भगवान मंडलिक, कल्याण

ठाणे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये ३८ वर्षे सेवा देऊन निवृत्त झालेल्या ५० आदर्श शिक्षकांच्या उत्तम शैक्षणिक कार्याबद्दल मिळालेल्या आगाऊ वेतनवाढीच्या लाखो रुपयांच्या रकमा जिल्हा परिषद प्रशासनाने शिक्षकांना पूर्वकल्पनेशिवाय कापून घेतल्याने आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षक हवालदिल झाले आहेत.

जिल्हा परिषद प्रशासनाने स्वत:हून या शिक्षकांनी केलेल्या सर्वोत्कृष्ट शैक्षणिक कार्याची दखल घेऊन हे पुरस्कार आणि आगाऊ वेतनवाढ दिली होती. असे असताना निवृत्त होताच १० ते १२ वर्षांपूर्वी दिलेल्या विशेष वेतनवाढीची रक्कम कापून घेऊन जिल्हा परिषद प्रशासनाने शिक्षकांवर अन्याय केल्याची भावना शिक्षक व्यक्त करीत आहेत. जिल्हा परिषदेतील बहुतांश शिक्षक डी. एड. (शिक्षणशास्त्र) या शैक्षणिक पात्रतेनंतर बी. ए., एम. ए. एम. एड. संशोधनात्मक विषयावर काम करीत आहेत. या ज्ञानाचा लाभ ते ग्रामीण, दुर्गम आदिवासी भागांतील जिल्हा परिषद शाळेतील मुलांना देत आहेत. दुर्गम भागातील जि. प. शाळेतील मुलांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यास या शिक्षकांची मेहनत कारणीभूत आहे. अशा शिक्षकांना हेरून ठाणे जिल्हा परिषदेने काही वर्षांपासून आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्याचे काम सुरू केले आहे. अशा शिक्षकांच्या कार्याचा गौरव म्हणून त्या शिक्षकांना आगाऊ वेतनवाढ देण्यात आल्या, असे महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे कोषाध्यक्ष चिंतामण वेखंडे यांनी सांगितले.

जि. प.तील आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षकांच्या रकमा निवृत्त होताना का कापल्या, याबाबत आपणास माहिती नाही. माहिती घेऊनच या विषयावर बोलावे लागेल.

-संगीता भागवत, शिक्षणाधिकारी, जि. प., ठाणे.