प्रेम ही अशी गोष्ट आहे जी, बळजबरीने करता किंवा करवून घेता येत नाही. पण बहुतांश जणांना ही गोष्ट लक्षातच येत नाही. समोरच्या व्यक्तीची इच्छा नसताना तिच्यावर प्रेमसंबंधांसाठी दबाव आणण्यात येतो आणि मग यातल्या अनेक ‘प्रेम’कथांची परिणती शेवटी कोणत्या ना कोणत्या गुन्ह्य़ात किंवा दुर्घटनेत होत असते. असेच एक प्रकरण अलीकडेच कर्जत येथे उघडकीस आले.
र्जतमध्ये आता नागरीकरणाचे पुरावे पुंजक्या पुंजक्याने दिसत असले तरी अजून हा परिसर जंगलांनी व्यापलेला आहे. या जंगलाच्या कोपऱ्यावर चार ते पाच घरे असलेली कातकरी समाजाची वस्ती आहे. या वस्तीमधील महिला, पुरुष चुलीसाठी लागणारा लाकूडफाटा आणण्यासाठी नियमित या जंगलात येतात. भिमाशंकरच्या जंगलाचाच हा भाग. एक दिवस काही रहिवाशांना जंगलातील आतील भागात लाकूड, गवत जळल्यासारखा भाग दिसला. जवळ जाऊन या रहिवाशांनी पाहिले तर, चक्क एका व्यक्तीचा अर्धवट जळलेल्या अवस्थेमधील तो मृतदेह होता. म्हणता म्हणता ही बातमी संपूर्ण वस्तीमध्ये आणि आसपासच्या गावांमध्ये पसरली. मृतदेह जळालेला असल्याने त्यावर कोणतीही ओळखीची खूण दिसत नव्हती. रायगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पुढील तपास सुरू केला. रायगड परिसरातील कोणी बेपत्ता आहे का, याचा शोध सुरू झाला. पण कोणत्याही पोलीस ठाण्यात कोणाच्याही बेपत्ता होण्याची तक्रार नव्हती. म्हणून मग रायगड पोलिसांनी ठाणे पोलिसांना विचारणा केली. त्यांनीही समांतर तपास सुरू केला.
इकडे उल्हासनगरमधील एका लेडीज बारमध्ये काम करणारी बारबाला तरुणी गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असल्याची खबर मानपाडा पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक विजय मोरे यांना मिळाली. ही बारबाला डोंबिवलीजवळील दावडी गावात राहात होती. म्हणून मग पोलिसांनी आपला मोर्चा दावडी गावाकडे वळवला. मात्र, घरी एकटीच राहणारी ही बारबाला तेथेही आढळली नाही. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला व हा धागा हाताशी धरून पोलिसांनी तपासाचे टोक गाठायला सुरुवात केली.
बेपत्ता महिलेचा तपास करण्यासाठी मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गौतम रणदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विजय मोरे, हवालदार हनुमंत साळुंखे, कुणाल शिर्के, मधुकर घोडसरे, राठोड, पाटील यांचे पथक तयार करण्यात आले. या पथकाने या बारबालेच्या नातेवाईकांचा शोध पोलिसांनी सुरू केला. उल्हासनगरमधील बारमध्ये या तरुणीला प्रिया या नावाने ओळखले जात होते. अर्थातच ते तिचे खरे नाव नव्हते. तिचा संपूर्ण पत्ता किंवा नातेवाईकांबद्दल कोणालाही माहिती नव्हती. पण सुदैवाने पोलिसांना प्रियाची बहीण सेविका सिकदर (२४) हिच्याबद्दल माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी तिला गाठले. इथूनच पोलिसांच्या संशयाला बळ मिळत गेले. प्रियाचे मूळ नाव दीपिका असे असून ती दावडी गावात एकटीच रहाात होती, अशी माहिती सेविकाने पोलिसांना दिली. तसेच दिव्याजवळील दातिवली गावातील जयेश श्रावण पाटील (२५) याच्याबरोबर तिचे प्रेमसंबंध होते, अशी माहिती तिने पुरवली. जयेश हा सधन घरातील सुशिक्षित तरुण होता. तो प्रियाला हरतऱ्हेची मदत करत होता, असे पोलिसांना समजले. म्हणून त्यांनी जयेशच्या दिशेने तपास सुरू केला.
जयेशच्या दातिवली गावातील घरावर पोलिसांनी पाळत ठेवली. त्याच्या हालचालीही टिपण्यास सुरुवात केली. पण त्यातून ठोस काही हाती लागत नव्हते. म्हणून पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. सुरुवातीला जयेश काहीच बोलण्यास तयार नव्हता. पण पोलिसी खाक्याची प्रचीती येताच तो भडाभडा बोलू लागला आणि पोलिसांनी लावलेला अंदाज खरा ठरला.
‘प्रियासोबत माझे प्रेमसंबंध होते. मी तिला प्रत्येक गोष्टीसाठी मदत करत होतो. हवा तितका पैसा पुरवत होतो. फक्त तिने आपल्यासोबत प्रेमसंबंध ठेवावेत, अशी माझी अपेक्षा होती. पण ती या गोष्टीला तयार नव्हती. माझा विरोध असतानाही तिने अन्य व्यक्तींसोबत संबंध ठेवणे कायम ठेवले. त्यामुळे मी तिला मारण्याचा निर्णय घेतला,’ असे जयेशने पोलिसांना सांगितले. आखलेल्या योजनेनुसार, २ नोव्हेंबर रोजी जयेशने प्रियाला दावडी येथील घरी बोलवले. तेथेच चाकूने वार करून तिची हत्या केली. त्यानंतर मिथुन म्हात्रे, भगवान धुळे या सहकाऱ्यांच्या मदतीने त्याने प्रियाचा मृतदेह कर्जतजवळील भीमाशंकरच्या जंगलात नेला व तेथे तो पेटवून दिला.
दावडी गावापासून १६० किलोमीटर अंतरावरील जंगलात प्रियाचा मृतदेह जाळण्यात आल्याने जयेशला कसलीही भीती नव्हती. प्रियाच्या अस्तित्वाचे कोणतेही पुरावे नसल्याने पोलीस तिच्यापर्यंत किंवा आपल्यापर्यंत पोहोचू शकणार नाहीत, अशा गुर्मीत तो वावरत होता. पण असे करतानाच प्रियाच्या ‘हत्येचे पातक माथी नको आणि प्रियाला मोक्ष मिळावा’ म्हणून त्याने तिला मारल्यानंतर तिचा दशक्रिया विधी केला, अशी माहिती पोलिसांसमोर उघड झाली. जयेशच्या दोन्ही साथीदारांना अटक झाली आहे.
अलीकडेच उघड झालेल्या शीना वोरा हत्याकांडाशी बऱ्यापैकी मिळतीजुळत्या असलेल्या या घटनेतील पोलिसांच्या तपासकौशल्याला खरेच सलाम करण्यासारखे आहे. आपल्या हद्दीबाहेर सापडलेल्या एका अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेहाची कोणतीही ओळख नसताना पोलिसांनी सुतावरून स्वर्ग गाठावा, तसा या प्रकरणाचा तपास केला. खबऱ्यांचे नेटवर्क, संशयाच्या आधारे केलेला तपास आणि तत्परता या गुणांमुळे महिनाभरात पोलीस खुन्यांपर्यंत पोहोचू शकले.