तिळमाळमध्ये तब्बल ६८ वर्षांनंतर विजेची सोय
आजच्या ‘डिजिटल इंडिया’च्या काळात आपल्यासारख्या शहरी-निमशहरी भागात राहणाऱ्या ‘सुखी’ नागरिकांना विजेशिवाय राहणे कठीण होऊन बसेल. मात्र आजही अनेक खेडय़ा-पाडय़ांमध्ये वीजच पोहोचली नसल्याने तेथील ग्रामस्थ विकासाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित राहिल्याचे भयाण वास्तव आहे. पालघर जिल्ह्य़ातील अशाच एका आदिवासी पाडय़ामध्ये स्वातंत्र्यानंतर तब्बल ६८ वर्षांनी वीज आल्याने या गावच्या ग्रामस्थांच्या अंधकारमय जीवनात प्रकाश पसरला आहे.
भारत २०२० पर्यंत जागतिक महासत्ता बनण्याची स्वप्ने पाहत असला तरी अनेक दुर्गम भागांतील खेडय़ांत रस्ते, वीज, पाणी यासारख्या मूलभूत सुविधांची वानवा आहे. अनेक ठिकाणचा भाग दुर्गम आणि दुर्लक्षित असल्याने स्वातंत्र्याला सात दशके होत आली तरीही विकासाची गंगा या ग्रामस्थांपर्यंत पोहोचू शकलेली नाही. रस्ते नसल्याने विद्यार्थी, वृद्ध, रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे. कोणताही अधिकारी, शिक्षक अशा भागात फिरकण्यास तयार नसल्याने आणि राजकारण्यांनी फक्त मतांच्या गठ्ठय़ासाठीच लक्ष पुरवल्याने या भागातील ग्रामस्थ मागासच राहिले आहेत. ही दयनीय स्थिती आजच्या ‘डिजिटल इंडिया’ होऊ पाहणाऱ्या देशाची आहे.
पालघर जिल्ह्य़ातील औद्योगिक पट्टा असलेल्या वाडा तालुक्यातील अनेक आदिवासी पाडय़ांत अशीच स्थिती आहे. अनेक पिढय़ा अंधकारमय जीवन जगत आहेत. अशाच तिळमाळ या आदिवासी पाडय़ात स्वातंत्र्यानंतरच्या ६८ वर्षांत साधी वीजही पोहोचली नव्हती. अनेक वर्षे येथील ग्रामस्थ शासनाकडे पाठपुरावा करत होते. वीज नसल्याने ते चिमण्या आणि केरोसिनचे दिवे पेटवून अंधारमय जीवन कंठत होते. श्रमजीवी संघटनेनेही यासाठी पाठपुरावा चालविला होता. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन प्रशासनाने या पाडय़ामध्ये विजेची व्यवस्था केल्याने ग्रामस्थांना स्वातंत्र्याची नवी पहाट उजाडली आहे.
मंगळवारी रात्री औपचारिक कार्यक्रमात वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी गावात वीज आणली. संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार विवेक पंडित यांनी कळ दाबून वीजपुरवठय़ाचे उद्घाटन केले. या वेळी आदिवासी बांधवांनी एकच जल्लोष केला.