09 December 2019

News Flash

रखडलेल्या पत्रीपुलाच्या उभारणीसाठी आंदोलन

मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये धोकादायक झाल्याने जुना पत्रीपूल तोडण्यात आला.

संग्रहित छयाचित्र

आठ महिने उलटून गेले तरी कल्याणमधील तोडलेल्या जुन्या पत्रीपुलाचे बांधकाम राज्य रस्ते विकास महामंडळ, मध्य रेल्वे प्रशासनाकडून सुरू केले जात नाही. पत्रीपुलावरील वाहतूक कोंडीने प्रवासी हैराण झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी या पुलावरील वाहतूक कोंडी, खड्डय़ांनी एका दुचाकीस्वाराचा बळी घेतला. या घटनांच्या पाश्र्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाचा निषेध करण्यासाठी पत्रीपूल येथे आंदोलन केले. रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आंदोलन करून प्रशासनाने तातडीने पत्रीपूल उभारणीचे काम हाती घेण्याची मागणी केली.

मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये धोकादायक झाल्याने जुना पत्रीपूल तोडण्यात आला. त्यानंतर नवीन पूल तीन महिन्यात मार्चपर्यंत पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जुन्या पत्रीपुलाच्या भूमिपूजन कार्यक्रमाच्यावेळी दिले होते. पालकमंत्र्यांच्या आदेशाप्रमाणे ‘एमएसआरडीसी’, रेल्वेने पूल उभारणीचे काम हाती घेतले नाही. याउलट आठ महिने उलटले तरी या कामाची अद्याप निविदा प्रसिद्ध करण्यात आलेली नाही.

सुरुवातीच्या काळात पुलाचा बांधकाम आराखडा कसा असावा यावरून ‘एमएसआरडीसी’ आणि रेल्वे यांच्यात जुगलबंदी सुरू होती. ऑक्टोबरनंतर पूल उभारणीची कामे सुरू होतील, असे रेल्वे, महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून सांगितले जात होते. सध्या पत्रीपुलाच्या दोन्ही बाजूला खड्डे पडले आहेत. या खड्डय़ातून वाहन चालवताना चालकांना कसरत करावी लागते. वाहतूक पोलीसही या पुलावरील कोंडी सोडवताना हैराण होत आहेत. हा कोंडीचा नित्याचा प्रकार पाहून अनेक रहिवासी शिळफाटा मार्गे ठाणे, मुंबईचा प्रवास करत आहेत. कल्याणला जाणारे बहुतांशी कर्मचारी, नगरसेवक पत्रीपुलावरील कोंडीत अडकायला नको म्हणून लोकलने प्रवास करताना दिसतात. एकही लोकप्रतिनिधी हा पूल लवकर मार्गी लागावा म्हणून प्रयत्नशील नसल्याने रहिवासी, चालक संताप व्यक्त करत आहेत. या कोंडीमध्ये कल्याण पूर्व, पश्चिम, डोंबिवलीत शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बसचालकांची सर्वाधिक त्रेधातिरपीट उडत आहे.

पुलाच्या उभारणीत प्रशासकीय यंत्रणा तत्परता दाखवीत नसल्याने मनसेच्या कल्याणमधील कार्यकर्त्यांनी मनसेचे नेते प्रमोद पाटील यांच्या आदेशावरून पत्रीपूल येथे आंदोलन केले. कार्यकर्ते, पत्रीपूल भागातील व्यापारी, रहिवासी या आंदोलनात सहभागी झाले होते. पत्रीपूल भागातील व्यापाऱ्यांचे सततच्या कोंडीमुळे आर्थिक नुकसान होत आहे. या भागातील दुकानांमध्ये कोणीही खरेदीसाठी येत नाही. सततच्या धूळ, चिखलामुळे दुकानात दुर्गंधी, घाण पसरते, अशी येथील व्यापाऱ्यांची तक्रार आहे.

First Published on August 13, 2019 2:30 am

Web Title: agitation for patri pool mpg 94
Just Now!
X