कल्याणमधील मावावाल्यावर कारवाई; तीन हजार किलो भेसळयुक्त बर्फी जप्त

उत्सवाच्या हंगामात स्पेशल बर्फीच्या नावाखाली राजरोसपणे बनावट मावा आणि खवा जादा दराने विकणाऱ्या कल्याणमधील एका बडय़ा व्यापाऱ्यावर ठाण्यातील अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली असून ठाणे, नवी मुंबई, पनवेल यांसारख्या परिसरातून सुमारे तीन हजार किलो भेसळयुक्त बर्फीचा साठा जप्त करण्यात आला आहे. कल्याणातील पप्पू मावावाला या घाऊक मावा आणि बर्फी विक्रीसाठी प्रसिद्ध असलेल्या दुकानावर टाकलेल्या छाप्यात हा भेसळ कारभार उघड झाला आहे.

दरवर्षी या व्यापाऱ्याकडून हजारो किलो मावा, खवा, बर्फीचे वितरण जिल्हय़ातील बडय़ा दुकानांनाही होत असते. त्यामुळे अहमदाबाद येथून आयात केलेल्या स्पेशल बर्फीच्या नावाखाली सुरू असलेले मावा बर्फीचे मोठे रॅकेट या कारवाईच्या माध्यमातून उघड होण्याची शक्यताही मिठाई व्यापाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

ही स्पेशल बर्फी विकणाऱ्या मुख्य विक्रेत्याने सध्या कल्याणातून आपले बस्तान गुंडाळले असल्याची चर्चा असली तरी दिवाळीच्या मुहूर्तावर या सगळ्या बनावट कारभाराकडे लक्ष ठेवण्याचे मोठे आव्हान अन्न व औषध प्रशासनासमोर आहे. या छाप्यादरम्यान करवाईत दोषी ठरलेल्या पप्पू मावावाला याच्यासह इतर किरकोळ व्यापाऱ्यांना नोटिसा बजाविण्यात आल्या आहे.

गणेशोत्सव, नवरात्री आणि दसरा-दिवाळीच्या निमित्ताने मिठाई विक्रेत्यांकडून ग्राहकांची होणारी फसवणूक लक्षात घेता अन्न व औषध प्रशासनाने ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, पनवेल परिसरातील बडे मिठाई आणि मावा विक्रेत्यांवर पाळत ठेवण्यास सुरुवात केली आहे. याच पाहणीदरम्यान ठाणे आणि रायगड जिल्ह्य़ातील काही बडय़ा मिठाई विक्रेत्यांकडे अहमदाबाद येथून आलेला मावा-खवा स्पेशल बर्फीच्या नावे जादा भावाने विकला जात असल्याचे निदर्शनास आले. या माव्याचे नमुने घेतले असता मोठय़ा प्रमाणावर भेसळ आढळून आली असून स्पेशल बर्फीच्या नावाखाली १००, २०० आणि ३०० किलो मावा वेगवेगळ्या गोण्यांमधून भरून कल्याण येथे आयात होत असल्याचे स्पष्ट झाले. या माव्याची साठवण तसेच शुद्धतेविषयी काळजी घेत नसल्याचे लक्षात आले आहे.

* अन्न आणि औषध प्रशासनाने महिन्याभरात सात ठिकाणी कारवाई करून ३ हजार ९७० किलो स्पेशल बर्फीचा साठा जप्त केला आहे.

* त्याची किंमत ९ लाख ३५ हजार ६२० रुपये असून त्यापैकी १२ नमुने घेण्यात आले आहे.

* कल्याणात पाच, अंबरनाथ आणि पनवेल येथे प्रत्येकी एक ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे.

 

गणेशोत्सव तसेच नवरात्रोत्सवाप्रमाणे दिवाळीमध्येही कारवाई होणार आहे. नोटिसा बजावल्याने व्यापाऱ्यांनी मावा, बर्फी विकताना नियमांचे उल्लंघन केल्यास फौजदारी कारवाईस सामोरे जावे लागणार आहे. पप्पू मावावाला आणि इतर लहानमोठय़ा व्यापाऱ्यांची अहमदाबाद साखळी तपासली जात आहे.

– सुरेश देशमुख, सह-आयुक्त, अन्न व औषध विभाग