नगरसेवक, नागरिकांवर शोध घेण्याची जबाबदारी

ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात पावसाळ्याच्या काळात इमारत कोसळून दुर्घटना होऊ नये यासाठी धोकादायक इमारतींचा शोध घेण्याची जबाबदारी प्रशासनाने आता नगरसेवकांवर सोपवली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून यंदाही शहरातील धोकादायक इमारतींची यादी प्रशासनाने जाहीर केली आहे. या यादीनुसार संपूर्ण महापालिका क्षेत्रात एकूण चार हजार ७०५ इमारती धोकादायक ठरविण्यात आल्या असून त्यापैकी ९५ इमारती अतिधोकादायक म्हणून जाहीर करण्यात आल्या आहेत. या यादीमध्ये सर्वाधिक अतिधोकादायक इमारती शहराच्या मध्यवर्ती भाग असलेल्या नौपाडा आणि त्यापाठोपाठ वर्तकनगर भागामध्ये आहेत.

गेल्या काही वर्षांत ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये मान्सूनच्या काळात इमारत दुर्घटना घडल्या असून त्यामध्ये अनेक रहिवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे. मुंब्य्रातील लकी कंपाऊंडमध्ये बेकायदा उभारण्यात आलेली इमारत कोसळून ७४ जणांना आपला जीव गमावावा लागला होता. ही घटना पावसाळ्यात घडली नव्हती, मात्र यानिमित्ताने शहरातील बेकायदा, धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला होता. या घटनेपाठोपाठ मान्सूनच्या काळात मुंब्रा, कळवा तसेच शहराचा मध्यवर्ती भाग असलेल्या नौपाडा भागातही इमारत कोसळल्याच्या घटना घडल्या. या पाश्र्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून महापालिकेकडून दरवर्षी धोकादायक इमारतींची यादी जाहीर करण्यात येते. या यादीमध्ये अतिधोकादायक आणि धोकादायक अशा इमारतींचे वेगवेगळे वर्गीकरण यापूर्वी करण्यात येत होते. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून धोकादायक इमारतींचे चार विभागांत वर्गीकरण करण्यात येत आहे. महापालिका प्रभाग समिती स्तरावर इमारतींची पाहाणी करून ही यादी तयार केली जाते. यंदाही अशा प्रकारची यादी महापालिका प्रशासनाने तयार केली आहे. या यादीनुसार ९५ अतिधोकादायक इमारती असून त्यामध्ये नौपाडा भागात ३७, तर वर्तकनगर भागात २६ अशा सर्वाधिक इमारती आहेत. गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही अतिधोकादायक इमारती रिकाम्या करून त्या जमीनदोस्त करण्याची कारवाई लवकरच सुरू होणार असल्याचे पालिका सूत्रांकडून सांगण्यात आले.

इमारतींचे चार प्रकारांत वर्गीकरण

गेल्या दोन वर्षांपासून धोकादायक इमारतींचे सी-१, सी-२ ए, सी-२ बी, सी-३ अशा चार विभागांत वर्गीकरण करण्यात येते. सी-१ म्हणजे अतिधोकादायक, सी-२ ए म्हणजे धोकादायक इमारतींची मोठय़ा प्रमाणावर दुरुस्ती करणे, सी-२ बी म्हणजे धोकायदायक इमारतींची दुरुस्ती आणि सी-३ म्हणजे इमारतींच्या किरकोळ दुरुस्ती असे चार विभागांत वर्गीकरण करण्यात येते.