डोंबिवली पूर्वेतील पीअँडटी कॉलनी परिसरातील रॉयल इंटरनॅशनल या शाळेने पहिली इयत्तेत शिकणाऱ्या २२ विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश नाकारल्याने पालक आणि विद्यार्थ्यांनी शाळेच्या प्रवेशद्वारासमोर घोषणाबाजी करत आंदोलन केले.
एप्रिल महिन्यात फी वाढी विरोधात रॉयल इंटरनॅशनल शाळेच्या व्यवस्थापना विरोधात पालक व विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारले होते. इयत्ता पहिलीसाठी गेल्या वर्षी २० हजार रुपये शुल्क आकारण्यात आले होते. यंदा त्यामध्ये सहा हजारांनी वाढ करण्याचा निर्णय व्यवस्थापनाने जाहीर केला आहे. त्याविरोधात पालकांनी आवाज उठविला होता. या शुल्क वाढीच्या निर्णयाचे पुढे काय झाले यासंबंधी पालकांना कोणतीही कल्पना देण्यात आली नव्हती. जून महिन्यात शाळा सुरु होताच पालकांनी मुलांना शाळेत आणले असता व्यवस्थापनाने काही विद्यार्थ्यांना वर्गात प्रवेश दिला नाही, अशी पालकांची तक्रार आहे. ‘नर्सरी पासून आमची मुले या शाळेमध्ये शिकत आहेत. त्यांना पुन्हा नव्याने अ‍ॅडमिशन घेण्याची गरज काय आहे, असा सवाल पालकांच्या प्रतिनिधी हर्षदा धुदाळे यांनी पत्रकारांशी बोलताना उपस्थित केला. ‘आम्ही फी भरण्यास तयार आहोत, मात्र शाळा शुल्क स्विकारण्यास तयार नाही. एप्रिल महिन्यामध्ये आमची मुले २० दिवस वर्गात हजर होती. शाळेमध्ये मुलांचे गणवेश, सकाळचा नाश्ता, शैक्षणिक साहित्य, वाहतूक यासारख्या ुसविधांचे पैसे यापुर्वीच भरले आहे. असे असताना विद्यार्थ्यांना प्रवेश कसा काय नाकारण्यात येतो, असा सवाल उपस्थित करण्यात आला. या शुल्क वाढीविरोधात शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनाही निवेदन पाठविण्यात आल्याचे पालकांनी सांगितले. शिक्षण मंडळानेही यांची चौकशी केली मात्र त्यात काय निष्पन्न झाले याची माहिती आम्हाला मिळालेली नाही. शाळेच्या मुख्याध्यापिका राखी सिंग याविषयी म्हणाल्या, पालकांनी वार्षिक शुल्क वेळेत भरणे आवश्यक होते. त्यांनी ती वेळेत न भरल्याने मुलांचा प्रवेश पुर्ण झालेला नाही. येत्या शनिवारी शाळा कमिटी सोबत एका बैठकीचे आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये निर्णय सांगितला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.