पाच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीतील पराभूत.. यंदा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक.. आणि चार वर्षांपूर्वी निवडून येऊनही कामे करण्यात अपयशी ठरेलेले.. अशा हवशा-नवशांनी आगामी कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकांवर डोळा ठेवत कल्याणात आत्मक्लेशाचा मार्ग अंगीकारला आहे. अगदी काल-परवापर्यंत मतदारांच्या प्रश्नांकडे पाठ फिरविणाऱ्या या स्थानिक पुढाऱ्यांना निवडणुकांच्या तोंडावर नागरी समस्यांची आठवण झाली असून त्यासाठी उपोषण, आंदोलने, मोर्चे यांना जोर चढला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे या विरोधी पक्षांचे नगरसेवक, नेते यात आघाडीवर असले तरी सत्ताधारी शिवसेना-भाजपमधील इच्छुक उमेदवारांचेही जनतेसाठीचे ‘प्रेम’ उतू जात आहे.
गतवर्षी पार पडलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये नाकारलेल्या पक्षांनी कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकांमध्ये यश संपादन करण्याचा जणू चंग बांधला आहे. त्यासाठी अपुऱ्या कामांची माहिती घेऊन त्या-त्या ठिकाणी उपोषण, आंदोलन, स्वाक्षरी मोहीम, भीक मांगो आंदोलन, मोर्चा, अधिकाऱ्यांना गराडा घालण्याचे प्रकार सध्या शहरात वाढू लागले आहेत. विरोधी पक्षच नव्हेत तर सत्ताधारी शिवसेना आणि भाजपचे नगरसेवकही अशा आंदोलनांमध्ये सक्रिय होऊ लागले आहेत. त्यामुळे आता हवशा-गवशांना मुद्देही कमी पडत आहेत.
निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर आत्तापर्यंत निद्रिस्त असलेल्या कार्यकर्त्यांनी निवडणूक मुद्दय़ांचा शोधाशोध करण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी रखडलेले स्कायवॉक, रस्ते, पाणी, तुंबलेली गटारे, उद्याने, स्वच्छतागृहे, वीज खांब, मैदाने, कचरा, अस्वच्छता या मुद्दय़ांचा निवडणुकीसाठी उपयोग होऊ शकेल का, याची चाचपणी करू लागले आहेत. मतदारांचे लक्ष वेधून घेण्यासाठी आंदोलनाचे वेगवेगळे पर्यायही आजमावले जात आहेत. मात्र, हे करण्यासाठी निवडणुकीच्या आधीची वेळ कशी निवडली जाते, असा सवाल व्यक्त होत आहे.

कल्याण-डोंबिवलीत गेल्या काही दिवसांमध्ये झालेली आंदोलने
* शहरातील कचराकोंडीवरून आयुक्तांना घेराव
* इंधन दरवाढ, वाहतूक समस्येसाठी काँग्रेसचे आंदोलन
* बंद सिग्नल यंत्रणेविरोधात आंदोलन
* रुक्मिणीबाई रुग्णालयाच्या गैरव्यवस्थेविरोधात आंदोलन
* क्रीडा संकुलामधील बंद व्यायामाशाळा सुरू होण्यासाठी आंदोलन
* खासगी शाळेत मुलीला त्रास देणाऱ्या शिपायाला मारहाण
* नवीन रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी मनसे नगरसेवकाचे उपोषण
* नागरिकांच्या समस्यांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी शिवसेना नगरसेविकेचे भीक मांगो आंदोलन
* खासगी शाळेच्या शुल्कवाढीविरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांचे उपोषण