महाराष्ट्राला लोककलांची जशी समृद्ध परंपरा आहे, तशीच खाद्य संस्कृतीचीही आहे. कुणालाही हेवा वाटावा, असे आपले खाद्यविश्व श्रीमंत आणि वैविध्यपूर्ण आहे. दर पाच मैलांवर जशी भाषा बदलते, तशी खाद्यपदार्थाची चव आणि बनविण्याच्या पद्धतीही बदलतात. पदार्थामधील मुख्य घटक तेच, मात्र मसाल्यांमुळे वेगळी चव येते. शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही प्रकारच्या आहारात प्रचंड विविधता आहे. पंजाबी आणि दाक्षिणात्य पदार्थाच्या तोडीस तोड आता महाराष्ट्रीय पदार्थ देशभरात लोकप्रिय होऊ लागले आहेत. त्यातही आगरी आणि कोळी घरातल्या जेवणाची एक वेगळीच लज्जत आहे. कळवा खारेगांव येथील चवदार आगरी कट्टा इथे खास आगरी पद्धतीच्या मेजवानीचा आस्वाद घेता येतो. त्यामुळे अस्सल खवय्ये तिकडे गर्दी करताना दिसतात.

द्वारका म्हात्रे गेली दहा वर्षे हा कट्टा चालवितात. नाव कट्टा असले तरी याचा तोंडवळा आपल्याकडच्या खानावळीसारखा आहे. अनेकांना बाहेरचे खाणेही घरगुती लागते. त्यांच्यासाठी हा कट्टा अगदी आदर्श ठिकाण आहे. घरगुती असल्याने जेवणाचा आनंद मनापासून घेता येतो. येथील चमचमीत पाया पाव खासच. एका पावाने खवय्यांचे कधीच समाधान होत नाही. त्यामुळे बहुतेक खवय्ये तीन-चार पाव सहज गट्टम करतात. अगदी मधल्या वारीही इथे दोन किलो पाया संपतो. आगरी समाजाची खास डिश म्हणजे सुक्का मटण. सुक्का मटण किंवा चिकन रस्सा-भाकरी असेल तर खवैय्यांची खाद्यानंदी जणू तंद्री लागते.

nilesh sambre, kapil patil
“कपिल पाटील डोळ्यांची शस्त्रक्रिया करा”, नीलेश सांबरे यांचे खासदार कपिल पाटील यांना प्रत्युत्तर
Loksatta editorial Government bans sugar mills from producing ethanol
अग्रलेख: धडाडांची धरसोड!
feast of snowballs juicy fruits and green fodder for animals at Karunashram Orphanage in Wardha
वन्यप्राणी करताहेत उन्हाळा एन्जॉय! बर्फ के गोले, रसभरीत फळे अन हिरवा चारा यांची मेजवानी
Crowd of devotees on the occasion of Tukaram Beej sohala in Dehu
पिंपरी : देहूमध्ये तुकाराम बीज सोहळ्यानिमित्त भाविकांची अलोट गर्दी

बुधवार, शुक्रवार आणि रविवार या वारांना खवय्यांची भरपूर गर्दी असते. आगरी मसाला घरीच बनवीत असल्याने पदार्थाला अधिक छान चव येत असल्याचे द्वारकाबाई यांनी सांगितले. महिन्याला १५-१६ किलो आगरी मसाला लागत असल्याचेही त्यांनी सांगितले. या मसाल्यात हळद, धणे, राई, मिरची आदी मासाल्यांच्या पदार्थाचा समावेश आहे. मटणाचाच एक भाग असणारा वजरी पाव हा येथील प्रसिद्ध पदार्थ आहे. मटणापेक्षाही अधिक चवीने आणि आवडीने तो खाल्ला जातो. तो सहसा बाहेर कुठे मिळत नाही. त्यामुळे अगदी दूरवरचे खवय्ये खास वजरी पाव खायला येथे येतात. याशिवाय येथील तळलेला बांगडा, पापलेट, बोंबील आणि कोलंबी खाताना खवय्ये मनमुराद दाद देतात. तांदळाचे पीठ आणि थोडासा रवा लावून खरपूस तळलेले हे मासे आणि भाकरी खातानाही खवय्ये तल्लीन होऊन जातात. याशिवाय इथे माशांचा रस्साही मिळतो. भाकरीही खास हातावर थापून आगरी पद्धतीने बनविली जाते. ज्वारी आणि तांदूळ अशा दोन्ही प्रकारात भाकरी बनवली जाते. दररोज येथे ६० भाकऱ्या हमखास संपतात. या भाकऱ्यांची मागणी बुधवार, शुक्रवार आणि रविवारी वाढते.

एक भाकरी १५ रुपयांना विकली जात असल्याचेही म्हात्रे यांनी सांगितले. कोणतीही डिश घ्या शंभर रुपयांच्या वर किंमत नाही. त्यामुळे सर्वसामान्यांना हे परवडते. नावाप्रमाणेच या आगरी कट्टय़ावरील पदार्थ चवदार आहेत, हे वेगळे सांगायला नकोच. इथे बसून खायला फारशी जागा नाही. एकच टेबल आहे. त्यामुळे पार्सल मोठय़ा प्रमाणात नेले जाते. दर रविवारी येथे चिकन तसेच मटण बिर्याणी मिळते.

या झणझणीत आगरी जेवणाबरोबरच येथे आगरी पद्धतीचे शाकाहारी जेवणही उपलब्ध आहे. चवळी बटाटा भाजी, मटकीची उसळ या पदार्थालाही अस्सल आगरी जेवणाची चव आहे. कट्टा रात्री ११ पर्यंत सुरू असल्याने रात्री उशिरा घरी जाऊन जेवणाचीही सोय होते.

  • कुठे? चवदार आगरी कट्टा, गाळा नं-२, लक्ष्मण अपार्टमेंट, जरीमरी मंदिरजवळ, पाखाडी, खारेगाव, कळवा (प.)
  • कधी? सकाळी १०.३० ते रात्री ११