News Flash

तिसऱ्या लाटेपूर्वी प्रशासन सज्ज

करोनाबाधित बालकांच्या उपचारासाठी स्वतंत्र कक्ष

करोनाबाधित बालकांच्या उपचारासाठी स्वतंत्र कक्ष

ठाणे : देशात करोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तविण्यात येत असून त्यात बालकांचे बाधित होण्याचे प्रमाण अधिक असेल, असा इशाराही दिला आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्य़ात प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. येत्या काही दिवसांत जिल्ह्य़ातील विविध करोना रुग्णालयांमध्ये तसेच केंद्रांमध्ये करोनाने बाधित होणाऱ्या बालकांच्या उपचारासाठी वेगळे कक्ष तयार केले जाणार आहेत. तसेच जिल्ह्य़ात बालरोगतज्ज्ञांची कमतरता आहे. त्यामुळे शहरांतील काही खासगी बालरोगतज्ज्ञांची मदत घेतली जाणार आहे. या डॉक्टरांची माहिती मिळविण्याचे काम जिल्हा प्रशासनाकडून सुरू आहे.

राज्यात करोनाचा प्रादुर्भाव ओसरत असल्याचे चित्र असले तरी तिसऱ्या लाटेची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तविण्यात येत आहे. या लाटेचा सर्वाधिक धोका बालकांना असेल, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे. हा धोका टाळण्यासाठी ठाणे जिल्ह्य़ात प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. ठाणे महापालिकेने काही दिवसांपूर्वी शहरात बालकांसाठी १०० खाटांचे नियोजन केले आहे. भिवंडी महापालिकेने ८० आणि कल्याण-डोंबिवली महापालिकेने ५० खाटांचे अतिरिक्त कक्ष बालकांसाठी उभारण्याचा निर्णय घेतला आहे. ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयांच्या अख्यत्यारीत असलेल्या ठाणे, सावद, भिनार, वरप आणि गोठेघर येथे करोना रुग्णालये आहेत. या ठिकाणीही २५ ते ३० खाटांचे बालकांसाठी वेगळे कक्ष उभारले जाणार आहेत. बालकांचा इतर रुग्णांशी संपर्क येऊ नये यासाठी वेगळे कक्ष स्थापन केले जाणार असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. तसेच या करोना रुग्णालयांमध्ये परिसरातील काही खासगी रुग्णालयांमधील बालरोगतज्ज्ञांची मदत घेतली जाणार आहे. या बालरोगतज्ज्ञांना ठरावीक मानधन दिले जाणार आहे. बालकांच्या कक्षातच त्यांची नेमणूक केली जाणार आहे. तसेच डॉक्टरांनाही मार्गदर्शन व्हावे यासाठी येत्या काही दिवसांत राज्यातील काही प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञांचे मार्गदर्शन दिले जाणार आहे. त्यामुळे करोनाबाधित बालकांची हाताळणी करणे सोपे जाणार आहे. यासोबतच नवजात बालकांसाठी प्रौढांपेक्षा वेगळ्या पद्धतीचे व्हेंटिलेटर लागतात. हे व्हेंटिलेटर उपलब्ध करण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासनाकडून सुरू आहे.

बालकांना लागण होऊ न देण्यासाठी..

ज्यांच्या घरात लहान बालके आहेत. त्यांनी कामानिमित्ताने बाहेर गेल्यानंतर रात्री घरी परतल्यावर स्वच्छ अंघोळ करावी. बाहेर जाणाऱ्या व्यक्तीने लहान मुलांना जास्त जवळ घेऊ नये. तसेच बाहेरून आणलेले खाद्यपदार्थ स्वच्छ धुऊन घ्यावेत. लहान मुलांना बाजारात किंवा गर्दीच्या ठिकाणी नेऊ नये. नेल्यास मुखपट्टीचा वापर करावा. लहान मुलांमध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी त्यांना भरपूर पाणी पिण्यास आणि फळे खाण्यास द्यावी, अशी माहिती इंडियन मेडिकल असोसिएशन ठाणे विभाग अध्यक्ष डॉ. संतोष कदम यांनी दिली.

तिसऱ्या लाटेमध्ये बालके बाधित होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यानुसार येत्या काही दिवसांत प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञांद्वारे करोना रुग्णालयातील डॉक्टरांना मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच शहरातील खासगी रुग्णालयांतील बालरोगतज्ज्ञांची माहिती मिळविण्याचे कामही प्रशासनाकडून सुरू आहे.

– राजेश नार्वेकर, जिल्हाधिकारी, ठाणे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 12, 2021 2:53 am

Web Title: administration ready before corona third wave zws 70
Next Stories
1 प्राणवायू स्वयंपूर्णतेच्या दिशेने ठाणे पालिकेची पावले
2 करोनाबाधितांनी वेळीच रुग्णालयात दाखल व्हावे!
3 ठाण्यात साडेचार हजार धोकादायक इमारती
Just Now!
X