ठाणे जिल्ह्य़ात तूर्तास पाणीकपात न करण्याचा प्रशासनाचा निर्णय

सागर नरेकर, लोकसत्ता

बदलापूर : मुंबई महापालिकेने २० टक्के पाणीकपात लागू करण्याचा निर्णय घेतला असला तरी ठाणे जिल्ह्य़ात मात्र अद्याप पाणीकपातीबाबत कोणताही विचार नसल्याचे संबंधित विभागांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. विशेष म्हणजे जिल्ह्य़ात पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी, भातसा, आंध्र धरणामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाणीसाठा कमी असतानाही संबंधित प्रशासनाने कपातीबाबतचा कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे जिल्ह्य़ातील नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

यंदा ठाणे जिल्ह्य़ातील धरणक्षेत्रात फारसा पाऊस झालेला नसून यामुळे धरणे अद्याप पूर्ण क्षमतेने भरू शकलेली नाहीत. जिल्ह्य़ातील ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, मीरा-भाईंदर, भिवंडी यांसारख्या महापालिका, अंबरनाथ, कुळगाव-बदलापूर यांसारख्या नगरपालिकांना आंध्र, भातसा आणि एमआयडीसीच्या बारवी धरणातून पाणीपुरवठा केला जातो. सध्या बारवी धरण एकूण ३३८.८४ दशलक्ष घनमीटर क्षमतेपैकी अवघे ४८ टक्के भरले असून सध्या १६५.९९ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा धरणात आहे. विशेष बाब म्हणजे गेल्या वर्षी धरणाची उंची वाढवण्याचा प्रकल्प पूर्ण झाल्याने धरणाची पाणीक्षमता जवळपास १०० दशलक्ष घनमीटरने वाढली होती. त्यानंतरही जुलै महिन्याच्या अखेरीस बारवी धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. त्यामुळे ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला होता. तर एकूण ९४२.१० दशलक्ष घनमीटर क्षमता असलेले भातसा धरण सध्या ५३ टक्के भरले असून त्यात ५०५.४१ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध आहे.

गेल्या वर्षी भातसा धरण ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला ९१.४७ टक्के भरले होते, तर उल्हास नदीवरील बॅरेज बंधाऱ्यातून बदलापूर आणि अंबरनाथ शहराला पाणीपुरवठा केला जातो. या बंधाऱ्यामध्ये आंध्र धरणातून पाणी सोडले जाते. यंदा या धरणात अवघे ३३.१९ टक्के पाणीसाठा जमा आहे. या धरणाची क्षमता ३३९.१४ दशलक्ष घनमीटर असून सध्या ११२.५५ दशलक्ष घनमीटर पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे जिल्ह्य़ाला पाणीपुरवठा करणाऱ्या तिन्ही धरणांत सरासरी ४० टक्के पाणीसाठा असून पावसाने दडी मारल्यास भविष्यात बिकट परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. सध्याचे पावसाचे प्रमाण आणि भविष्यातील टंचाईची चाहूल लागताच मुंबई महापालिकेने २० टक्के पाणीकपात लागू केली आहे. मात्र ठाणे जिल्ह्य़ाला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये अपुरा पाणीसाठा असूनही अद्याप कोणत्याही प्रकारची कपात लागू केली नसल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

कपातीबाबत निर्णय नाही

पाण्याच्या नियोजनासाठी पाटबंधारे विभाग उपलब्ध पाणीसाठा आणि पावसाचा अंदाज घेऊन नियोजन करत असते. सध्या तरी योग्य क्षमतेने पाणीपुरवठा सुरू असून कपातीसंदर्भात कोणताही निर्णय अद्याप तरी झालेला नसल्याची माहिती पाटबंधारे विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.

 

धरणे                    पाऊस                           पाणीसाठा

                  (मिलिमीटरमध्ये)               (टक्केवारीत)

ऑगस्ट       ऑगस्ट            ऑगस्ट        ऑगस्ट

२०२०         २०१९             २०२०            २०१९

भातसा         १०८२         २०२५            ५३.६५            ९१.४७

बारवी          ९०९          २०७५               ४८.९९            १००

आंध्रा            ५५७           २२१३            ३३.१९             ८६.१६

सध्या धरणातून कोणत्याही प्रकारचा विसर्ग केला जात नाही. पाणीसाठा कमी असला तरी त्याबाबत नियोजन पाटबंधारे विभागाकडून केले जाते. वरिष्ठ पातळीवरून आलेल्या आदेशाची अंमलबजावणी केली जाईल. सध्या तरी कपातीबाबत कोणतेही नियोजन नाही.

– जे. सी. बोरसे, कार्यकारी अभियंता, बारवी धरण प्रकल्प.