लैंगिक अत्याचारानंतर देखील परिस्थिती जैसे थे; सुरक्षारक्षक कंपनीला प्रशासनाचे अभय

भाईंदर : कोविड केंद्रात महिलेवरील लैंगिक अत्याचाराचे प्रकरण उघडकीस आल्यांनतर देखील महिला सुरक्षेकरिता प्रशासनाकडून अद्यापही ठोस पाऊल उचलण्यात न आल्यामुळे महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. तर सैनिक सुरक्षारक्षक पुरविणाऱ्या कंपनीला देण्यात आलेले कंत्राट रद्द करण्याची मागणी करणारे राजकीय पुढारी कंत्रादाराच्या भेटीगाठीनंतर शांत झाले असल्यामुळे या कंपनीला प्रशासनाचा पाठिंबा असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.

एक महिन्यापूर्वी भाईंदर पूर्व भागातील गोल्डन नेस्ट परिसरात असलेल्या कोविड अलगीकरण केंद्रात  महिलेचे लैंगिक शोषण करण्यात आले असल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले होते. याप्रकरणी पीडित महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. धक्कादायक बाब म्हणजे महिलेचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर अनेक महिलांच्या तक्रारी समोर आल्या आहेत. एका महिलेच्या तक्रारीनुसार कोविड केंद्रातील सुरक्षा कर्मचारी रात्री ३ च्या सुमारास महिलेच्या खोलीत पाणी घेऊन येत असत. त्यामुळे भविष्यात देखील महिलेचे लैंगिक शोषण होण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत होती.

या प्रकरणानंतर महिलांच्या सुरक्षेकरिता योग्य पावले उचलण्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले होते. त्यात कोविड केंद्रात सीसीटीव्ही कॅमरे लावण्यात येणार असल्याचे, महिला आणि पुरुष असे कोविड केंद्राचे विभाजन करण्याचे आणि स्त्रियांकरिता महिला सुरक्षारक्षक नेमण्याचे ठरवण्यात आले होते. परंतु महिना उलटला तरी यापैकी एकही काम पूर्ण झाले नसल्यामुळे महिला सुरक्षेकरिता प्रशासनाचे धोरण उदासीन असल्याचे आरोप करण्यात येत आहेत, तर नवे महिला रुग्ण कोविड केंद्रात जाण्यास नकार देत असल्यामुळे आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढली आहे.

दरम्यान, कोविड केंद्रात लैंगिक अत्याचाराचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पालिका प्रशासनाकडून कंत्रादाराला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती, परंतु कंत्राटदाराच्या भेटीगाठीनंतर विरोध थंडावला असल्याची टीका सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.

सुरक्षारक्षक पुरविणाऱ्या कंपनीला वारंवार मुदतवाढ

मीरा-भाईंदरमधील सुरक्षारक्षकाचे कंत्राट २००९ साली सैनिक सुरक्षारक्षक पुरविणाऱ्या कंपनीला देण्यात आले होते. स्थानिक कंपनीला कंत्राट दिल्यामुळे स्थानिक नागरिकांना रोजगार मिळण्याची संकल्पना २०१४ रोजी महासभेत नगरसेवकांनी मांडली होती. त्यामुळे २०१५ रोजी नवीन निविदा तयार करून तीन वर्षांकरिता हे कंत्राट सैनिक सुरक्षारक्षक पुरविणाऱ्या कंपनीला देण्यात आले. कंत्राट तीन वर्षांकरिता देण्यात आले असले तरी प्रत्येक वर्षी त्यात मुदतवाढ करण्याचे नमूद करण्यात आले होते. सैनिक सुरक्षारक्षक पुरविणाऱ्या कंपनीचे राजकीय हितसंबध चांगले असल्यामुळे २०१६ आणि २०१७ रोजी त्यांना मुदतवाढ करून देण्यात आली. २०१८ रोजी कंत्राट संपल्यानंतर देखील पालिका प्रशासनाकडून गार्ड बोर्डकडे सुरक्षारक्षकाची मागणी करण्यात येत असल्याचे कारण देत आजवर अनेक वेळा सुरक्षारक्षक पुरविणाऱ्या कंपनीला मुदतवाढ देण्याचे कट रचले आहेत.

सध्या महिलांकरिता कोविड केंद्रात चार माळे राखीव ठेवण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे महिला असलेल्या खोलीत महिला आरोग्य आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना पाठवण्यात येत आहे. तसेच इतर आवश्यक गोष्टीदेखील लवकरच पूर्ण करण्यात येणार आहेत.

संभाजी वाघमारे, उपायुक्त, वैद्यकीय अधिकारी