News Flash

कडोंमपा निवडणुकीसाठी प्रशासनाची तयारी

गेल्या ऑक्टोबरमध्ये पालिकेची पंचवार्षिक मुदत संपली आहे.

कडोंमपा निवडणुकीसाठी प्रशासनाची तयारी
(संग्रहित छायाचित्र)

 

१२२ प्रभागांच्या आरक्षण सोडतीसाठी हालचाली

कल्याण :  निवडणुकीसाठी तयार राहण्याचे तोंडी आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिल्यामुळे कल्याण-डोंबिवली पालिका प्रशासनाने येत्या काही दिवसांत १२२ प्रभागांची आरक्षण रचना तयार करून ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रभाग आरक्षण जाहीर करण्यासाठी अत्रे किंवा सावित्रीबाई फुले रंगमंदिरात जाहीर कार्यक्रम घ्यावा लागणार असून त्या वेळी करोना संसर्गाचे नियमांचे कसे पालन करायचे असा प्रश्न पालिकेसमोर उभा राहिला आहे. त्यामुळे प्रभाग रचना आरक्षण सोडत कार्यक्रमाची रूपरेषा कशी असावी, याचा विचार वरिष्ठ पातळीवर सुरू आहे.

गेल्या ऑक्टोबरमध्ये पालिकेची पंचवार्षिक मुदत संपली आहे. ११ नोव्हेंबरपासून पालिकेचा कारभार प्रशासकीय राजवटीतून चालविला जात आहे. ऑक्टोबरपर्यंत करोनाची स्थिती कमी झाली तर पालिका निवडणुका घेतल्या जातील, या विचारातून प्रशासनाने निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणे मागील आठ महिन्यांपूर्वीच प्रभागांची नवीन रचना (१८ गावे वगळून) तयार करून ठेवली आहे. आता न्यायालयाच्या आदेशावरून गावे पुन्हा पालिकेत समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यामुळे जुन्या रचनेप्रमाणेच पालिकेने सार्वत्रिक निवडणूक घ्यावी असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. असे असले तरी उच्च न्यायालयाने निवडणूक घेण्यासंदर्भात मात्र कोणतेही आदेश दिलेले नाहीत. दरम्यान, गावे पुन्हा पालिकेत समाविष्ट करण्यात आल्याने राज्य सरकार आणि कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाने उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध सर्वेच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सर्वेच्च न्यायालयाने कॅव्हेट दाखल करणाऱ्या याचिकाकत्र्याला नोटिसा पाठविण्याचे आदेश पालिका आणि शासनाला दिले आहेत. निवडणुका घ्या किंवा घेऊ नका असे कोठेही सर्वेच्च न्यायालयाने म्हटले नाही. तसेच उच्च न्यायालयातील याचिकाकर्ता वास्तुविशारद संदीप पाटील यांनी राज्य निवडणूक आयोग, केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आयुक्तांना पत्र पाठवून कल्याण डोंबिवली पालिकेच्या निवडणुकीची तयारी करण्याचे लेखी आदेश पालिका प्रशासनाला देण्याची मागणी केली आहे. मात्र, राज्य निवडणूक आयोगाने केवळ असे तोंडी आदेश दिले आहेत. राजकीय दबावामुळे राज्य निवडणूक आयोग पालिका प्रशासनाला याबाबत लेखी आदेश देत नसल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे. तर, असा काहीच प्रकार नसल्याचे आयोग, पालिकेचे म्हणणे आहे. प्रभाग आरक्षणाची सोडत काढताना नगरसेवक, इच्छुक उमेदवार, रहिवासी मोठ्या संख्येने एकत्र येतात. या वेळी करोना पार्श्वभूमीच्या तोंडावर हे नियोजन कसे करायचे असा पेच पालिकेसमोर आहे. राज्यातील नवी मुंबई, औरंगाबाद, वसई-विरार महापालिकांच्या जोडीला येत्या दोन महिन्यांत कल्याण डोंबिवली महापालिकेची निवडणूक आयोगाने जाहीर केली तर धावपळ नको म्हणून प्रभागांच्या आरक्षण सोडती जाहीर करण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

राखीव प्रभागांची रचना

दहा वर्षांपूर्वी झालेल्या जणगणनेनुसार म्हणजेच १५ लाख १८ हजार ७६२ लोकसंख्येच्या आधारे ही निवडणूक होणार आहे. नवीन रचनेप्रमाणे १२२ प्रभाग असतील. अनुसूचित जातीच्या एक लाख ५० हजार १७१, अनुसूचित जमातीच्या ४२ हजार ५८४ लोकसंख्येप्रमाणे राखीव प्रभागांची रचना होईल. विविध प्रवर्गांतील ५३ महिला पाच वर्षांपूर्वी सभागृहात निवडून आल्या होत्या. यामध्ये पाच अनुसुचित जाती, एक अनुसूचित जमाती गटातील आहे.

प्रभाग रचना आरक्षणाची सोडत लवकरच घेण्यात येणार आहे. त्या दृष्टीने आखणी केली जात आहे. – संजय जाधव, पालिका सचिव

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 11, 2021 12:47 am

Web Title: administration preparing elections kalyan dombivali municipality akp 94
Next Stories
1 कचऱ्यापासून वीजनिर्मिती अंधारात
2 अपघात रोखण्यासाठी उड्डाणपुलांच्या आरंभाला रंग
3 ‘व्हॅलेंटाइन्स’च्या दिवशी नोंदणीकृत विवाह यंदा अशक्य
Just Now!
X