नजीकच्या अंतरासोबत लांबपल्ल्यावरही वातानुकूलित बससेवा

एसटीचा प्रवास म्हणजे, कळकट आसने, रंग उडालेले पत्रे, मोडक्यातुटक्या खिडक्या असे राज्य परिवहन मंडळाच्या बसगाडीचे चित्र आता हद्दपार होऊ लागले आहे. त्यासोबतच प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाकडून विविध सुविधाही पुरवण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून ठाण्याहून सुटणाऱ्या लांबपल्ल्यांच्या मार्गावर वातानुकूलित शयनसुविधा असणाऱ्या शिवशाही गाडय़ा सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

सध्या ठाणे शहरातून ठाणे-बोरिवली-ठाणे तसेच ठाणे-भाईंदर-ठाणे अशा वातानुकूलित बसगाडय़ा राज्य परिवहन मंडळाने सुरू केल्या आहेत. त्यापैकी भाईंदर-ठाणे ही सेवा ११ फेब्रुवारीपासूनच सुरू करण्यात आली आहे. ठाणे-बोरिवली आणि बोरिवली-ठाणे अशा एकुण ९६ फेऱ्या शिवशाहीमुळे शक्य झाल्या आहेत. भाईंदर-ठाणे आणि ठाणे-भाईंदर अशा एकूण ४४ फेऱ्यांची सोय शिवशाहीद्वारे करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या बस गाडय़ांचे भाडेदरही परवडण्याजोगे असल्याने या बस सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. दरम्यान या बसमुळे टीएमटीच्या उत्पन्नावर थोडय़ा प्रमाणात परिणाम झाल्याचे ठाणे महापालिकेतर्फे  सांगण्यात येत आहे. ठाणे, कोल्हापूर तसेच ठाणे- बोरिवली आणि भाईंदर या वातानुकूलित बस सेवेलाही चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे राज्य परिवहन मंडळाच्या ठाणे विभागीय कार्यालयातील वाहतूक नियंत्रण अधिकारी आर.सी. बांदल यांनी सांगितले. संपूर्ण राज्यासाठी एकूण दोन हजार वातानुकूलित शिवशाही बस मागविण्यात आल्या आहेत. त्यातील १५० बस या शयन कक्षाची (स्लीपर कोच) व्यवस्था असणाऱ्या आहेत, तर १ हजार ७५० बसमध्ये आसन व्यवस्था आहे. त्यापैकी २०० बस एसटी आगारात प्रवासी फेऱ्यांसाठी सज्ज आहेत. तसेच ७५० गाडय़ा मार्च अखेरीपर्यंत सेवेत येणार असल्याचे एस.टी. महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी अविनाश भोसले यांनी सांगितले. नागरिकांच्या मागणीप्रमाणे महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या ताफ्यात वातानुकूलित बस आणण्यात आल्या आहेत.

ठाणे जिल्ह्य़ातून विविध ठिकाणी सोडण्यात येणाऱ्या मार्गावर एकूण ४० वातानुकूलित बसगाडय़ा प्रस्तावित असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यात साताऱ्यासाठी तीन बस सोडल्या जातील. महाबळेश्वर, शिर्डी, धुळे आणि कऱ्हाडसाठी प्रत्येकी एक गाडी सोडण्यात येईल. रत्नागिरी, गणपतीपुळे, विटा, जळगाव, मिरज, अक्कलकुवा, अक्कलकोट, उमरगा, गडहिंग्लज, देवगड इथे प्रत्येकी दोन आणि शेगावला चार वातानुकूलित शिवशाही बसचा प्रस्ताव ठाणे विभागीय कार्यालयातून पाठविण्यात आला आहे. कल्याण- अक्कलकुवा, कल्याण-शेगाव, कल्याण-रत्नागिरी, विठ्ठलवाडी-विटा या मार्गावरील वातानुकूलित बसचा प्रस्ताव मंजुरीसाठी देण्यात आला आहे. ठाणे-अहमदाबाद, सूरत आणि बेळगाव या मार्गासाठी वातानुकूलित बसचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.