‘महावितरण’च्या शहापूर विभागाकडून मंजुरी; शेतकऱ्यांना दिलासा

कल्याण : शहापूर तालुक्यातील शेणवे गावातील विस्तारित भागात राहत असलेल्या शेतक ऱ्यांना केंद्र शासनाच्या पंडीत दीनदयाळ उपाध्याय योजनेतून वीज पुरवठा योजना महावितरणच्या शहापूर विभागाने मंजूर केली आहे. या योजनेमुळे शेतीसाठी कूपनलिका खोदून विविध प्रकारची पिके घेणे शक्य होणार आहे.

देशातील प्रत्येक गावाच्या कोपऱ्यात वीज पोहोचावी यासाठी शासनाने विविध योजना जाहीर केल्या आहेत. या योजना जाहीर होऊनही शहापूर तालुक्यातील शेणवे गावच्या नागरीकरण झालेल्या विस्तारित भागात महावितरणकडून वीज पोहोचली नव्हती. अनेक शेतक ऱ्यांनी मालकीच्या शेती असलेल्या भागात घरे बांधली आहेत. शेणवे गावातून बाहेर पडलेल्या अनेक ग्रामस्थांनी डोळखांब रस्त्यावर घरे बांधली आहेत. गेली सहा वर्षे महावितरणकडे अर्ज करून विस्तारित भागात विजेची व्यवस्था करण्याचे विनंती करीत होते.

ग्रामपंचायतीने विस्तारित भागात विजेचे खांब, रोहित्र देण्याचा प्रस्ताव तयार करून महावितरणच्या शेणवे, शहापूर विभागाला पाठविला होता. सेवा वाहिन्यावरून (सव्‍‌र्हिस वायर) दूर अंतरावरून वीज आणून घरगुती वापरासाठी आणली जात होती.

विस्तारित भागात महावितरणकडून वीज पुरवठा मिळाला तर कूपनलिका खोदून वीजेच्या सहाय्याने लगतच्या शेतीत भाजीपाला तसेच उन्हाळी लागवड करता येते. मागील सहा वर्षांपासून या भागातील शेतकरी वीज पुरवठयासाठी महावितरणकडे प्रयत्नशील होते. सहा वर्षांनंतर प्रथमच शेणवे गावाबाहेरील मुसई फाटा परिसरातील रस्ता वीज दिव्यांनी उजळून निघणार असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

शेणवे गावातील विस्तारित भागासाठी १२ विजेचे खांब, दोन रोहित्र मंजूर झाली आहेत. पं. दीनदयाळ योजनेतून ही योजना राबविण्यात येत आहे. येत्या एप्रिल अखेपर्यंत या विस्तारित भागात वीज पुरवठा देण्याचे काम पूर्ण होईल. दोन वर्षांपासून हे काम मंजूर आहे. या कामासाठी नेमलेल्या ठेकेदाराने काम करण्यास नकार दिल्याने नवीन निविदा प्रक्रिया करण्यात आली. आता नवीन ठेकेदाराच्या माध्यमातून हे काम लवकर पूर्ण केले जाईल.

-अविनाश कटकवार, साहाय्यक अभियंता महावितरण