१९ वर्षांनंतरही विक्रमगड तालुक्याचा समस्या सुटेनात

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देश महासत्ता होण्यासाठी देशातील नागरिकांना किमान मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्या लागतात याचाच शासनाला विसर पडलाय की काय? असा प्रश्न पालघर जिल्ह्य़ातील विक्रमगडमध्ये फेरफटका मारला की पडतो. शुद्ध पाणी, कचरा, शौचालय आदी समस्या कायम असून त्या गेली कित्येक वर्षे फक्त प्रस्तावातच अडकल्या आहेत.

२७ जून १९९९ रोजी  दुर्गम व आदिवासीबहुल म्हणून या तालुक्याची स्थापना झाली. तालुक्याचा दर्जा मिळण्याअगोदर विक्रमगड हे गाव जव्हार तालुक्याचा एक भाग होते. आज या तालुक्याच्या स्थापनेला १९ र्वष पूर्ण झाली आहेत. परंतु आजही येथील विकास खुंटलेलाच आहे. ग्रामपंचायतचे वर्गीकरण होऊन या ठिकाणी नगरपंचायत अस्तित्वात आली. परंतु नगरपंचायत होऊनही समस्या काही कमी झाल्या नाहीत.

* किमान पिण्याचे पाणी शुद्ध मिळावे तर या ठिकाणी जलशुद्धीकरण केंद्र अस्तित्वातच नाही. शिवाय पाणीपुरवठा योजना ही ३५ वर्षे जुनी झाल्याने जे काही पाणी मिळते ते फुटलेल्या, गंजलेल्या पाइपातून.

* सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी आवश्यक समजल्या जाणाऱ्या गटारांची व्यवस्था बिकट असल्याने आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. तालुक्याचे ठिकाण असूनही सुसज्ज असे बसस्थानक नाही.

* शहरातील लाइट तर रामभरोसे आहे. नागरिकांनी कुठे लघुशंकेला जावे म्हणाल तर शहरात फक्त एकच मुतारी आहे. या आणि अशा अनेक समस्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात.

शहरातील पाणीपुरवठा योजना ही ३५ वर्षे जुनी असून त्यामुळे ती खराब झालेली आहे. नवीन पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव शासनाला पाठविलेला आहे. तसेच शहरातील कचरा डेपोसाठी लवकरच नवीन जागा पाहणार आहोत. फिरते शौचालय उपलब्ध करण्यासंदर्भाचा प्रस्ताव देखील पाठवलेला आहे.

– धिरज चव्हाण, नगरपंचायत मुख्याधिकारी

तालुक्याच्या स्थापनेला १९ वर्षे पूर्ण झाली आहेत. परंतु आजही या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची समस्या, गटारांची समस्या आहे. किमान पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे, जेणेकरून आरोग्याच्या समस्या निर्माण होणार नाहीत. खराब झालेले रस्ते लवकरात लवकर दुरुस्त करावेत.

– लक्ष्मण पडवळ, नागरिक

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After 19 years of vikramgarh taluka problem resolved
First published on: 20-09-2018 at 02:17 IST