News Flash

‘उल्हास’भोवती जलपर्णीचा फास अधिक घट्ट

उल्हास नदीतील वाढते प्रदुषण आणि अतिक्रमणाविरूद्ध पर्यावरणप्रेमी संस्था सातत्याने आवाज उठवीत आहेत.

‘उल्हास’भोवती जलपर्णीचा फास अधिक घट्ट
उल्हास नदीतील वाढते प्रदुषण आणि अतिक्रमणाविरूद्ध पर्यावरणप्रेमी संस्था सातत्याने आवाज उठवीत आहेत.

न्यायालयाच्या आदेशानंतरही संवर्धनाकडे डोळेझाक; ठाण्याची जीवनवाहिनी धोक्यात
बारवी धरणाव्यतिरिक्त ठाणे जिल्ह्य़ातील शहरांना पाणी पुरवठा करणारा एकमेव स्त्रोत असणाऱ्या उल्हास नदीभोवती जलपर्णी या विषवल्लीने टाकलेला फास आता अधिक घट्ट झाला असून येथील पाणी पुरवठय़ावर त्याचे गंभीर परिणाम होण्याची चिन्हे आहेत. बदलापूर आणि कल्याण या शहरांलगतच्या नदीपात्रात ठिकठिकाणी जलपर्णीने आपले हातपाय इतक्या मोठय़ा प्रमाणात पसरले आहेत, की त्यामुळे संपूर्ण नदीपात्रच झाकून गेले आहे.
उल्हास नदीतील वाढते प्रदुषण आणि अतिक्रमणाविरूद्ध पर्यावरणप्रेमी संस्था सातत्याने आवाज उठवीत आहेत. सह्य़ाद्रीच्या डोंगररागांमध्ये उगम पावून पुढे खाडीत रूपांतर होणारी १३५ किलोमिटर लांबीच्या या नदी प्रवाहात बदलापूर ते कल्याण दरम्यानचे घरगुती सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट नदीपात्रात सोडले जाते. औद्योगिक वसाहती सांडपाण्यावर प्रक्रिया करीत असल्याचा दावा करीत असल्या तरी अनेक कंपन्यांचे सांडपाणी कोणत्याही प्रक्रियेविना नदीच्या पात्रात सोडले जात असल्याची सचित्र वस्तुस्थिती ‘लोकसत्ता’ने वेळोवेळी मांडली आहे. कर्जत-नेरळ परिसरातही आता मोठय़ा प्रमाणात नागरीकरण सुरू असल्याने तेथील सांडपाण्याचा भारही नदीला वहावा लागत आहे. याशिवाय नदीपात्रात पूररेषेचे उल्लंघन करून अनेकांनी अतिक्रमणे केली आहेत. वनशक्ती या सामाजिक संस्थेने नदीतील या विषप्रयोगाविरूद्ध हरित लवादाकडे दाद मागितली होती. त्यावर संबंधित प्राधिकरणांनी नदी पात्रांचे तातडीने संवर्धन करावे असे आदेश दिले होते. खरेतर एकमेव जलस्त्रोत असल्याने येथील पाण्याचा वापर घेणाऱ्या सर्व प्राधिकरणांनी तातडीने संवर्धन मोहीम राबविणे आवश्यक होते. मात्र राजकीय आणि प्रशासकीय दोन्ही पातळीवरील उदासिनतेमुळे दुर्दैवाने नदीचे ऱ्हासपर्व सुरूच आहे. बोरघाटात उगम पावणारी उल्हास नदी भिवपुरी येथील टाटा विद्युत निर्मिती प्रकल्पातील पाणी सोडले जात असल्याने बारमाही झाली आहे. त्यामुळे उल्हास नदीतील पाणी पुरवठा हा ठाण्यातील नव्हे तर पुण्यातील आंध्रा धरण परिसरात पडणाऱ्या पावसावर अवलंबून असतो.

असा होतो नदीचा प्रवास
कर्जतनंतर उल्हास नदीच्या खोऱ्यास सुरुवात होते. पुढे तिचे पात्र विस्तारत जाते. बदलापूरजवळ या नदीवर पहिला बंधारा आहे. त्याला बॅरेज असे म्हणतात. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत येथून पाणी उचलून ते अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांना पुरविले जाते. त्यानंतर उल्हास नदीला बारवी नदी मिळते. या संगमावरून महाराष्ट्र औद्य्ोगिक विकास महामंडळाकडून पाणी उचलले जाऊन ते डोंबिवली, नवी मुंबई येथील उद्योगांसाठी तसेच ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगरमधील काही भागात घरगुती वापरासाठी पुरविले जाते. शहाडजवळ या नदीवर दुसरा एक बंधारा आहे. तिथून कल्याण, डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, ठाणे, मीरा-भाईंदर या भागात घरगुती वापरासाठी तसेच शहाड, आंबिवली, कल्याण परिसरातील उद्योगांना पाणी पुरविले जाते.

जलपर्णीमुळे उल्हास नदीतील पाण्याची शुद्धता कमालीची धोक्यात आली आहे. आता खरेतर खूपच उशीर झाला आहे. तातडीने हालचाली करून या विषवल्ली पाण्याच्या प्रवाहातून समूळ उपटून टाकणे हाच यावरील उपाय आहे.
– गोविंद जोशी, निवृत्त अधिक्षक, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण

खरेतर तर नदी पात्रातील वाढती जलपर्णी हाच प्रदुषणाचा ढळढळीत पुरावा आहे. कोणतीही प्रक्रिया न करता सांडपाणी नदीपात्रात थेट सोडल्याने या जलपर्णीची वेगाने वाढ झाली आहे. याप्रकरणी राष्ट्रीय हरित लवादाने परिसरातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना दंड ठोठावला आहे. किमान त्यानंतर तरी युद्ध पातळीवर जलपर्णीही हटवणे आवश्यक होते. मात्र त्याऐवजी हा दंड टाळण्यासाठी या स्वराज्य संस्था प्रयत्न करताना दिसत आहेत.
– अश्विन अघोर, वनशक्ती संस्था

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 28, 2016 12:58 am

Web Title: administration ignore ulhas river conservation even after court order
Next Stories
1 भाज्यांच्या महागाईवर रानभाज्यांचा पर्याय!
2 आधारवाडी गोदाम रस्त्याची दुरवस्था
3 ‘रसिक शास्त्रीय संगीताचा आस्वाद पदार्थाप्रमाणे घेतात’
Just Now!
X