26 February 2020

News Flash

ठाणे, टिटवाळा स्थानकांतील स्वस्त दवाखाने बंद

कंत्राट देण्याच्या प्रक्रियेतील विलंबामुळे एक रुपयात वैद्यकीय तपासणी रखडली

कंत्राट देण्याच्या प्रक्रियेतील विलंबामुळे एक रुपयात वैद्यकीय तपासणी रखडली

ठाणे : मध्य रेल्वेच्या मार्गावरील स्थानकांमध्ये प्रवाशांना तात्काळ आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी या उद्देशातून विविध स्थानकांवर ‘वन रुपी क्लिनिक’ सुरू करण्यात आले आहेत. मात्र ठाणे आणि टिटवाळा या गर्दीच्या स्थानकांवरील हे दवाखाने गेल्या २० दिवसांपासून बंद आहेत. मध्य रेल्वेकडून कंत्राट देण्याच्या प्रक्रियेला विलंब होत असल्याने हे दवाखाने बंद असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

रेल्वे प्रवासादरम्यान एखादा प्रवासी आजारी पडला किंवा अपघातामध्ये दुखापत झाली तर त्याला स्थानकावरच तात्काळ आरोग्य सुविधा मिळावी या उद्देशातून मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या विविध स्थानकांवर वन रुपी क्लिनिक ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. या दवाखान्यांमध्ये वैद्यकीय तपासणीसाठी केवळ एक रुपया आकारला जातो. स्वस्त दरात आणि तात्काळ उपचार मिळत असल्यामुळे प्रवासी या रुग्णालयांमध्ये उपचारांसाठी जातात. या प्रवाशांची संख्याही मोठी आहे. काही महिन्यांपूर्वी ठाणे रेल्वे स्थानकातील दवाखान्यात दोन महिला प्रवाशांची प्रसूती सुखरूप झाली होती. मात्र हा दवाखानागेल्या २० दिवसांपासून बंद असून त्याचप्रमाणे टिटवाळा रेल्वे स्थानकातील दवाखानाही बंद आहे. हे दवाखाने चालवण्यासाठी देण्यात आलेले कंत्राट संपले असल्यामुळे नव्याने कंत्राट प्रक्रिया राबवण्यात येत आहे. मात्र त्याला विलंब झाल्याने हे दवाखाने बंद झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

आपत्कालीन क्रमांक बंद

रेल्वे स्थानकांवरील ‘वन रूपी क्लिनिक’च्या सुविधेसाठी ८०३०६३६१६६ हा आपत्कालीन क्रमांक सुरू करण्यात आला होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून हा क्रमांक बंद आहे.

उद्घाटनाच्या प्रतीक्षेत

ठाणे, कळवा, उल्हासनगर आणि टिटवाळा स्थानकांप्रमाणेच कसारा रेल्वे स्थानकातही ‘वन रूपी क्लिनिक’ सुरू करण्यात येणार आहे. दोन महिन्यांपूर्वीच दवाखान्यांच्या उभारणीचे काम पूर्ण झाले आहे. मात्र हे दवाखाने उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहेत.

ठाणे आणि टिटवाळा स्थानकांतील ‘वन रूपी क्लिनिक’चे नवे कंत्राट देण्याची प्रक्रिया सुरू आहे. नवे कंत्राट देण्याचे पत्र तयार करण्यात आले असून लवकरच हे दवाखाने सुरू करण्यात येतील.

-अनिल कुमार जैन, वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

वन रूपी क्लिनिक गरीब प्रवाशांसाठी महत्त्वाचा प्रकल्प आहे. मात्र सुमारे २० दिवसांपासून दवाखाना बंद असल्याने प्रवाशांना महागडय़ा ठिकाणी उपचार घ्यावे लागत आहेत. रेल्वेने उपचार केंद्र बंद करण्यापूर्वी पूर्वकल्पना द्यावी.

-राजेश घनघाव, अध्यक्ष, कल्याण-कसारा रेल्वे प्रवासी संघटना

First Published on June 19, 2019 4:19 am

Web Title: affordable dispensaries in thane titwala stations closed
Next Stories
1 तपास चक्र : चोरीसाठी काहीही..
2 येऊरमध्ये रानडुकराची शिकार
3 अंबरनाथ मतदारसंघावर भाजपचा दावा
Just Now!
X