काँग्रेस, राष्ट्रवादीसह भाजपचा निवडणुकीवरील बहिष्कारास पाठिंबा

डोंबिवलीलगत असलेली २७ गावे महापालिकेतून वगळावीत या मागणीसाठी आक्रमक असणाऱ्या २७ गाव संघर्ष समितीने निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय कायम ठेवला असून भाजपसह काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही समितीच्या भूमीकेला पाठिंबा देत शिवसेनेला पुन्हा एकदा कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी २७ गावांची नगरपालिका करण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला होता. त्यामुळे निवडणुकीचे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होताच भाजपने २७ गावांमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी करत शिवसेनेवर निशाणा साधल्याची चर्चा आता रंगली आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिकेतून २७ गावे वगळून स्वतंत्र नगरपालिका करा या मागणीसाठी संघर्ष समितीने महापालिका निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. संघर्ष समितीने याविषयी आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी सोमवारी रात्री उशिरा मानपाडा येथे एका बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीस राष्ट्रवादीचे माजी खासदार संजीव नाईक, भाजपचे कल्याण पश्चिम मतदारसंघाचे आमदार नरेंद्र पवार, समाजवादी पक्षाचे महंमद अन्सारी, समितीचे गंगाराम शेलार, गुलाब वझे, चंद्रकांत पाटील, बळीराम तरे, गणेश म्हात्रे आदी उपस्थित होते. शिवसेनेचे स्थानिक आमदार सुभाष भोईर यांच्यासह एकाही बडय़ा नेत्याने या बैठकीस उपस्थित राहणे टाळले. या वेळी राष्ट्रवादीचे नेते संजीव नाईक यांनी आपला पक्ष संघर्ष समितीच्या पाठीशी असून २७ गावांमधून राष्ट्रवादी निवडणूक लढविणार नाही, अशी घोषणा केली. समाजवादी पक्षानेही गावांमधून निवडणूक न लढविण्याचा निर्णय जाहीर केला. भाजपचे माजी आमदार रमेश पाटील यांनी मुख्यमंत्र्यांनी आपण संघर्ष समितीच्या पाठीशी राहणार आहोत, असे सांगितले आहे, असे बैठकीत सांगितले. भाजपचे आमदार पवार यांनी मात्र, अन्य कोणी २७ गावांमधून निवडणूक लढविण्याचा प्रयत्न केला तर भाजप निवडणुकीची तयारी करेल, असे मत मांडले. शिवसेनेचे नेते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन २७ गावांमधून निवडणूक लढवायची की नाही याबाबत येत्या दोन दिवसांत निर्णय घेऊन तो शिवसेना नेते समितीला कळविणार आहेत, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. गावांमधून कोणी निवडणूक लढविण्याचा प्रयत्न केला तर त्यांना जशास तसे उत्तर देण्याचा निर्धार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी बैठकीत व्यक्त केला. कोणत्याही परिस्थितीत बहिष्कार यशस्वी करायचाच, असे मत बहुतांशी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

शिवसेनेने २७ गावांमधून कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केल्याचे वृत्त आहे. यामुळे अडचणीत सापडलेल्या भाजपने संघर्ष समितीच्या नेत्यांना हाताशी धरतानाच काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी केल्याची चर्चा आता रंगली आहे. शिवसेनेचे उमेदवार िरगणात उतरले तर इतर पक्षांना निवडणूक लढविण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला सोबत घेऊन शिवसेनेची कोंडी करण्याची रणनीती आखण्यात आली असून भाजपच्या जाहीर पाठिंब्यामुळे संघर्ष समितीच्या नेत्यांना एक प्रकारे सरकारचे संरक्षण मिळाल्यासारखे चित्र उभे राहिले आहे.