प्रकाश पाटील

आगरी समाज

Devendra Fadnavis, Ajit Pawar & Eknath Shinde Astrology
शिंदे, पवार, फडणवीसांना ‘या’ अंकाचा धागा ठेवतो जोडून; २०२४ मध्ये मात्र येईल ‘हा’ अडथळा, ज्योतिषी काय सांगतात?
British scientist Peter Higgs waited 48 years to present his research
आइनस्टीनलाही प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली होती; तर इतरांची काय कथा?
There is no end to the songs of Dalits
गीतांचा भीमसागर… : दलितांच्या सुरांना अंत नाही!
loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..

आगर म्हणजे शेती किंवा मीठ पिकवण्याची जागा. नारळी-पोफळीच्या बागायती जमिनीलाही ‘आगर’ हाच शब्द प्रचलित आहे. वसईतही पश्चिमेच्या समुद्रकिनाऱ्यावरील नारळी-पोफळीच्या बागायती भागाला ‘आगारात’ असे संबोधले जाते. शेतीचे, मिठाचे आणि बागायतीचे आगर पिकवून आपली उपजीविका करणारा समाज म्हणजेच आगरी समाज होय.

‘आगरी’ शब्दातील ‘आ’ म्हणजे आगरात राहणारे, ‘ग’ म्हणजे गर्व नसणारे, ‘री’ म्हणजे रीतभात जपणारे, अशीही एक फोड केली जाते. पण ती फोड ‘आगरी’ या शब्दाच्या उत्पत्तीनंतरची आहे. तीन अक्षरांचे आपल्याला हवे तसे अर्थ आपण काढू शकतो, पण ती एक आत्मप्रौढी ठरेल, इतिहास नव्हे.

आगरी समाजाच्या बाबतीत एक आख्यायिका अशी की प्राचीन काळी आगरी लोक रावणाच्या दरबारी गायक-वादक होते. रावणाने त्यांना बक्षिसी म्हणून पश्चिम किनारपट्टीवरील जमीन दिली. या लोकांचे वंशज म्हणजेच आजचे आगरी लोक होत. ढोल वाजवणारे म्हणून ढोल आगरी ही आगरी समाजातील एक जात ही यावरूनच आली असावी, असा एक समज आहे.

दुसरी शक्यता अशी वर्तवली जाते की शिवाजी महाराजांचे कनिष्ठ पुत्र राजाराम यांनी ‘सरखेल’ ही पदवी देऊन गौरवलेले कान्होजी आंग्रे यांच्या नावावरून आगरी हे नाव रूढ झाले. १६९६ मध्ये कान्होजी आंग्रे यांनी कुलाबा जिंकून ते आपले मुख्य ठाणे केले. १७००मध्ये राजे राजाराम यांच्या पत्नी महाराणी ताराबाई यांनी सावंतवाडी ते मुंबईपर्यंतचा समुद्रकिनारा रक्षणासाठी कान्होजी आंग्रे यांच्याकडे सोपवला. त्यांनी आपल्या पराक्रमाने ब्रिटिश, पोर्तुगीज, डच व फ्रेंच आरमारांच्या नाकीनऊ  आणले. परकीयांच्या अतिक्रमणाविरुद्ध लढा पुकारून सागरी किनाऱ्याचे रक्षण केले. या काळात त्यांनी पश्चिम किनारपट्टीवरील मुघलांकडे व ब्रिटिशांकडे गेलेले किल्ले परत घेतले. सुमारे पंचवीस वर्षे सागरी सीमेचे रक्षण करणाऱ्या या दर्यावर्दी पराक्रमी वीराचे वंशज म्हणजेच आजचे आगरी अशी एक विचारसरणी आहे.

कोकण किनाऱ्यावर इंग्रजांना ज्या लोकांच्या रोषाचा सामना करावा लागला, त्यांना ते ‘अँग्री पीपल’ म्हणून संबोधतात. तेच ते आगरी लोक असाही एक विचार मांडला जातो.

पण महत्त्वाची एक शक्यता मांडली जाते ती म्हणजे आगरी हे मुंगी-पैठण येथील मूळ निवासी होते. अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील पैठणजवळ असलेल्या मुंगी या गावावरून आगरी लोकांचे पूर्वज इथे आले, असे म्हटले जाते. या शक्यतेनुसार आगरी समाज हा मूलत: शुद्ध क्षत्रीय समाज आहे. १३ व्या शतकात अलिबाग तालुक्यांत चौल, आवास-सासवणे व  सागरगड ही तीन लहान लहान राज्ये होती. सागरगडावर दिल्लीच्या बादशहाने एक मुसलमान सरदार नेमलेला होता, जो इतर दोन राज्यांजवळून करवसूल करून दिल्लीला बादशहास पाठवयाचा. जेव्हा त्याने दिल्लीस कर पाठवण्याचे बंद केले, तेव्हा बादशहाने मुंगी-पैठणचा राजा बिंब याला पत्र पाठवून मदत करण्याची विनंती केली. राजा बिंब याने दिल्लीहून आलेल्या सरदाराच्या मदतीने गडावर स्वारी करून गडावरील सरदारांचा बिमोड केला. गडावरील सरदारास पकडून त्याची दिल्लीहून आलेल्या सरदाराबरोबर दिल्लीस रवानगी केली. यानंतर राजा बिंब याने परत जाण्याचा बेत रद्द करून गडावर राहून राज्यकारभार पाहण्यास सुरुवात केली. त्यानंतर इतक्या मोठय़ा सैन्याची गरज नसल्याने राजाने पुरेसे लोक पदरी ठेवले आणि अतिरिक्त लोकांना मिठागरे बांधून दिली. तसेच आवश्यक त्या ठिकाणी गांवठाणे बसवून तिथे या लोकांच्या वसाहती बसवल्या. उपजीविकेचे साधन मिळाल्याने हे लोक आवडीने इथेच राहिले. मिठाचे आणि खार जमिनीतील भातशेतीचे उत्पादन घेऊ  लागले. हळूहळू मिठागरें व वसाहती यांचा विस्तार होत गेला आणि या वस्ती तत्कालीन कुलाबा जिल्ह्यातील अलिबागपासून पेण, पनवेल, कर्जत, रोहा, मुरुड, जंजिरा व ठाणे-मुंबई अशा पसरत गेल्या.

पालघर जिल्ह्यात समाज हा प्रामुख्याने वसई तालुक्यात आणि पालघर तालुक्यातील सफाळे परिसरात मोठय़ा प्रमाणावर आहे. खार जमिनीच्या लगतच्या प्रदेशांतच फक्त बिंबवंशीयांच्या वस्ती पसरल्या. मिठागराचा धंदा चांगले उत्पन्न देणारा आणि किफायतशीर वाटल्यामुळे आगरी जातीत हा धंदा अनेक पिढय़ा चालत आलेला आहे. मुख्य धंदा मिठागरात मीठ पिकवणे राहिल्यामुळे या लोकांना इतर लोक ‘आगरी’ या नावाने संबोधू लागले. परंतु हे लोक मूळचे शुद्ध क्षत्रिय आहेत.

आगरी लोक शिल्पकलेतही निपुण होते. असे म्हणतात नाशिकमधील पंचवटीमधील मंदिरे व मंदिरांचे शिल्पकाम आगरी पाथरवटांनी घडवले आहे. (पाथरवट म्हणजे दगडाचे कोरीवकाम करणारा) सुप्रसिद्ध एलिफंटा लेणी म्हणजे घारापूरची लेणी असलेल्या भागाचे मूळ नाव ‘अग्रहारपुरी’ असे होते. अग्रहारपुरी म्हणजे आगरी लोकांची नगरी. इथले भव्य, सुंदर शिल्पकाम हे आगरी पाथरवटांनी केलेले आहे. त्याचप्रमाणे वेरुळच्या लेण्यांच्या कामातही आगरी पाथरवटांचे योगदान आहे. द्रविडांकडून दाक्षिणात्य शिल्पकलेची शैली त्यांनी आत्मसात करून इथल्या शिल्पकलेबरोबर तिचा सुंदर संगम घडवून आणला.

ब्रिटिशांनी आगरी लोकांचा कोळी असा केलेला उल्लेख अत्यंत चुकीचा आहे. आगरी आणि कोळी यांच्या राहणीमानात किंवा इतर गोष्टींत जरी साम्यता असली तरी या दोन्ही जाती भिन्न आहेत. कोळी लोक हे मुख्यत्वे समुद्र व खोल समुद्रात मासेमारी करतात. ते मिठाच्या उत्पादनात किंवा शेतीच्या उत्पादनात दिसत नाहीत. याउलट आगरी हा समुद्राचे पाणी खाडीद्वारे आत घेऊन आगरात मिठाचे उत्पन्न घेतो. समुद्राला जोडणाऱ्या खाऱ्या पाण्याच्या खाडीत मच्छीमारी करतो, ओहोटीच्या वेळी बोकशे मांडून आगरातच मच्छी पकडतो, आगरातील पाण्याच्या पाटात मासे पकडतो किंवा शेतात शेततळे (खड्डे) करून मासेमारी करतो. त्याचप्रमाणे नारळी-फोफळीच्या बागा निर्माण करून त्यात भाजीपाल्याचे उत्पादन घेतो. आगरी व कोळी यांची बोली इतर भाषकांना वरवरून जरी सारखी वाटली तरी तिच्यात खूप फरक आहे. या दोन्ही जातींत रोटी-बेटी व्यवहार होत नाहीत. मात्र या दोन्ही जातींत मानलेले मैत्रीचे, बहीण-भावांचे तसे दृढ संबंध दिसून येतात.