हक्काचे व्यासपीठ काही वर्षांसाठी गमावावे लागण्याची भीती; अंतर्गत सुविधांत सुधारणेची अपेक्षा

ठाणे शहरातील नाटय़रसिकांना गेली कित्येक वर्षे नाटय़ानुभव देणाऱ्या गडकरी रंगायतनची दुरुस्तीऐवजी पुर्नबांधणी करावी, अशी मागणी अखिल भारतीय नाटय़ परिषदेच्या ठाणे शाखेने केली असली तरी या विषयी नाटय़ कलावंतांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहे. हे नाटय़गृह पुर्नबांधणीसाठी बंद केल्यास नाटय़व्यावसायिकांचे मोठे नुकसान होईल, प्रयोगांसाठीचे हक्काचे व्यासपीठ काही वर्षांसाठी गमावावे लागेल, अशी भीतीही कलाकारांमध्ये व्यक्त होत आहे.

गडकरी रंगायतनची वारंवार दुरुस्ती होत असली तरी अजूनही चांगल्या पायाभूत सुविधांपासून कलाकार वंचित असल्याची प्रतिक्रिया कलाकारांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केली. ठाणे जिल्ह्य़ात गडकरी रंगायतन व्यतिरिक्त डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाटय़गृह, कल्याणमधील आचार्य अत्रे रंगमंदिर आणि ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृह अशी चार नाटय़गृहे आहेत. यांपैकी गडकरी रंगायतन हे सर्वात जुने नाटय़गृह आहे. तिथे नाटक सादर करण्याकडे निर्माते आणि कलाकारांचा ओढा असतो. तरुण रंगकर्मीनाही गडकरी रंगायतनचे व्यासपीठ आपलेसे वाटते. प्रेक्षकांचाही येथील प्रयोगांना चांगला प्रतिसाद असतो.

या नाटय़गृहाच्या इमारतीला ४० वर्षे पूर्ण होत आली आहेत. अंतर्गत सुविधा अद्ययावत     करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या वतीने निविदा काढण्यात आली आहे. यासाठी १६ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. मात्र दर वर्षी डागडुजीसाठी खर्च करण्यात येत असला तरी नाटय़गृहाची अंतर्गत दुरुस्ती करण्यात आलेली नाही. वातानुकूल यंत्रणा, सोफे , ध्वनियंत्रणा, आसने इत्यादींची मोडतोड झाल्याची तक्रार सातत्याने होत असते.

मिनी थिएटर, पार्किंग, नाटकाच्या तालमीसाठी खोल्या, बाहेरगावांतून आलेल्या कलाकारांसाठी निवासव्यवस्था, उद्वाहक, कलासंकुल, नाटकाच्या संदर्भातील ग्रंथसंग्रहालय या सुविधा नाटय़गृहात असणे आवश्यक असल्याने अखिल भारतीय नाटय़ परिषदेच्या ठाणे शाखेतर्फे या नाटय़गृहाची पुर्नबांधणी करण्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. या विषयी कलाकारांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या नाटय़गृहाची रचना प्रेक्षक आणि रंगकर्मीच्या दृष्टीने योग्य आहे. पुर्नबांधणी करताना रचना बदलण्याची शक्यता आहे. नवीन नाटय़गृह बांधण्यासाठी निविदा काढून काम सुरू होईपर्यंत जवळपास तीन ते चार वर्षे नाटय़गृह बंद राहील. त्यामुळे निर्माते, कलाकार आणि रसिक प्रेक्षकांना चांगल्या कलकृतींपासून वंचित राहावे लागेल, अशा प्रतिक्रिया कलाकारांकडून व्यक्त करण्यात येत आहेत.

नाटय़गृहाची पुर्नबांधणी करायचा विचार असल्यास नेपथ्यकारांना विश्वासात घेणे महत्त्वाचे आहे. निर्माते, नेपथ्यकार, कलाकारांच्या मतांचा विचार पुर्नबांधणीत न झाल्यास नाटय़गृहाच्या नूतनीकरणाला विरोध करण्यात येईल.

– भाऊ कदम, अभिनेता

या नाटय़गृहाची पुर्नबांधणीच करण्याचे निवेदन अखिल भारतीय नाटय़ परिषदेची मध्यवर्ती शाखा आणि ठाणे महानगरपालिकेला देण्यात आले आहे.

– विद्याधर ठाणेकर, कार्याध्यक्ष, अखिल भारतीय नाटय़परिषद, ठाणे

नाटय़गृहाची बांधणी हा प्रस्ताव शासन धोरणाच्या अंतर्गत येतो. त्यामुळे ही वास्तू पाडून बांधावी की नाही याविषयी कोणताही निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही. नाटय़गृहाच्या दुरुस्तीची निविदा काढण्यात येते. महापालिकेतर्फे वास्तूची काळजी घेतली जात आहे.

– संदीप माळवी, उपायुक्त, ठाणे महानगरपालिका