरांमध्ये संतापाची भावना आहे. उन्हाच्या झळा वाढताच या कचराभूमीला आग लागते, असे चित्र अगदी दरवर्षी दिसते. यंदाची आग बरीच मोठी असून त्यामधून निघालेला धूर अगदी कल्याण रेल्वे स्थानकातही शिरला आहे. स्थानिकांमध्ये आरोग्याच्या तक्रारी उद्भवू लागल्या आहेत. यामुळे येथील नागरिकांत तीव्र रोष आहे. त्यातच संतप्त नागरिकांनी आयुक्तांची गाडी अडवून या संदर्भात विचारणा केली असता आयुक्तांनी ‘आग विझेपर्यंत नातेवाईकांकडे जा..’ असा सल्ला दिल्याचे काही रहिवाशांचे म्हणणे आहे. त्यामुळे नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्याने संतप्त रहिवाशांनी कचराभूमी हटविण्यासाठी संघर्ष समिती स्थापन केल्याची माहिती येथील देवी आशीष इमारतीमध्ये राहणाऱ्या प्रभा नेपाणे यांनी दिली.