03 June 2020

News Flash

Coronavirus Outbreak : सायंकाळी पाचनंतर किराणा, भाजीही बंद

नागरिकांकडून उल्लंघन सुरूच असल्याने महापालिका, पोलिसांचा निर्णय

संचारबंदी असतानाही अनेक भागांत अजूनही नागरिक प्रभातफेरीसाठी घराबाहेर पडत आहेत.

नागरिकांकडून उल्लंघन सुरूच असल्याने महापालिका, पोलिसांचा निर्णय; रस्त्यावर दिसणाऱ्यांवर कडक कारवाई

ठाणे : करोनाचा प्रसार कमी व्हावा, म्हणून लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीतही किराणा किंवा भाजी घेण्याच्या निमित्ताने घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना अटकाव घालण्यासाठी आता सायंकाळी पाचनंतर पहाटेपर्यंत शहरातील किराणा तसेच भाजीपाल्याची दुकाने पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय ठाणे जिल्ह्यातील विविध महापालिकांनी घेतला आहे. या आदेशातून औषधांच्या दुकानांना वगळण्यात आले असले तरी, सायंकाळनंतर रस्त्यावर दिसणाऱ्या व्यक्तीवर कडक कारवाई करण्याचा इशारा पालिका आणि पोलिसांनी दिला आहे. कल्याण, डोंबिवली, भिवंडी, नवी मुंबई, अंबरनाथ, बदलापूर या शहरांत बुधवारपासून याची अंमलबजावणी करण्यात आली आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात मात्र रात्री उशिरापर्यंत यासंदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आला नव्हता.

राज्यात करोनाग्रस्तांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असून मुंबई तसेच आसपासच्या शहरांतून रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. असे असतानाही या शहरांत टाळेबंदीच्या नियमांचे उल्लंघन करण्यात येताना दिसत आहे. राज्य शासनाने जाहीर केल्याप्रमाणे जीवनावश्यक वस्तू तसेच भाजीपाला आणि औषधांची दुकाने सुरू आहेत. त्याचाच गैरफायदा घेत नागरिक सामान आणण्याच्या बहाण्याने घराबाहेर पडून विनाकारण हिंडत असल्याचे दिसून आले आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील बहुतांश शहरांत सायंकाळी पाचनंतर किराणा व भाजीची दुकानेही बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सायंकाळनंतर या शहरांत रस्त्यांवर फिरताना आढळणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.

ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी कुळगाव-बदलापूर आणि अंबरनाथ नगरपालिका क्षेत्रात फळे, भाजीपाला विक्रीची दुकाने, किराणा मालाची दुकाने, दूध आणि इतर अत्यावश्यक सेवांची दुकाने सकाळी ७ ते सायंकाळी ५ या वेळेत सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. औषधालये आणि वैद्यकीय सुविधा देणाऱ्या सेवांना यातून वगळण्यात आले आहे.

नवी मुंबई पोलीस सहआयुक्त राजकुमार व्हटकर यांनी विशेष अधिकाराचा वापर करून पुढील सात दिवस सायंकाळी पाच वाजल्यापासून शहरातील सर्वच दुकाने बंद करण्याचे आदेश दिले आहेत. यातून औषधांच्या दुकानांना मात्र वगळण्यात आले आहे. नवी मुंबई, पनवेल व उरण येथील रस्त्यांवरील सायंकाळची गर्दी टाळण्यासाठी आता पोलीस पुन्हा दंडुका हातात घेणार आहेत.

भिवंडीत विशेष दक्षता

भिवंडी महापालिका क्षेत्रात सुदैवाने आतापर्यंत एकही करोना रुग्ण सापडलेला नाही. मात्र, या शहरात टाळेबंदीचे नागरिकांकडून उल्लंघन होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भिवंडी महापालिकेनेही शहरातील किराणा दुकाने, भाजी दुकाने सायंकाळी पाचनंतर बंद करण्याचे आदेश काढले आहेत. यातून औषधालये वगळण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

ज्येष्ठ नागरिक, श्वानपालकांची मागणी

नित्यनेमाने सकाळी फेरफटका मारण्याचा दंडक टाळेबंदीच्या काळातही अनेक नागरिक पाळताना दिसत आहेत. मधुमेह किंवा तत्सम आजार असलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी प्रभात फेरी न केल्यास त्यांच्या शारीरिक व्याधी वाढतील, अशी भीती व्यक्त करून ज्येष्ठ नागरिकांना प्रभातफेरीसाठी मोकळीक देण्याची मागणी होत आहे. तर दुसरीकडे, घरात श्वान पाळणारेही श्वानांना फेरफटका मारून आणण्यासाठी फिरू द्या, अशी मागणी करत आहेत.

नागरिकांचे बहाणे

टाळेबंदीमुळे घरात बसून बसून कंटाळलेले नागरिक या ना त्या बहाण्याने सारखे घराबाहेर पडत असल्याचे आढळून आले आहे. पोलिसांनी हटकल्यास किराणा वा भाजीखरेदीची कारणे सांगितली जातात. तर औषधाच्या गोळय़ांची जुनी पाकिटे घेऊन औषध शोधण्यासाठी बाहेर पडल्याचेही सांगण्यात येत असल्याचा अनुभव काही पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितला. यामध्ये धूम्रपान किंवा मद्यपानाची सवय असलेल्यांची संख्या जास्त असल्याचे पोलिसांच्या तपासात आढळून आले आहे.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2020 2:40 am

Web Title: after five in the evening grocery vegetable also closed in thane zws 70
टॅग Coronavirus
Next Stories
1 शेतातील भाजी थेट सोसायटीत
2 Coronavirus : करोनाबाधित रुग्ण १२०
3 टाळेबंदीमुळे आश्रमांच्या मदतीचा ओघ कमी
Just Now!
X