08 March 2021

News Flash

कल्याण-डोंबिवलीत प्रशासकीय राजवट

नगरसेवकपदाची मुदत संपुष्टात; आयुक्त प्रशासक म्हणून कामकाज पाहणार

नगरसेवकपदाची मुदत संपुष्टात; आयुक्त प्रशासक म्हणून कामकाज पाहणार

कल्याण : मागील पाच वर्षांची नगरसेवक पदाची मुदत संपुष्टात आल्याने बुधवारपासून कल्याण-डोंबिवली पालिकेत प्रशासकीय राजवट सुरू झाली आहे. शासनाने यासंदर्भात आदेश काढून आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना प्रशासक म्हणून कामकाज करण्यास सांगितले आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निकटवर्तीयांमध्ये सूर्यवंशी ओळखले जातात. त्यामुळे नवी मुंबईप्रमाणे या ठिकाणीही पालकमंत्र्यांचा शब्द अंतिम राहील असे सांगितले जाते.

करोना काळामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे नवी मुंबई महापालिका तसेच अंबरनाथ, बदलापूर नगर परिषदेत गेल्या सहा महिन्यांपासून प्रशासकीय राजवट अस्तित्वात आहे.

राज्यात सत्ताबदल झाल्याने पालकमंत्री एकनाथ िशदे यांच्या जिल्ह्य़ातील स्थानिक स्वराज्य संस्थांवर एकहाती अंमल निर्माण झाल्याचे चित्र गेल्या काही महिन्यांपासून पाहायला मिळत आहे. राजकीय वर्तुळात सांगितले जाते. नवी मुंबई महापालिकेत अण्णासाहेब मिसाळ यांच्याकडे आयुक्तपद असताना िशदे म्हणतील ती पूर्वदिशा असा येथील कारभार होता. नवे आयुक्त अभिजीत बांगरही िशदे यांचा शब्द प्रमाण मानत असल्याने प्रशासकीय राजवटीतही नवी मुंबईत त्यांचा दबदबा कायम आहे, असे म्हटले जाते. कल्याण-डोंबिवली महापालिकेत तर गेली अनेक वर्षे शिवसेनेची सत्ता आहे. या ठिकाणी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी हे िशदे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. करोना काळात कल्याण डोंबिवलीतील परिस्थिती सुरुवातीच्या काळात अगदीच वाईट होती. जिल्ह्य़ातील जवळपास सर्वच महापालिका आयुक्तांची राज्य सरकारने बदल्या केल्या होत्या. मात्र, सर्वाधिक करोना रुग्ण सापडणाऱ्या कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्तांना  अभय मिळाल्याची चर्चा  आहे.

बुधवारपासून या ठिकाणी प्रशासकीय राजवट लागू झाली आहे, त्याबरोबर या ठिकाणी पालकमंत्र्यांची सत्ता प्रस्थापित झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यामुळे भाजप, मनसेच्या गोटात अस्वस्थता असून शिवसेनेतील स्थानिक वजनदार नेत्यांमध्येही दबक्या आवाजात हीच चर्चा आहे.

आव्हाने कायम

करोनाचा प्रादुर्भाव अद्याप संपलेला नाही. दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे  पहिले प्राधान्य करोना निर्मूलन आणि त्यासंबंधीच्या उपाययोजनांवर असेल. शहरातील वाहतूक कोंडीचा विचार करून अनेक वर्षे रेंगाळलेला बावळण रस्ता पूर्ण करणे,   कोपर, वडवली, ठाकुर्ली ते ९० फुटी रस्ता उड्डाण पुलांची कामे लवकर पूर्ण करणे यादृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत. रखडलेले डोंबिवलीतील सूतिकागृह लवकर पूर्ण होईल यादृष्टीने प्रशासनाकडून हालचाली केल्या जातील. वैद्यकीय महाविद्यालय उभारणीच्या प्रस्तावाला महासभेने मंजुरी दिली.  त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालय संलग्नित रुग्णालय उभारणीचे विकास आराखडे तयार करणे, ते मार्गी लावणे, पालिका मुख्यालयाची प्रशासकीय इमारत नेतिवली येथील प्रशस्त भूखंडावर उभारणीचे काम लवकर सुरू होईल यादृष्टीने प्रयत्न करणे, ही सर्व कामे गतीने पूर्ण होतील यासाठीचे नियोजन केले जाणार आहे, असे आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी सांगितले.

‘दिवाळीत गर्दी टाळा’

दिवाळी सण उत्सवाचा असला तरी या वेळी करोना संसर्गाची भीती असल्याने रहिवाशांनी घरातच दिवाळी साजरी करावी. आप्त, नातेवाईक यांच्याकडे जाणे टाळावे. फटाके उडवू नयेत.   दिवाळीच्या काळात ज्या भागात, रस्त्यांवर गर्दी होण्याची शक्यता आहे. तेथे पालिका आणि पोलीस यांच्या एकत्रित सहकार्याने त्या भागात गर्दी जमणार नाही याची उपाययोजना केली जाणार आहे, असे आयुक्तांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2020 2:54 am

Web Title: administrative rules in kalyan dombivli municipal corporation zws 70
Next Stories
1 पोलीस दफ्तरी फक्त ५३ नायजेरियन
2 अबोली रिक्षा योजना कागदावरच
3 ऑनलाइनला टक्कर देण्यासाठी व्यापारी सरसावले
Just Now!
X