कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीची शुक्रवारी प्रचाराची मुदत संपताच शहरात वास्तव्यास असणाऱ्या बाहेरील सर्व राजकीय पक्षाचे नेते, पदाधिकारी यांनी तातडीने शहर सोडून आपल्या मूळ स्थानी निघून जावे, असे आदेश कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त आणि निवडणुक निर्णय अधिकारी ई.रिवद्रन यांनी काढले आहेत. प्रचाराची मुदत संपूनही हेतुपुरस्सर शहरात वास्तव्य करणाऱ्याचा प्रयत्न कोणी केल्यास त्यांच्यावर तातडीने कारवाई केली जाईल, असे आदेशही त्यांनी काढले.

राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशावरून आयुक्त रवींद्रन यांनी हे आदेश काढले आहेत. कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षातील नेतेमंडळींचा राबता या शहरांमध्ये सुरू आहे. शिवसेनेने तर ठाणे, नवी मुंबई, अंबरनाथ, बदलापूर येथील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची फौज कल्याणात उतरवली आहे. पालकमंत्री एकनाथ िशदे यांच्यासह ठाण्यातील आमदार, खासदार, पदाधिकाऱ्यांचा रात्र-दिवस शहरात राबता असतो. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे कल्याण डोंबिवलीत वास्तव्यास आहेत. आचारसंहिता संपल्यानंतर काही नेते मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी शहरात वास्तव्य करून राहतात. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. पाच वर्षांपूर्वी एका राजकीय पक्षाच्या नेत्याने आचारसंहिता संपूनही शहर सोडण्यास नकार दिला होता. अचानक उद्भवलेल्या या प्रसंगामुळे पोलिसांची तारांबळ उडाली होती. त्यामुळे हे आदेश काढले आहेत.