बॉम्बशोधक पथकातील नऊ वर्षांच्या सेवेनंतर श्वानांना निरोप

अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांच्यापासून देशातील राष्ट्रपती, पंतप्रधानांसह अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या व्यासपीठावरील सुरक्षेची जबाबदारी चोखपणे पार पाडणारे ठाणे ग्रामीण पोलीस दलाच्या बॉम्बशोधक नाशक पथकातील सिंदबाद आणि बिजली या दोन श्वानांना नुकताच निरोप झाला. नऊ वर्षे पोलीस दलात राहून नागरिकांची सुरक्षा जपणाऱ्या या दोन्ही श्वानांना निरोप देताना या पथकातील अधिकारी, कर्मचारी काहीसे भावूक झाले होते. आता या श्वानांची जागा शूर आणि वीर हे दोन श्वान घेणार आहेत.

सिंदबाद हा लॅब्रेडॉर जातीचा नर तर बिजली ही मादी आहे. ठाणे ग्रामीण पोलीस हद्दीत होणाऱ्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या दौरे, कार्यक्रमादरम्यान व्यासपीठाची तपासणी करण्याची जबाबदारी या श्वानांवर होती. जिल्ह्यातील धरण क्षेत्र, धार्मिक स्थळे तसेच महत्त्वाच्या ठिकाणीदेखील या श्वानांकडून तपासणी करवून घेतली जात होती. केवळ ठाणे ग्रामीण हद्दीतच नव्हे तर मुंबईसह राज्याच्या विविध भागातही या दोन्ही श्वानांची मदत घेतली जात होती. काही वर्षांपूर्वी मुंबईमध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे आले होते. त्यावेळेस त्यांच्या दौऱ्याच्या ठिकाणावरील सुरक्षा व्यवस्थेच्या तपासणीची जबाबदारी दोन्ही श्वानांनी चोखपणे पार पाडली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या मुंबई तसेच ठाणे जिल्ह्य़ातील कार्यक्रमांच्या व्यासपीठाची तपासणी करण्याची जबाबदारीही दोघांनीच पार पाडली होती.

श्वानांची निवृत्ती

पोलीस दलात कार्यरत असलेला श्वान आठ ते दहा वर्षांनी निवृत्त होतो. फिटनेस पाहून केंद्रीय गुन्हे अन्वेषण शाखेकडून त्यांचे निवृत्तीचे वयोमान ठरविले जाते.

त्यांच्या निवृत्तीच्या एक ते दीड वर्ष आधी संबंधित विभागाला त्याबाबत कळविण्यात येते. त्यानुसार या विभागाकडून ४० ते ६० दिवसांच्या श्वान पिल्लाची खरेदी करण्यात येते. सहा महिन्याचा होईपर्यंत पथकातील श्वान हाताळणारे कर्मचारी त्यांना प्रशिक्षण देतात आणि त्यानंतर पुढील सहा महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी त्यांना विविध केंद्रांमध्ये पाठविले जाते. तेथील प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो पोलीस दलात कार्यरत होतो. निवृत्तीनंतर त्यांना संस्था किंवा श्वानप्रेमी दत्तक घेतात, अशी माहिती पोलिसांनी दिली.

स्फोटकांचा शोध

  • दीड वर्षांपूर्वी पालघर जिल्ह्यत सापडलेल्या स्फोटकांची ओळख पटवण्यासाठी सिंदबाद आणि बिजलीचीच मदत घेण्यात आली.
  • वाडा तालुक्यातील मानिवली देवळी गावच्या हद्दीतील शेतात काही महिन्यांपूर्वी बॉम्ब सापडला होता. तो सैन्य दलाचा बॉम्ब असल्याचे बिजलीने ओळखून दाखवले होते.

भावपूर्ण निरोप

ठाणे ग्रामीण पोलीस दलातील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक व्यंकट आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एस.के. पाटील हे बॉम्ब शोधक नाशक पथकाचे प्रमुख म्हणून काम पाहतात. या पथकात बिजली आणि सिनबाद हे दोन्ही श्वान कार्यरत होते. निवृत्तीनंतर विरारमधील एका संस्थेने बिजलीला तर पोलीस दलातील एका कर्मचाऱ्याने सिंदबादला दत्तक घेतले आहे. प्रेमळ, मैत्रीपूर्ण आणि शांत हे दोन्ही श्वान होते. इतके वर्षे त्यांच्यासोबत काम केल्याने निवृत्तीनंतर काहीसे भावुक झाले होतो, असे पोलीस कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले.